बिन नॉस्टॅल्जियाचा  माणूस  

 

उदयन आपटे

अमेरिकेत नेहमी होणाऱ्या स्थानिक मराठी कलाकरांचा गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. ह्या कार्यक्रमांची रूपरेषा नेहमीच स्थानिक लोकांना कोणती गाणी येतात त्यानुसार ठरते. येणारी गाणी आणि उपलब्ध वाद्यसंच ह्यांचा मेळ घालून मग त्याभोवती एखादी प्रमुख संकल्पना उभी करतात. ह्या प्रकरणात एक ठरलेलं गाणं म्हणजे स्वा. सावरकरांचं ‘ने मजसी ने’. त्या अद्भुत माणसानं एका विशिष्ट काळात लिहीलेलं ते अप्रतिम काव्य आपली भारतीयत्वाची नाळ अजूनही तुटलेली नाही हे दाखवण्यासाठी अनिवासी भारतीय सर्रास वापरतात. गाणं चालू झालं आणि शेजारी बसलेल्या मित्राला मी म्हणालो,

 

‘भारतात गेलो आणि समुद्र दिसला की मला हे गाणं कायम आठवतं’. माझी कुजबुज सौ. अन्नपुर्णा धोंडो जोशींसारखी दोन चार रांगांना ऐकू जाणारी असल्याने काही तीव्र सणसणीत कटाक्ष मला भाजून गेले. स्वातंत्र्यसमरातील त्या विलक्षण भावनिक काव्याला आता एवढ्या वर्षांनी वेगवेगळ्या कारणांसाठी आपला गाव, माणसं, देश मागे सोडून आलेल्या अनिवासी मराठी भारतीयांमधे एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे. त्यांच्यासाठी हे गीत नॉस्टॅल्जिया ॲंथम बनलं आहे.

 

इंडीयन-अमेरिकन, मराठी-अमेरिकन अशा “हायफनेटेड आयडेंटिटी” किंवा “जोड ओळख” असणाऱ्या समाजात पूर्वायुष्यातल्या रम्य आठवणी हा एक मोठा भावनिक आधार असतो. भाषा, खाद्यपदार्थ, खेळ, वांग्ड़मय, संगीत, करमणूक (नाटकं-सिनेमा), मुलांना वाढविण्याची पद्धत, सहकाऱ्याशी असलेलं नातं या आणि अशा प्रत्येक गोष्टीत इथलं-आत्ताचं आणि तिथलं-तेव्हाचं अशी आंतरीक आणि बऱ्याच वेळा प्रगट तुलना करणं हा जोड ओळखीच्या भारतीयांच्या (आणि बहुदा सर्वच अशा लोकांच्या) स्वभावाचा एक भाग असतो. अनेक जोड ओळखवाले नव्या राज्यांत डाव तर मांडतात पण रुजत नाहीत कारण ह्या पूर्वायुष्याबद्दल च्या रम्य कल्पनांच्या सावलीत नवे अंकुर तग धरत नाही. असे जीव नऊ ते चार अमेरीकेत आणि बाकीचा वेळ भारतात राहातात. आजच्या सुपरफास्ट कम्युनिकेशनच्या युगात हे सहज शक्यही असतं. घरी मराठी टिव्ही “स्ट्रीम” होत असतो, पहाटे क्रिकेट, रात्री ‘तुपारे’ सतत चालू असतं. गाणारे, वाजवणारे, नाटकवाले वर्षभर दौरे करतात. आणि हे सारं सरल्या दिसांच्या आठवणी जागृत ठेवू शकतात.

का कोणास ठाऊक पण मला हा त्रास फार कमी होतो. म्हणजे नॉस्टॅल्जियाचा. म्हणजे मला नॉस्टॅल्जिया नाही असं अजिबात नाही. अजूनही “आनंदराव” सॅंडवीच, सांगलीच्या अनुराधा किंवा कोल्हापूरच्या ओपल मधला पांढरा-तांबडा रस्सा, ताडोबातलं व्याघ्रदर्शन आणि सगळ्यात जास्त सांगलीच्या ‘भावे’चा तो रंगमंच हे पट्कन एका वेगळ्या विश्वात घेऊन जातं. पण फक्त काहीच क्षणांसाठी. पुढच्याच क्षणी ‘कॅन्सस सिटी जो’ च्या “झी मॅन” नं आनंदरावच्या अंडा सॅंडविचची, अलादिनच्या चिकन श्वावर्माने तांबडा-पांढऱ्याची, कोलोरॅडो रॉकीजमधल्या इंडीपेंडन्सपासनं ताडोबाची आणि एडवर्ड्स कॅंम्पसमधल्या साध्यासुध्या रेनियन ऑडिटोरियमनं भावेची जागा घेतलेली असते. कदाचित ह्यामुळेच ‘हे छान आहेच पण इंडीयाची “मजा” नाही’ हा ताप मला कधीच येत नाही आणि ज्यांना येतो त्यांचं दु:ख मला समजतही नाही.

अमेरीकेत गेल्या एकवीस वर्षांत आम्ही चार गावात राहीलो. सध्याचं आमचं घर हे आमचं बारावं वसतीस्थांन आहे. प्रत्येक वेळेला ‘मूव्ह’ होताना वाईट वाटलं, मित्र, सगेसोयरे दूर गेल्याचं दु:ख निश्चितच झालं. पिट्सबर्गहून कॅन्ससला येताना अनघाताईच्या गळ्यात पडून मी लहान मुलासारखा रडलोही होतो. अजूनही त्या प्रत्येक जागांच्या आठवणी खुप छान आहेत. पण म्हणून कॅन्ससमध्ये प्रती-पिट्सबर्ग उभा करावा असं नाही वाटलं. कारण ते शक्यच नाहीये. मनात सांगली, पुणे, मनरो, पिट्सबर्ग ह्याचे वेगवेगळे कोपरे आहेत. त्यातली पात्र, नेपथ्य वेगळं आहे. इकडचे तिकडे नाही चिकटवता येत. पण सतत पुढं जात रहाणं, आनंदानं नव्या ठिकाणी रुजणं शक्य झालं; कारण मन जुन्या आठवणींत रुतून राहिलं नाही.

 

मला आज, आत्ता, इथे जगणं आवडतं. कालचा पदर धरून आजचा पोशाख चढवायला नाही आवडत. कारण मग वर ब्लाऊज आणि खाली पॅंट असा धेडगुजरी प्रकार होतो. पण हे मुद्दाम होत नाही सहज होतं. पुर्वी मला आपल्याला इतरांसारखी भारतातल्या प्रत्येक गोष्टीची सतत आठवण येत नाही ह्याचं वाईट वाटायचं. आपलं काहीतरी चुकतंय असं वाटायचं. मग जाणवलं की ही नैसर्गिक भावना, ऑरगॅनिक इमोशन आहे. भूतकाळ विसरायला तो वाईट वगैरे अजिबात नव्हता. माझं बालपण आणि सुरुवातीचं तारुण्य अतिशय आनंदात गेलं पण म्हणून तेच कवटाळून बसणं, नव्या नेपथ्यावर तेच जुनं संगीत वापरून आजची नवी संहीता उभी करणं शक्य नाही झालं. मग साहजिकच नेपथ्याबरेबर संगीत, संवाद, शब्द सहज बदलले. एकदा जे घडतंय ते ओढून ताणून केलेलं नाही किंबहुना ते थांबवणं हे अनैसर्गिक आहे हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा एक प्रचंड दडपण गेलं, मोकळा श्वास ऊरात भरला आणि नवे, आजचे, आत्ताचे अनुभव मनापासून जगता येऊ लागले.

कॅन्सस मधील हिवाळ्यातली एक रम्य पहाट 

ह्या प्रक्रियेची सुरवात झाली ती पुलंच्या एका भाषणाने. मला वाटतं १९८२-८३ च्या दरम्यान झालेल्या बृह्नमहाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनातलं पुलंचं ते अध्यक्षीय भाषण होतं. नॅप्स्टर च्या काळात मला अचानक त्याचं ध्वनीमुद्रण मिळालं. अमेरिकेत रहाणाऱ्या मराठी लोकांनी मराठी संस्कृती जपण्यासाठी काय करावं हा विषय. आपल्या संस्कृतीचा अभिमान जरूर असावा पण दुराभिमान नको असा विचार त्यांनी नेहेमीच्या विनोदी शैलीत मांडला आहे. पुलंनी अमेरिकेत भेटलेल्या एका मराठी गृहस्थांची कथा सांगीतली आहे. ह्या महाभागानं पुलंना मराठी संस्कृत टिकवण्यासाठी परदेशस्थ भारतीयांना काय करावं? असं विचारून वीट आणला होता. पुलंच्या कुठल्याच उत्तरानं त्यांचं समाधान होत नव्हतं. बऱ्याच चर्चेनंतर ते वैतागून पुलंना म्हणाले ‘हे काय, तुम्हाला मराठी संस्कृतीची काहीच काळजी वाटत नाही??” त्यांवर पुल म्हणाले “तुम्हाला मराठी संस्कृतीच जपायची आहे तर वॉशिंग्टन सोडून वाईला जाऊन रहा. मराठी संस्कृती जपण्याशिवाय दुसरा उद्योगच उरणार नाही”. ह्यातला विनोदाचा मुलामा उतरवून आतला सोन्यासारखा विचार पाहणं महत्त्वाचं. नव्या जगात रुजताना ओळख विसरू नये पण जुनी जोखडं मात्र झुगारून द्यावी हा विचार त्या द्रष्ट्या माणसानं फार सुंदर पटवून दिला. त्यातूनच मला नुसतंच मराठी नाटक न करता मराठी-अमेरिकन नाटक करावं हा विचार सुचला जो डॉ. प्रियदर्शन मनोहरांच्या संहितामुळं सुदैवाने रंगमंचावर उतरवताही आला.

द बिग बँग थिएटर ह्या आमच्या नाट्यसंस्थेच्या "दे टाळी" या धमाल विनोदी नाटकाची टीम 

 

मला वाटतं नॉस्टॅल्जियात अडकलेल्या मराठी-अमेरिकन समाजात सगळ्यात हाल होतात ते इकडे वाढणाऱ्या मुलांचे. आईबापांच्या रम्य आठवणींची ओझी वाहाताना ही बिचारी पोरं स्वत:ची ओळख विसरतात. आपण ज्या संस्कृतीच्या साच्यात वाढलो त्यातच आपल्या मुलांना कोंबून स्वत:चं समाधान करणारे पालक पाहिले कि त्या मुलांची कीव येते. अर्थात स्वत:ला आवडतं म्हणून मनापासून वाकडी वाट करून भारतीयत्व जाणणारी मुलं आणि त्यांचा सार्थ अभिमान असणारे पालक हे अपवाद आहेतच. पण ते अपवादच आहेत. ह्याबाबतीतही वर उल्लेख केलेल्या भाषणात आलेलं पुलंचं मत फार वेगळं आहे. पुल म्हणतात एक वेळ तुमच्या मुलांना पंडीतजींची बांसुरी भावणार नाही पण जर मोझार्ट ची सिंफनी मोहून टाकत असेल तर काही वाईट झालं नाही. आपल्या परंपरेची जाण असणं, त्याचा न्यूनगंड न बाळगता ते काळवेळ पाहून साजरा करणं हे परिपक्वतेचं लक्षण आहे परंतु त्याची अकाली-अकारणी बांधलेली पूजा मात्र दांभिकपणाचं आहे.

आता मला कशाचाच नॉस्टॅल्जिया नाही ह्याचा त्रास होणं बंद झालंय. रोज कोरी पाटी घेऊन नव्या अनुभवांची अक्षरं गिरवायची सवय झाली आहे आणि उद्या पुन्हा ती पाटी पुसून नवी अक्षरं लिहायला मिळणार ह्याची खात्रीही आहे. मी एक बिन नॉस्टॅल्जियाचा माणूस आहे आणि म्हणून मला नव्या जागी रुजणं सोपं झालंय.

उदयन आपटे

मुळ गाव सांगली. शिक्षण मुख्यत: सांगली, कोल्हापूर आणि अमेरिकेतील लुईझीयाना राज्यातील मनरो या गावी. विषविज्ञान आणि यकृत शास्त्रात पीएचडी. सध्या अमेरिकेतील कॅन्सस राज्यातील कॅन्सस सिटी ह्या गावी असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅन्सस मेडिकल सेंटर मधे शिक्षक-संशोधक म्हणून कार्यरत. मुख्य छंद “नाटकं” करणे. अमेरिकेत पंधरा वर्षांपासून मराठी नाटकं सादर केली आहेत. कॅन्सस सिटी मध्ये गेली सात वर्ष सक्रिय असलेल्या ‘दि बिग बॅंग थिएटर’ ह्या नाट्यसंस्थेचा एक संस्थापक. लिहावाचायला लहानपणीच शिकला पण अलीकडे लोकं सहन करतात म्हणून लिहीलेलं लोकांना वाचायला देतो.