न व्या ने  रु ज णा रे  मा य -बा प 

 

स्वागत पाटणकर 

पूर्वी पाच पाच दिवस टीव्हीसमोर बसून टेस्ट मॅच बघणाऱ्या एका दर्दी क्रिकेट फॅनला 'द्रवीड्सारखाच आपल्याकडे पण खूप पेशन्स आहे' हे असं काहीतरी नेहमीच वाटत असतं. त्याची 'ती' त्याला 'हो' म्हणायला महिने महिने वाट बघायला लावते तरी हा शांत उभा असतो. आपला 'तो' खरोखरीच संयमी स्वामीरुप आहे असं तिला लग्नानंतर वाटू लागतं. हे सगळं वाटणं ही एक अंधश्रद्धा असते. गोड गैरसमजाने वेढलेली अंधश्रद्धा!

 

लग्न होतं, दिवस जातात आणि बाळ आलं घरात की सगळं पितळ उघड पडतं. संयमी वाटणाऱ्या त्याच्याकडून जास्तीत जास्त सतरा मिनिट्स बाळाचं ते मोठ्यांदी रडणं सहन केलं जातं आणि अठराव्या मिनिटाला आई-आज्यांकडे बाळाला सुपूर्त केलं जातं.

बाळ घरी आल्यावर काही काही चांगले बदल मात्र ऑटोमॅटिक होतात. आयुष्यात कधीच 'अजिबात वायफळ बडबड न करणारी आई' आता बाळाला झोपवताना काहीही बोबड्या ,वाकड्या गप्पा मारत असते, इतक्या वर्षात कराओके समोर एक ओळसुद्धा न गाणारी आता सुरांची आईमाई एक करत का होईना पण अंगाई गीतं गात असते.

तसंच बाबा सुट्टीच्या दिवशी सुद्धा सकाळी स्वच्छ अंघोळ करायला लागतो, हातापायाची नखं वेळेत कापायला लागतो. त्याला वर्षानुवर्षे जी गोष्ट सांगण्यात त्याच्या आई बाबांचे केस पांढरे झाले ती गोष्ट बाळ झाल्यावर त्याला आपसूक कळून जाते.

"बाळाला उजव्या बाजूनी कडेवर घेतलं कि बरोबर झोपतो, त्याला ना दुपारी तासभर पाळण्यात खूप आवडतं, अमुक अमुक गाणं लावलं की हा एकदम खूप आनंदात असतो" वगैरे वगैरे आपल्याला 'वाटणं' ह्या सगळ्या अंधश्रद्धा असतात. ते इवलसं बाळ प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळंच लॉजिक अप्लाय करत असतं आणि आपली परीक्षा घेत असतं. विशेष म्हणजे त्याला काय हवंय हे आपल्याला समजलंय हा आपला कॉन्फिडन्स हा 'ओव्हर कॉन्फिडन्स' आहे हे क्षणोक्षणी ही बाळं प्रूव्ह करत असतात.

पहिल्या महिन्यातच हे बाळ इन्डायरेक्ट मेसेंजर बनतं. 'आई बाळाला बोले आणि बाबांना कळे' असं काहीसं होऊन जातं.

 

"योऊऊऊ आता आपला बाबा भांडी घासणार ए" ..चालला लगेच बाबा भांडी घासायला.

"अल्ले ले ले, आज बाबा स्वैपाक करणार ए " हे ऐकल्या ऐकल्या मात्र बाबा लगेच बाहेर ऑर्डर देऊन टाकतो.  

अशा अनेक गमती जमती घडतात आणि हे सगळीकडे घडत असतं. नव्याने रुजणारे पालक क्षणोक्षणी काही ना काही शिकत असतात. ते नवीन आलेलं फूटभर उंचीचं पिल्लू सतत त्यांना शिकवत असतं. त्यांना सरळ करत असतं. त्यांचा पेशन्स चेक करत असतं. नाईट लाईफ पार्टीजची सवय असलेले दोघे आता मध्यरात्री उठून डायपर चेक करत असतात. पिल्लूसुद्धा लै बाराचं असतं. स्वतः रात्रभर जागतं. आईबापालासुद्धा जागवतं आणि सकाळी जणू काही घडलंच नाही अशा आवेशात शांत झोपून जातं. 

घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक डिसिजनमागे आता 'बाळ' नावाचा अँगल ऍड होतो. एक बेडरूमवाले आता दोन बेडरूमची घरं बघतात . बाईक वाले नवीन कार आणतात. टीव्ही सदैव म्यूट आहे ना ह्याची खात्री केली जाते. बेलचं बटण बंद केलं जातं. बाळाच्या झोपेच्या वेळेनुसार कूकर लावण्याची वेळ अड्जस्ट केली जाते. खोलीचं दार हळूसुद्धा लावता येतं हे आता समजायला लागतं. बाळसुद्धा अति शहाणं असतं. फटाक्यांच्या आवाजांनी देखील उठत नाही पण एक चमचा वरून पडला कि भोकाड पसरायला लागतं.  

 

'बाळ घरी आल्यावर कसे दिवस संपतात काही कळतच नाही' पूर्वी ऐकलेली ही वाक्य धादांत खोटी असतात हे समजायला लागतं. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र समजून गेलेली असते. एकेक सेकंदाची झोप महत्त्वाची ठरलेली असते. सगळं जग बदलून गेलेलं असतं. आई नऊ महिने त्या बाळाबरोबर असते. नवीन बाळाचं घरी येणं आणि मग नवीन झालेल्या आई-बाबानी बाळामध्येच  गुंतून जाणं एखाद्या फ्लो नुसार घडत असतं. जन्मानंतर बापाला काही सुधरत नसतं पण बर्थ सर्टिफिकेटच्या फॉर्मवर फादर-मदर नेम लिहिताना मात्र जोरात चिमटा काढला जातो. जबाबदारी म्हणजे काय हे आता ऑन पेपर दिसायला लागतं. 

काही दिवसांपूर्वी "अरे, झोपून घ्या आत्ता", "your life's gonna change" अशी खूप वाक्यं ऐकलेली असतात. पण ही वाक्यं किती जास्त सिरियसली खरी आहेत त्याची पुरेपूर प्रचिती एकाच महिन्यात येते! चार पाच किलोच्या जीवावर तो जीव तोडून प्रेम करायला लागतो. पूर्वी त्याच्या आईबाबांसाठी तीस वर्षाचा घोडा असलेला तो आता बदलत चाललेला असतो. नव्याने पालक झालेल्या त्याला आता पालकत्वाची नवी पालवी फुटलेली असते!

स्वागत पाटणकर 

नोकरी आयटीमध्ये आणि आवड क्रिकेटची. हे अतिशय कॉमन कॉम्बिनेशन असलेला असा मी मुलगा. शिकागोमधल्या घरबसल्या थंडीत 'लिहिणे' नावाची गोष्ट मला सापडली आणि ती हळू हळू वाढत गेली. मामबो सारख्या अतिशय वेगळ्या आवडी असणाऱ्या वाचकांपर्यंत पोचून, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून लिहायची मजा वाढतच चाललीये. क्रिकेट सिनेमा पुणे आणि खाणं सध्यातरी ह्या चांडाळ चौकडीमध्येच माझं लिखाण रमलयं; पण कधीतरी त्यापलीकडे जाऊन मला त्यावर विचार मांडता येतील ह्याच दिवाळीच्या शुभेच्छा मला द्या. मग तुम्हा सगळ्यांना बेसनाचे लाडू घरपोच मिळतील ह्याची मी खात्री देतो :)