पिं प ळ  

 

उमेश वानखडे  

रावसाहेब बाल्कनीत बसून विस्तीर्ण पसरलेल्या रॉक क्रीक गॉल्फ आणि टेनिस अकॅडमीच्या परिसराकडे बघत होते. रोजचाच तो दिनक्रम, सकाळी सातला उठून सगळे आटोपून, फ्रेश होऊन बाल्कनीत बसायचे. कुणी एक दोघे गॉल्फ खेळत असलेले किंवा टेनिस कोर्टवर चेंडू मारत असलेल्यांना बघायचे. टेनिस खेळणं तर आता खूप मागे सुटलं होतं. गुडघे कसं-बसं उभे राहू द्यायचे. या दारापासून त्या दाराला जायचे तर भिंतीचा आधार घेत जायचं. नाही म्हटले तरी साठीत सुद्धा त्यांनी मेडिकल असोसीएशनची टेनिस टूर्नामेंट जिंकली होती! आता वयाच्या ब्यांशीव्या वर्षी त्यांना स्वतःलाही जाणीव होती, गुडघे उभे रहायला देतायेत, चार पावले टाकू देतायेत, त्यातच समाधान! उगाच हावरटपणा करून टेनिस खेळता येत नाही म्हणून हळहळून जाण्यात काही अर्थ नाही. तेवढ्यात बाल्कनीखाली रिसेप्शनिस्ट बाई  हातवारे करत असलेली त्यांना दिसली. लगबगीने त्यांनी आपली दहा वर्षांपूर्वी रणथंबोरहून आणलेली सिंहाचा जबडा असलेली काठी आधाराला घेतली आणि स्वतःशीच पण मोठ्यांदा पुटपुटले. 

 

"नेहमीच विसरतो हे हिअरिंग एड कानात घालायला, गॅबी आज सुद्धा कितीतरी वेळ बेल वाजवत असणार दाराची." 

 

हळूहळू संथ गतीने एक हात काठीवर आणि एका हाताने भिंतीचा आधार घेत, दरवाजापर्यंत पोहोचायला त्यांना चांगली दोन मिनिटे तरी लागली असतीलच. दार उघडल्या-उघडल्या रावसाहेब सॉरी म्हणाले.

"अगं गॅबी, सॉरी.. सॉरी. हिअरिंग एड नव्हते घातले मी कानात. त्यामुळे बेल ऐकायलाच नाही आली" 

 

"मला माहिती आहे राव, तू एक नंबरचा विसरभोळा माणूस आहेस. आता मला सहा महिने झालेत. त्यामुळे सवय झालीय. मी तुझ्या खोलीला येता-येताच रिसेप्शनिस्टला सांगते तुला सांगायला. मग ती हातवारे करते तुझ्या बाल्कनी समोर." 

 

"अरे वा, हे बरं करतेस. शेवटचा मुक्काम आहे हा. एक एक अवयव साथ सोडतोय आता. गुडघे गेले, कान गेले, मेंदू पण गेल्यातच जमा आहे. लवकरच आम्ही जातो आमच्या गावा आमुचा राम राम घ्यावा होणार आमचे. तशी आमची "ही" वाट बघतेय गेली १३ वर्षे. ती अजून पुन्हा ओरडूनच स्वागत करणार बघ माझे. काय हो, कुठे भटकत होता एवढा वेळ. किती वाट बघतेय तुमची इथे." 

 

"राव, असा कसा रे तू?  तू स्वतः डॉक्टर ना? किती लोकांच्या हृदयातले ब्लॉकेज काढलेस तू. त्यांना नवीन जीवन दिलेस. स्वतः का मरायच्या बाता करतोयस?"

 

"गॅबी, प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. वॉशिंग्टनमधला प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.रावसाहेब जाधव आता पूर्वाश्रमीचा रावसाहेब नाही राहिलाय. मी वाचवले असेन शेकडो जीव तेव्हा, पण आज माझे साधे ब्लड प्रेशर घ्यायला देखील तू लागतेस. बरं ते जाऊ दे. आज काय आहे तुझ्या "टू डू लिस्ट" मध्ये?"

 

"राव, आज तुझे व्हाईटल्स, ग्लूकोझ, स्पंज बाथ आणि दररोजचे मेडिकेशन. आणि हो संध्याकाळी खाली जायचेय चावडी वर बसायला. चावडीच म्हणतोस ना तू त्याला?" 

 

"बरं यात चावडीच काय ती मला आवडते. तुझे ते रुटीन कर तू."

"तुला चांगलं ओळखते मी राव. तुझ्यात आणि माझ्या बाबामध्ये काही फरक नाही. पण माझा बाबा मेक्सिकोत आहे, त्याच्या नातवंडासोबत काढतोय शेवटचे दिवस. तू का रे इथे रीटायर्मेंट होम मध्ये आलास? तुझा मुलगा आणि सून तर चांगले आहेत. तुझा मुलगा आठवड्यातून न चुकता फोन करतो. चौकशी करतो, आठवडाभराच्या सूचना देतो."

 

"हो तर मग. माझी सून आणि मुलगा दोघंही एकदम फँटॅस्टिक आहेत. परिस्थितीच अशी आली, काय करणार?"

 

"राव, असली कसली परिस्थिती? तुला आणून टाकलाय इकडे आणि ते दोघे तिकडे. पैशाने प्रश्न सुटतात. मनाचे गुंते नाही. त्याला मोकळं करायला माणूसच लागतं."

 

"गॅब्रिएला. माझा पोर आणि सून दोघेही खूप चांगले आहेत. सहा महिन्याआधी पर्यंत त्यांच्यासोबतच तर होतो. पोराची नेमणूक झालीये इझ्राएलच्या एम्बसीत. त्याची पोरं कॉलेजात आहेत. मीच सांगितलं पोराला आणि सुनेला की हीच वेळ आहे. जा आणि रहा सुखात एकटे आता तरी. तरुणपणी आमच्या सोबत आणि त्यानंतर पोरांचं करण्यात आयुष्य घालवलेत. आता संधी आलीये तर जा. माझी काळजी नका करू. पिकलं पान, आज गळेल, उद्या गळेल म्हणून काय तुमचे आयुष्य टांगणीला लावून ठेवता. मीच म्हणालो त्यांना. मुलाने मग इथली चौकशी केली आणि सहा महिन्यांपूर्वी आलो इथे. त्यात तू भेटलीस दैवयोगाने माझ्या देखभालीसाठी. अजून काय हवे गं म्हाताऱ्याला." 

 

"नाही म्हणायला तुझ्या मुलाची आणि सुनेची तुझ्या प्रति असलेली काळजी दिसून येते मला प्रत्येक फोनकॉल मध्ये. कसून चौकशी करतात, आणि सूचना सुद्धा देतात कळकळीने. राव, परिस्थिती असते कधीकधी. नातेसंबंधात या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत सगळ्यांनी." 

 

"गॅब्रिएला, तक्रार मी करणारच नाही मुळी. बघ मी जिथे गेलो तिथे रुजलोच आहे, मला रुळायला वेळ लागत नाही. महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यातला जन्म. गावचे सावकार लोक आम्ही, पैसा रग्गड होता. थोडेफार डोके आणि जवळचा पैसा वापरून मुंबईसारख्या शहरात जेव्हा डॉक्टरीचे शिक्षण घ्यायला गेलो तेव्हा माझेच मला कौतुक वाटले. तिथे माझा पहिला मेंटर रॉबर्ट भेटला. मला म्हणाला चल अमेरिकेत. खरंतर खेड्यातून आलो तेव्हा मुंबईसुद्धा दुसरा देशच होता माझ्यासाठी. तिथे पण चांगली माणसे भेटली. मित्र-गोतावळा तयार झाला. त्यानंतर अमेरिकेत आलो. अमेरिकेने तर असं काही रुजवलं मला की काय सांगू. आज अमेरिकेत जवळजवळ गेली साठ वर्ष झाली. प्रत्येक वळणावर कसली तर आठवण आहे. चांगल्याच आहेत बहुतांशी. तक्रार म्हटली तर कुठलीच नाही."

 

"तू गायीचं वासरू बघितलंयस, हत्तीचं बछडं, हरीणाचं पाडस बघितलय? जन्म झाल्या झाल्या बघ. आईच्या पोटातून बाहेर आल्या आल्या कसं उभं रहायची धडपड करतं. आणि उभं राहतं पण! काही दिवसातच वासरू कुठलं आई कुठली सांगता येणार नाही इतके वेगळे राहतात एकमेकांपासून. माणसात बघितलंय असं कधी होताना? आपली उत्पत्ती प्रिकॉशिअल म्हणून होते; पण बौद्धिक आणि वागणुकीच्या बाबतीत आपण अल्ट्रीशिअलच आहोत. आणि ह्या बौद्धिक आणि वागणुकीच्या इम्यॅच्युरिटी मुळेच सगळे वाद निर्माण होतात. वाघिणीचं बछडं जन्मानंतर काही दिवसातच स्वतःच शिकार करायला लागतं आणि नंतर कधीच मागे वळून बघत नाही. तसं असलं की त्रास होत नाही गॅबी. नाळ तोडता आली पाहिजे माणसाला!"

 

"राव, मी सुद्धा मेक्सिकोतून जेव्हा इथे आले तेव्हा अठरा वर्षाची होते. माझा दूरचा मामा घेऊन आला होता. प्लॅन्टेशनवर काम केलं काही दिवस. त्यानेच शिक्षण पण दिले. मग नोकरी, लग्न आणि आज मुलगा कॉलेजात आहे. मागे वळून बघते तेव्हा जे माझ्यासोबत आजपर्यंत चांगले झाले त्यात थोड्याफार वाईट आठवणी असतीलही, त्या झाकोळतात चांगल्या आठवणींच्या प्रकाशात!"

 

"माणूस चांगल्यातून जेवढा शिकतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने वाईटातून शिकतो. माझा बाबा जुलूमाचा कडक माणूस. मोडेन पण वाकणार नाही बाण्याचा. त्याच्या शेवटच्या क्षणांत होतो तेव्हा बघितलंय त्याला. त्याने जवळच्यांना खूप त्रास दिला आणि स्वतःपण खूप त्रास करून घेतला. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, 

ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान॥ 

वाहिल्या उद्वेग दुखःची  केवळ। भोगणे ते मूळ संचिताचे॥

 

"तू काय बोललास ते कळलं नाही मला, पण तुझ्या भावना कळतायेत! माझं आयुष्य तसं तुझ्या निम्मंच आहे पण एवढ्या अनुभवांवरून मीसुद्धा सांगू शकते की काळ वाईट असो की चांगला, कायम राहत नाही. हा विचार करून आयुष्य जगलं कि सोपं होत सगळं अगदी." 

 

"एकदम  शंभर टक्के खरं बोललीस बघ. तू विचारलंस ना मला की तुला रिटायरमेंट होममध्ये करमतं का? खरं सांगायचं तर खूप चांगलं वाटतं मला इथे. बघ, कॉलेजात मित्रांसोबत धुडगूस घातला. रात्री जागून काढल्या, दारू प्यायलो, नाचलो. अमेरिकेत आलो, इथले लोक भावले, मनोभावे डॉक्टरी केली, जिवाभावाची माणसे मिळवली. वैवाहिक आयुष्यात बायकोसोबत मजा केली, रात्री जागवल्या पण तिच्या मांडीवर डोकं ठेवून, गप्पा मारत, आठवणी निर्माण केल्या. मुलगा झाला, त्याच्या संगोपनात दोघांचाही वेळ कसा गेला कळलंच नाही. त्यानंतर रिटायर झालो, जग फिरलो बायकोसोबत. नंतर मुलगा आणि सुनेच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत राहिलो. दोन गोंडस नातवांसोबत उतारवय घालवलं. आणि आता शेवटचा टप्पा मित्रमंडळींसोबत घालवतोय."

 

"राव, परिपूर्ण आयुष्य जगलास म्हणण्यापेक्षा हेच म्हणेन की समाधान आहे तुझ्या डोळ्यात आयुष्य जगल्याचं." 

 

"आताच बघ ना, या वयात मी जॉन, जो दुसऱ्या महायुद्धात फायटर पायलट होता, सूझी... शाळेत शिक्षिका होती, आणि मॅक्स, झेक रिपब्लिकमध्ये हेवीवेट फायटर आणि या सगळ्यांच्या गोष्टी, आयुष्यातले अनुभव ऐकायला मला फ्रंट रो सीट असते दररोज आमच्या चावडीवर. यापेक्षा चांगला वेळ जाईल का कुणाचा?" 

 

"मजा येत असेल ना राव हे सगळे जेव्हा आयुष्य कथन करत असतील तेव्हा!"

 

"परवा जॉनला म्हणालो, काय रे तू हिटलरला बघितलंस का? तर म्हणतो कसा 'राव, जर मला हिटलर भेटला असता ना तर त्याचा तिथेच कोथळा काढला असता आणि दुसरं महायुद्ध संपवलं असते तेव्हाच. आणि सूझीच्या गोष्टी तर काय सांगू तुला, तिने आजपर्यंत हजारो नागरिक घडवले या देशाचे शाळांमधून. परवा लाल दिव्याचा ताफा आला होता आमच्या रिटायरमेंट होम मध्ये. काही जास्त कळलं नाही आम्हाला पण रिसेप्शनिस्ट सांगत होती, देशाची डिफेन्स सेक्रेटरी आली होती म्हणे, सूझीची विद्यार्थिनी होती. तिला भेटायला आली होती. आणि मॅक्स.. मॅक्स बिचारा नेहमी व्हील-चेअर वर असतो, पण तारुण्यात कसे छप्पन नॉक-आऊट केलेत हे सांगताना मनगट उचलायचा खूप प्रयत्न करतो बिचारा. आता सांग मला एवढ्या रोमांचक आयुष्यपटाच्या रंगमंचाचा मी पहिल्या रांगेचा साक्षीदार या वयात. अजून काय हवंय?" 

 

"गॅबी, माणसाने कसे पिंपळासारखे असावे, जिथे जावं तिथे आपली मुळे रुजवावी आणि भरगच्च उभे राहून आनंद घ्यावा आणि आपली सावली आजूबाजूच्यांना द्यावी." 

 

रावसाहेबांचे हात-पाय जरी थरथरत असले तरी छाती समाधानाने पूर्ण भरून आहे, डोळ्यात एक चमक आहे. अगदी पिंपळासारखे उभे आहेत रावसाहेब... ज्या मातीत पाय ठेवला तिथे रुजलेले! 

 

उमेश वानखडे 

व्यवसायाने वैज्ञानिक, लिटल रॉक गावी हल्ली मुक्काम. नियमित लिहायची सवय फेसबुक वर चकटफू वाचकवर्ग लाभल्यामुळे झाली असे म्हणता येईल. दैनंदिन जीवनातले अनुभव लिहायला आवडतात. लिखाण सहसा लघु लेखांच्याच स्वरूपात करतो. "इकडचे-तिकडचे" नावाखाली एक ब्लॉग चालवतो. स्वतःला 'लेखक' पेक्षा 'वाचक' म्हणवून घेणे केव्हाही आवडेल. वाचन आणि लेखनाव्यतिरिक्त बराच वेळ माझ्या पाच वर्षाच्या मुलाबरोबर जातो. आणि उरलाच काही वेळ तर त्या वेळात लिट्ल रॉक च्या रस्त्यावर धावताना दिसेन मी.