सु ख च कि त

 

स्वाती  सुरंगळीकर  

(दिवसाला चार मैत्रिणी. सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र. प्रत्येकीला भेटण्याची त्याची वेळ ठरलेली. पण वर्षा ऋतुत हा खट्याळ पाऊस; त्याच्या वेळापत्रकाची पार वाट लावतो. त्यामुळे मैत्रिणी रुसतात पण एक मात्र सुखावते.)

वस्त्रे नेसून प्रकाशाची

उगवला दिवस
त्याला चिडविण्या आला
धावून पाऊस.

 

शुभ्र वसनावर
डाग श्यामल घनांचे
क्षणार्धात उदासले
तन मन दिवसाचे.

प्राची रागावली
परतली होऊन लाल
दिवसाच्या हाती होता
तसाच गुलाल.

अंधारल्या दाही दिशा
दिवस आळसावला
टाळून दुपारीला
संध्येच्या घरी आला.

स्वागताला दिवसाच्या
नव्हती तयार सांज
म्हणे शृंगार होऊदे
तसाच दारी थांब.

वैतागून दिवस
थेट निशेकडे गेला
सुखचकित ती ! म्हणे...
सखा ; वेळेआधी आला!
सखा वेळेआधी आला !!

स्वाती  सुरंगळीकर  

 

लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रमात रुची. उच्च शिक्षणानंतर काही वर्ष कॉलेजात अध्यापन. वयाच्या चाळिशीत कवितेशी मैत्री झाली. तीन कवितासंग्रह आणि चारोळीसंग्रह प्रकाशित. माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून कविता सादर करण्याची विशेष आवड. "दिलखुलास" या काव्यसादरीकरणाच्या एकपात्री कार्यक्रमाचे देशविदेशात अनेक प्रयोग केले. काव्यवाचनाची ध्वनिफीत,ऑडियो सिडी आणि एकपात्री काव्यसादरीकरणाची DVD प्रकाशित.