तृ प्ती  

उल्का कडले  

'कुहू कुहू' ह्या अलार्मच्या आवाजाने तृप्तीला जाग आली. तिने मुद्दामहून कोकिळेचा आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता... खास तिच्या अलार्मसाठी! त्यामुळे ऋतू कोणताही असला तरीही तिला ही कोकिळाच उठवत असते. चौथ्या 'कुहू, कुहू'ला तृप्ती गादीत उठून बसली. हाताच्या तळव्याकडे बघत तिने 'कराग्रे वसते लक्ष्मी...' म्हटलं... तिच्या आजोबांची तशी शिकवण होती. तिने पांघरूण दूर सारलं आणि हात वर ताणून अंग शिथिल केलं. बाजूच्या मोठ्या खिडकीतून दूरवर नजर टाकली. खिडकीबाहेर प्रसन्न सकाळ डोकं वर काढत होती. 'सकाळसुद्धा अशीच आळोखे पिळोखे देत जागी झाली असणार' असा विचार करत पायात स्लीपर्स चढवून ती बाहेर आली.

 

बाहेर पडताना समोरच्या दुसऱ्या पलंगाकडे तिचं लक्ष गेलं. त्यावरचा पसारा अजूनही तसाच होता. तो मात्र कॉलेजला जायच्या आत आवरायला हवा हे तिने स्वतःलाच बजावलं; नाहीतर आईचा पारा चढणार होता. तिची दीदी लग्न होऊन सासरी गेल्यापासून तिचा पलंग तृप्तीने हा असा काबीज केला होता. दीदीला जितकी टापटीपीची आवड तितकीच ही घरभर पसारा करून वावरणारी! त्या पसाऱ्यातच तिला सगळं कसं सहज सापडायचं. हे तिने आईला कितीतरी वेळा सांगून झालं होतं. पण आईला पटेल तर ना! ओरडून, मागे लागून आई तृप्तीकडून सगळं आवरून घ्यायचीच. सकाळी कॉलेजला जाताना सगळं आवरून जायचं आणि संध्याकाळी घरी आल्यावर मनसोक्त पसरून ठेवायचं. तो रिकामा पलंग बघण्यापेक्षा असा पसाऱ्याने भरलेला पलंग तिला जास्त आवडायचा. त्या पसाऱ्याची तिला सोबत वाटायची. तिचं म्हणणं असं की पसारा हा एक छान सोबती असतो.


तृप्ती बाहेर आली तर बाबांनी नेहमीप्रमाणे 'आकाशवाणी' लावलं होतं. स्वयंपाकघरात आईची डब्यांची लगबग चालू होती. गेली कित्येक वर्षं सकाळचं लवकर उठून तिची आई नेमाने हे काम करतेय. तृप्तीला खाण्याची खूप आवड... पण स्वयंपाकाची अजिबातच नाही. आई-बाबा कधी कुठे गेले की ती मॅगी, ब्रेड-बटर, चीज सँडविच... नाहीतर मग सरळ स्वीगी, झोमॅटो ऍप्स उघडून त्यावर ऑर्डर देते. "हिचं सासरी कसं होणार ते ईश्वर जाणे! सासू कान पिळेल तेव्हा कळेलच म्हणा!" आईचा आपला त्रागा चालू असायचा; म्हणूनच हल्ली आई तृप्तीला काही ना काही काम सांगायचीच. कधी कुकर लाव, कधी भाजी चिरून दे, कधी कोशिंबीर कर अशी छोटी छोटी कामं तृप्तीला करावी लागत. पर्याय नसायचा. कधी क्लासमधून घरी यायला उशीर झाला तर मात्र ह्यातून सुटका व्हायची.


दीदी असेपर्यंत आई पाच डबे भरायची. त्या प्रमाणात रोज भाजी, चपाती; शिवाय सकाळचा नाश्ता... सगळं विनातक्रार करायचा तिचा स्वभाव! तोच तिच्या दीदीत हुबेहूब उतरलाय. पाच डब्यांपैकी बाबा दोन डबे घेऊन जातात... गेली कित्येक वर्षं! एकदा त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा शिपाई सखाराम डबा आणत नाही आणि काहीतरी फुटकळ खाऊन भूक मारतोय. तेव्हापासून बाबांनी रोज त्याच्यासाठी डबा द्यायला आईला सांगितलं आणि पाचवा डबाही भरला जाऊ लागला. मग जेव्हा सखाराम गावी जातो तेव्हा ह्या साहेबांसाठी खास गावचा मेवा घेऊन येतो. माणसाला नुसतं प्रेम करवून घेताच येत नाही. त्याची परतफेड तो आपल्यापरीने करतोच.


'किती आवडीने आणि प्रेमाने आई हे सगळं करत असते. लव यू आई!' एकीकडे दात घासत असताना तृप्तीच्या मनात हे सारं चालू होतं. ब्रश करून झाल्यावर मोबाईल चार्जिंगला लावायला तृप्ती जेव्हा तिच्या खोलीत आली तेव्हा तिला प्रसादचा मेसेज दिसला... 'मी आईला सगळं सांगितलंय. तिला तुला भेटायचंय. कधी येशील?'


तृप्तीने उत्तर दिलं... 'सांगते नंतर कधी जमतं ते.'


गेल्या आठवड्यात दीदी आली होती. दीदी आली की सोना आजी-आजोबांबरोबर झोपते आणि तृप्ती आणि दीदी पूर्वीसारख्या गप्पा मारत रात्र जागवतात. पण ह्यावेळी विशेष गप्पा झाल्याच नाहीत. रात्र जागवली गेली... ती अस्वस्थ मनामुळे... घरी आल्यावर दिदीने अनिताची बातमी सांगितल्यामुळे सगळेच सुन्न होऊन गेले होते. त्यातही तृप्ती अधिक. त्याचे पडसाद प्रसादबरोबरच्या संबंधात आणि वागण्यात उमटले होते.
प्रसाद... दिदीच्या लग्नात फोटोग्राफरसोबत असिस्टंट म्हणून आला होता... तेव्हाची त्यांची पहिली ओळख. तीही लग्नाच्या दिवशी काही नीटशी झालीच नाही. लग्नानंतर काही दिवसांनी प्रसाद अल्बम आणि पेन ड्राइव्ह घेऊन घरी आला होता, तेव्हा नीट ओळख झाली. त्यावेळी दार तृप्तीनेच उघडलं होतं.


"मी प्रसाद! अविनाशने पाठवलंय. हे लग्नाचे फोटो!"


"Wow! फोटो आले पण! आई, बाबा, दिदूच्या लग्नाचे फोटो आणलेयेत बघा."


आई-बाबा बाहेर आले तेव्हा प्रसाद दारातच उभा होता. मग आईनेच त्याला आत बोलावलं, बसायला सांगितलं आणि प्यायला पाणी दिलं. तोपर्यंत एक एक फोटो पाहून तृप्तीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया धडकत होत्या.


"लवली!"


"Wow! जीजू काय हॅन्डसम दिसतोय."


असं म्हणत तल्लीन होऊन ती सारे फोटो बघत होती. प्रसादला गंमत वाटत होती. पाणी पिऊन झाल्यावर तो उठणार तर तृप्तीच्या आईने "काय घेणार? चहा, कॉफी की सरबत?" असं विचारलं.


त्याला खरं तर काहीही नको होतं. संकोच वाटत होता. पण त्याला तिथून जावंसंही वाटत नव्हतं. कार्पेटवर फतकल मारून बसलेली, घरच्या अवतारातली तृप्ती इतकी लोभस दिसत होती की त्याला अजून थोडा वेळ तिथेच थांबावंसं वाटत होतं. म्हणून मग त्याने पटकन म्हटलं, "हं, कॉफी चालेल... पण जर का तुम्हाला त्रास होणार नसेल तरच हं."


"अहो, हिची कॉफी एकदम छान होते. त्रास कसला त्यात? आम्ही सगळेच घेऊ तुमच्याबरोबर!" बाबांनी हसत हसत त्याला सांगितल्यावर तोही थोडा सैलावला.


"थँक्स! पण तुम्ही मला प्लीज... प्रसाद हाक मारा. अहो नका हो म्हणू."


तृप्तीच्या बाबांनी हसून मान डोलावली. "बरं बरं! तू अविनाशबरोबर नेहमी असतोस का?"


"छे! छे! मी 'एम. बी. ए.'च्या शेवटच्या वर्षाला आहे. सध्या माझी सुट्टी चालू आहे. ऐनवेळी अविनाशचा असिस्टंट आजारी पडला, म्हणून त्याने मला विचारलं. अविनाश माझ्याच सोसायटीत राहतो. मला फोटोग्राफीची खूप आवड आहे हे त्याला माहितीय ना. आधीचा कसलाच अनुभव नसल्यामुळे खरं तर मी तयार नव्हतो; पण अविनाशने आग्रहच केला."


"यातले तू काढलेले फोटो दाखव ना." अचानक तृप्तीने प्रसादला सांगितलं.


"सगळे कॅण्डीड फोटो आहेत ना ते मी काढलेयेत. कॅण्डीड फोटोग्राफी ही माझी पॅशन आहे. मी आमच्या सोसायटीतल्या बऱ्याच जणांचे कॅण्डीड फोटो आमच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर शेअर करत असतो. तिथेच तर अविनाशने पाहिलेत." प्रसादने पण उत्साहात उत्तर दिलं.


"Wow! हा फोटो तू काढलायेस? सो ब्यूटिफुल! बाबा, हा बघा दिदूचा फोटो. पापणीवरचं पाणी इतकं सुंदर टिपलंय ना... कोण म्हणेल प्रोफेशनल नाही म्हणून!"


तृप्तीने असं म्हटल्यावर प्रसाद एकदम खूष! त्यात तृप्तीने 'तू' म्हटलेलं त्याला खूपच आवडलं. त्याला तृप्तीशी मैत्री व्हावी असं मनोमन वाटत होतं. लग्नात तिला पाहिलं आणि कॅमेऱ्यात टिपलं तेव्हापासून... म्हणून तर त्याने स्वतःहून अविनाशला सांगून अल्बम घरी पोचवायची जबाबदारी घेतली होती. तृप्ती घरी असावी असं वाटत असताना नेमका तिनेच दरवाजा उघडला होता.


"अगं, झालाय की तो आता प्रोफेशनल. पार्ट टाइम करियर करू शकतोस हं तू प्रसाद!" तृप्तीच्या बाबांनी तृप्तीच्या कौतुकाला दुजोरा देत म्हटलं.


तोपर्यंत आई कॉफी घेऊन आली होती. कॉफी पिताना अवांतर गप्पा चालल्या होत्या. तृप्तीने तेवढ्यात दिदीला फोन करून फोटो आल्याचं सांगितलं. कँडिड फोटोंचं विशेष कौतुक केलं.


निघताना त्याने सांगितलं, "कोणाला एखाद्या समारंभाचे कॅण्डीड फोटो काढून हवे असतील तर माझा नंबर देऊ शकता. मी अल्बमच्या मागे लिहिलाय. सुट्टी असेपर्यंत हा टाईमपास आवडलाय मला. काकांचा सल्लाही मनावर घ्यावा म्हणतोय."


खरं तर, त्याचा तसा काहीही विचार नव्हता. पण तृप्तीला फोन नंबर लक्षात आणून देण्यासाठी त्याने इतकं सगळं सांगितलं होतं. तृप्तीने "हो, कोणाला हवं असेल तर नक्की सांगेन." असं म्हटलं आणि नंतर ती विसरूनही गेली. काही दिवस असेच गेले आणि तिच्या कॉलेजमध्ये 'कॉलेज डे'ची लगबग सुरू झाली. त्यासाठीच्या नियोजन समितीची तीही एक सदस्य होती. त्यामुळे कार्यक्रमासाठी फोटोग्राफर ठरवताना तिला प्रसादचे कॅण्डीड फोटो आठवले आणि तिने त्याचं नाव आग्रहाने सुचवलं. पण खर्च वाढेल म्हणून तिला विरोधही झाला. तरीही तिने इतरांना समजावून तो खर्च संमत करून घेतलाच. मग त्या दिवशी घरी आल्यावर प्रसादला फोन केला.


"हॅलो! प्रसाद, मी तृप्ती. तू माझ्या दिदीच्या लग्नात..."


तिच्या फोनची तो कधीपासून आतुरतेने वाट बघत होता. एक ना एक दिवस ती फोन करेल अशी त्याची वेडी आशा आज खरी ठरली होती. तिने ओळख पटवून द्यायची गरजच नव्हती. त्यामुळे तिला अर्ध्यावर थांबवतच तो म्हणाला, "तृप्ती, ओळखलं मी. बोल, काय म्हणतेस?" आवाजात किंचितही अधीरता जाणवू न देता अगदी सहज बोलावं तसं तो बोलत होता.


"आमच्या 'कॉलेज डे'साठी फोटोग्राफर म्हणून मी तुझं नाव सुचवलंय. तुला न विचारताच खरं तर! तुला जमेल ना?"


प्रसादला जमत नसलं तरीही त्याने जमवलं असतं. तरीही किंचित आढेवेढे घेत असल्याचं बेमालूम नाटक करत तो तयार झाला. तृप्तीला खूप आनंद झाला. तिने घरी आई-बाबांनाही सांगितलं. त्यानंतर त्या दोघांची मैत्री दृढ होत गेली आणि त्या मैत्रीच्या कळीचं कधी प्रेमरूपी फूल उमललं ते दोघांनाही कळलं नाही. दोघांच्या घरीही अंदाज आला होता, तरी जोपर्यंत ते स्वतःहून सांगत नाहीत तोपर्यंत घरच्यांनीही गप्प राहण्याचं ठरवलं होतं.

आणि आज अचानक प्रसादने दुःखी होऊन त्याच्या आईला तृप्ती लग्न करणार नसल्याचं सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळी तृप्तीने तिचा निर्णय सांगण्यासाठी त्याला बोलावलं होतं तेव्हा असं काही ती सांगणार असेल अशी थोडीशीही कल्पना त्याला नव्हती. किती आनंदात तो तिला भेटायला गेला होता!


"प्रसाद, तू खूप वेगळ्या मूडमध्ये मला भेटायला आलायस. पण मी आता तुला जे काही सांगणार आहे ते फार महत्त्वाचं आणि गंभीर आहे."


"काय गं? सगळं ठिकाय ना घरी? तब्येत बरी आहे ना? काय झालंय? नमनाला घडाभर तेल नकोय. माझा जीव टांगणीला लागलाय. सांग लवकर."


तृप्तीने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेत पटकन सांगून टाकलं, "प्रसाद, आपण इथेच थांबूया. ह्यापुढे मित्र-मैत्रीण म्हणून राहूया. मला लग्न करायचं नाहीये... कधीच!"


तिचे शब्द झिरपेपर्यंत आणि त्याचा अर्थबोध होईपर्यंत काही सेकंद गेले असतील तेवढेच आणि प्रसादची अपेक्षित अशी प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आली.


"काssssय! असं अचानक काय झालं तुला की तू हा निर्णय घेतलास?" त्याच्या आवाजात कमालीचं दुःख आणि जबरदस्त धक्का जाणवत होता.


"हे बघ, गेले दोन दिवस मी खूप डिस्टर्ब्ड आहे. तेव्हा प्लीज आता काहीही विचारू नकोस. नाही सांगू शकणार मी. पण हा निर्णय मी खूप विचारांती घेतलाय. अजून घरीही सांगितलं नाहीय. तूच पहिला आहेस. चल, मी निघते आता. नंतर माझं मन थोडं शांत झाल्यावर बोलेन तुझ्याशी... त्यासाठी मला थोडा वेळ दे. प्लीज!" असं म्हणून तृप्ती निघूनही गेली होती.


घरी आल्यावर आईच्या नजरेतून प्रसादची अस्वस्थता लपू शकली नाही आणि त्यानेही ती लपवण्याचा कसलाही प्रयत्न केला नव्हता. रात्री झोपायच्या वेळेस आई त्याच्या खोलीत आली. आई का आली असणार, याचा अंदाज प्रसादला आला आणि त्याने काहीही न बोलता फक्त आईच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवलं. लहानपणापासूनची त्याची ही सवय आईला चांगलीच माहीत होती. त्यामुळे थोडा वेळ तिने त्याला शांत होऊ दिलं. केसांतून, कपाळावरून अलगद हात फिरवत ती त्याला आधार देत राहिली.


"आई, मी आणि तृप्ती गेले कित्येक दिवस भेटत होतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे." आपण जो अंदाज केला तेच स्वतःहून प्रसादने सांगितलं म्हणून तिला आनंद झाला, पण मग हे असं दुःखी होण्याचं कारण काय असावं ह्याची काळजीही वाटली. "आई, अगं लवकरच तिची मास्टर्सची परीक्षा झाल्यावर आम्ही घरी सांगणारच होतो. लग्न करायचं असं ठरवलं होतं." प्रसाद हे सगळं असं भूतकाळात का सांगतोय, या विचाराने आई कासावीस झाली.

 

"पण आज तृप्तीने सांगितलं की तिला लग्नच करायचं नाहीये. कारणही नाही सांगितलं. मला काहीच कळत नाहीये गं. किती स्वप्नं बघितली होती आम्ही!"


आईचा जीव प्रसादसाठी तुटत होता. डोळ्यांतून पाणी आलं, घशातून हुंदका आला म्हणजेच रडू येत असतं असं  नव्हे. तसं काहीही होत नसतानाही मन मात्र आक्रंदत असू शकतं. प्रसादचं आज तसंच काहीसं झालं होतं.


"माझं एक ऐकशील? तिला 'आईने बोलावलंय' म्हणून निरोप दे आणि तेव्हा तू इथे राहू नकोस. मला एकटीलाच बोलायचंय तिच्याशी."


प्रसादला आईबद्दल पूर्ण खात्री होती. त्याने उठत मानेनेच होकार देत हुंकार भरला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याने लगेच रात्री तिला मेसेज पाठवला होता.


दोन दिवसांनी संध्याकाळी डान्स क्लास नसल्यामुळे तृप्तीने प्रसादच्या आईला भेटायला जायचं ठरवलं. त्याप्रमाणे तिने प्रसादला निरोपही पाठवला. प्रसादचं उत्तर आलं की ती जाऊ शकते पण त्याला आज खूप काम असल्यामुळे तो काही घरी लवकर येऊ शकणार नव्हता. तिला उलट बरंच वाटलं... तिला त्याच्या आईशी मोकळेपणी बोलता आलं असतं. मात्र प्रसादच्या आईकडे जायचंय आणि त्या काय बोलणार आहेत याचा अंदाज असल्यामुळे तिला एक प्रकारे दडपण आलं होतं. मनातल्या मनात आपलं म्हणणं कसं सांगायचं किंवा पटवून द्यायचं याची रस्ताभर उजळणी करत ती प्रसादच्या घरी कधी पोचली ते तिलाही कळलं नाही. दारावर त्यांच्या नावाची पाटी प्रसादच्या सुंदर हस्ताक्षरात होती. प्रसाद कॅलिग्राफी शिकला होता. तिने वेगवेगळ्या प्रकारे तिचं नाव त्याच्याकडून लिहून घेतलं होतं ते तिला आठवलं.


बेल वाजवल्यावर प्रसादच्या आईने दरवाजा उघडला. प्रसादची आई… हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्त्व! चेहऱ्यावर स्निग्ध भाव. आईने हाताला धरून तृप्तीला आत नेलं.


"बस, दमली असशील ना! थांब, कोकम सरबत आणते." असं म्हणत आई आत गेली आणि सरबत करून घेऊन आली. मग तिने खिडक्या बंद करून ए. सी. चालू केला आणि तृप्तीच्या बाजूला येऊन बसली.


"काय म्हणतेस? कसा चाललाय तुझा अभ्यास?"


"ठीक चाललाय. आता परीक्षा जवळ आलीय."


"मग आता ऐन परीक्षेच्या तोंडावर तू अचानक असा निर्णय घेतलायेस म्हणजे तसंच खास कारण असणार. हे बघ, मी तुला जी ओळखते ती प्रसादच्या नजरेतून. पण जेवढी ओळखते त्यावरून तू खूप समजूतदार आहेस ह्याची खात्री आहे. तरीही वय लहान असलं ना की त्या लहानशा वयात आपण काही निर्णय घाईघाईत अविचाराने घेऊ शकतो आणि मग आयुष्यभर पस्तावत राहायची पाळी येऊ शकते. तसं काही होऊ नये म्हणून मी तुला बोलावून घेतलंय. प्रसाद म्हणाला की तुझ्या आई-बाबांना तू काहीच सांगितलं नाहीयेस अजून, नाहीतर हे काम त्यांनीच केलं असतं बघ."


तृप्ती त्यांच्या त्या शांत, समजावणीच्या स्वरातला प्रत्येक शब्द नीट मनापासून ऐकत होती. त्यांच्या आवाजातील मार्दव आणि त्यांचा अनुभव यांमुळे तिला त्यांच्याशी बोलायला कसलीच हरकत नव्हती.


"काय झालंय ते सविस्तर सांगशील का?"


"जे माझ्या मनात आहे ते मी कसं आणि कितपत मांडू शकेन माहीत नाही आणि तुम्हाला माझा मुद्दा पटेल की नाही तेही नाही माहीत. पण प्रयत्न करते."


"अगं, मी समजून घेईन. तू त्याची काळजी नको करूस. तू मोकळेपणी बोल."


"मी अगदी तान्ही असताना माझी आजी गेली आणि मग बाबांनी आजोबांना त्यांच्या मनाविरुद्धच मुंबईला आणलं होतं. त्यांना गावी एकटं ठेवायला बाबा तयार नव्हते. कुरकुरत आलेले आजोबा माझ्यामुळे इथे अगदी छान रमून गेले. आई-बाबा ऑफिसला जायचे आणि दिदी शाळेत जायची. त्यामुळे सतत आम्ही दोघे एकत्र असायचो. त्या काळात त्यांचा परोपकारी स्वभाव फार जवळून अनुभवला आणि नकळतपणे ते संस्कार त्या बालवयात माझ्यावर झाले असावेत. सॉरी, मी फार लांबण लावलीय ना?"


"नाही गं, सांग तू."


"मी हे सगळं सांगितलं कारण मी आता जे सांगणार आहे त्याचा पाया माझ्या त्या संस्कारात आहे असं मला कायम वाटतं. तर... पुढे कॉलेजमध्ये असताना मी एन. एस. एस. मध्ये सहभागी झाले. खूप ऍक्टिव्ह असायचे. नंतर मास्टर्स करत असताना एका ग्रुपशी ओळख झाली. वेगवेगळ्या वयातले उत्साही, सामाजिक कार्य करणारे… आणि मनाने तर सारेच तरुण! सध्या आम्ही एक महत्त्वाचा उपक्रम राबवतोय. दर शनिवार-रविवार जवळच्या खेड्यात किंवा आदिवासी पाड्यात जाऊन तिथल्या मुलांना शिकवायचं; तेही स्वखर्चाने! पण ते शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसतं हं, तर व्यवहारज्ञान, विविध कला यांची ओळख करून दिली जाते. शहरांत हे सहज उपलब्ध असतं; शिवाय बऱ्याच जणांना आर्थिक दृष्ट्याही शक्य असतं. परंतु ज्यांच्यापर्यंत या सुविधा सहजी पोचत नाहीत त्यांनी आयुष्यभर वंचित का राहावं या विचाराने हा उपक्रम सुरू केलाय. वयाचं बंधन नसलं तरीही प्रौढ सहसा सहभागी होण्यास उत्सुक असतीलच असं नाही पण आपल्या मुलांना मात्र हौसेने पाठवतात. अशा एखाद्या मुलाचा/मुलीचा जर का विशिष्ट कलेकडे अधिक कल दिसून आला ना तर त्याला त्यात वेगळं प्रशिक्षण दिलं जातं. जसं की सध्या मी तिथल्या चार मुलींना नृत्य शिकवतेय."


"तू जातेस ते प्रसादला माहितीय का? नाही, म्हणजे तो कधी म्हणाला नाही तसं काही मला, म्हणून विचारतेय."


"हो, म्हणजे मी काहीतरी सोशल-वर्क करते असं मोघम माहितीय त्याला. शनिवार-रविवार भेटू शकत नव्हते ना! पण त्याने कधी फार चौकशी केली नाही आणि मीही स्वतःहून काही सांगितलं नाही. इतर बरेच विषय असायचे गप्पा मारायला. पण..."  तृप्ती बोलता बोलता थोडीशी थांबली.


"पण काय? त्याने यावं अशी तुझी अपेक्षा होती का?"


"नाही, नाही. कारण नात्यात खूप अपेक्षा ठेवल्या की त्या नात्याचं ओझं होऊ लागतं. त्यामुळे आम्ही दोघांनी ते आधीच ठरवलं होतं की एकमेकांना स्पेस द्यायची. अपेक्षांचं ओझं लादायचं नाही आणि वाहायचंही नाही."


"अरे वाह! व्हेरी गुड! मग हा 'पण' कसला?"


"'पण' म्हणजे... आताशा मात्र मला भीती वाटतेय. तो नेहमी तुम्ही कशी त्याच्यासाठी नोकरी सोडली ते सांगत असतो. त्याला त्याचं खूप कौतुक वाटतं."


"अगं, ते काय तू मनावर घेतेस? तुलाही असेल ना तुझ्या आईचं कौतुक... ती नोकरी करून घर सांभाळते म्हणून. प्रत्येकाला असतं अगं आणि ते असूही द्यावं."


"नाही, म्हणजे ते कारण नाहीय. कसं सांगू?" एक क्षण थांबून तृप्ती म्हणाली, "अनिता माझ्या दिदीची अतिशय जवळची मैत्रीण. तिचं शाळेमध्ये असल्यापासून एका मुलावर प्रेम होतं. त्याचंही होतं. दोन्ही घरच्या पसंतीने लग्नही झालं. लग्न झालं तेव्हा अनिता सब-इन्स्पेक्टर होती. सासरच्यांना अगदी कौतुक वाटायचं पोलीस खात्यातली सून आहे म्हणून. पण नंतर तिच्यावर असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, अवेळी ड्युटीवर जावं लागणं याने कुरबुरी सुरू झाल्या. तिचं हे स्वप्न तिने जिद्दीने पूर्ण केलं होतं आणि म्हणून ती त्या साऱ्या कुरबुरींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती. तिच्या मेहनतीमुळे तिला तसं लवकरच प्रमोशन मिळालंय आणि ती आता इन्स्पेक्टर झालीय. पण त्यासाठी तिला नागपूरला जावं लागणार आहे. सासरच्यांचा एकदम विरोध आहे. एकेकाळचा प्रेमी नवरा तर आता पार बदललाय. घरच्यांचीच री ओढत असतो. तिने तरीही "मला जायचंच आहे" असं ठासून सांगितलं तर घटस्फोटाची धमकी दिलीय. हे सगळं दिदीने सांगितलं ना ते ऐकून तर दोन-तीन दिवस आम्ही सगळेच सुन्न झालोय. इतकी टोकाची भूमिका ते कशी काय घेऊ शकतात. हे एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग नाही का?"
"हे फारच वाईट होतंय. मला सांग... हे ऐकल्यावर तू ठरवलंस का की लग्नच करायचं नाही म्हणून?"


"हो, म्हणजे... मी सध्या जे काम करतेय ते किंवा त्या प्रकारचं इतर काही ना काही सामाजिक काम मी आयुष्यभर करत राहणार. नोकरी ही अर्थार्जनासाठी आणि हे काम मानसिक समाधान, आनंद यासाठी करणार. तो आनंद उद्या कोणी हिरावला तर ते मला सहन नाही होणार. माझ्या सुखाची परिपूर्ती त्या आनंदात आहे. हे प्रसादला सांगून कदाचित पटणार नाही किंवा आज त्याला प्रेमापोटी पटेल आणि उद्या त्याच गोष्टीचा त्रास होईल. मला भीती ही वाटतेय की तुमच्यासारखंच मीही घरी राहावं अशी अपेक्षा तो करेल आणि जर तसं झालं तर दोघांचंही आयुष्य वेगळंच वळण घेईल. मग फक्त क्लेश, मनःस्ताप आणि दुःख याशिवाय काहीच उरणार नाही."


"किती गं विचार केलायस! मला फार, फार अभिमान वाटतोय तुझा... तुझ्या ह्या कामाचा. मी तुला कायम साथ देईन. इतकंच नव्हे, मी खात्रीने सांगते की तू जर प्रसादला हे नीट समजावलं असतंस तर तो स्वतः तुझ्याबरोबर आला असता. तो आला तर त्यांना चित्रकला, कॅलिग्राफी, फोटोग्राफी शिकवेल; शिवाय तुम्हा सर्वांचे सुंदर फोटोही काढेल. तुमच्या त्या एकमेकांना स्पेस द्यायच्या नादापायी त्याने तुला विचारलं नाही आणि म्हणून तूही त्याला काही नीट सांगितलं नाहीस."


"तुम्हाला खरंच वाटतं की प्रसादही येईल?" तृप्तीने आनंदाने विचारलं.


"हो तर! मी नीट ओळखते त्याला. असं काम कोणी करत असेल तर त्याला आपला हातभार लागला पाहिजे असं नक्कीच तो म्हणणार. तुझ्यावर जसे तुझ्या आजोबांचे चांगले संस्कार आहेत ना तसेच प्रसादवरही आम्ही केलेयंत म्हटलं." त्या हसत हसत म्हणाल्या.


"नाही हो, तसं नव्हे. मुळात शिक्षण, नोकरी, लग्न, मूल या चाकोरीबाहेर बघता आलं पाहिजे. ती चाकोरी स्वार्थ बनून इतर काही करावं म्हटलं तर त्यात जर का अडथळा ठरत असेल तर तसं मात्र मला माझ्याबाबतीत अजिबात होऊ द्यायचं नाहीये. माझं आर्थिक स्वावलंबन आणि हे काम करण्याचं स्वातंत्र्य मला गमवायचं नाहीये."


"मला तुझा मुद्दा कळलाय आणि पटलाय. पण मी काय सांगते ते नीट ऐक. आजवर तू आई-बाबा यांच्या छायेत, लाडकोडात वाढली आहेस. त्यांचं प्रेम उपभोगताना हे वेगळं काही तू करू पाहतेस तेव्हा तुला त्याचं कौतुक वाटतंय. हे करताना तुला तुझ्या कुटुंबाचं पाठबळ आहे हे विसरू नकोस. उद्या जर का एकटीने तू ह्या कार्यात झोकून द्यायचं ठरवलं तर हीच उमेद राहील का? कदाचित हो आणि कदाचित नाहीही राहणार. तेव्हा एकटीने हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षा प्रसादला विश्वासात घेऊन त्याच्या साथीने पेललंस तर अधिक ताकदीने, दुप्पट जोमाने तू हे निभावू शकशील. बघ पटतंय का?"


"हो, आई!" आणि तृप्ती एकदम लाजली कारण तिने अनवधानाने, अगदी सहजपणे प्रसादच्या आईला 'आई' म्हणून हाक मारली होती. आईने तृप्तीला जवळ घेऊन मायेनं थोपटलं.


"आई, मी निघू का? मला हे सगळं प्रसादशी कधी एकदा बोलतेय असं झालंय. मी नंतर पुन्हा येईन."


"हो बाई, जा तू. तो बिचारा रडवेला झालाय. त्याला हे सगळं नीट सांगून ताणातून मोकळं कर. आणि हो, यापुढे असे महत्त्वाचे निर्णय घाईघाईने आणि अविचाराने घ्यायचे नाहीत म्हणून कानाला मोठा खडा लाव बघू."


"हा बघा लावला." असं म्हणत आपला कान पकडत तृप्ती हसत हसत बाहेर पडली.

उल्का कडले  

मी उल्का कडले. जानेवारी, २०१५ पासून मी लिहायला सुरुवात केली.  सुरुवातीला Quora वर लिहित होते. त्यानंतर आता फेसबुकवर नियमितपणे लिहितेय. ‘लोकसत्ता-चतुरंग आणि झी दिशा मराठी’मध्ये कथा आणि ललित लेखन प्रकाशित झालंय. मी मुंबई आकाशवाणीवर ‘ऐसी अक्षरे रसिके’मध्ये माझ्या ललित लेखांचं आणि ‘साहित्य सौरभ’मध्ये माझ्या कथांचं अभिवाचनही केलंय.  डिसेंबर, २०१६ पासून मी ’मामबो’ची सभासद आहे.