ब द ल वू न  टा क णा रे  ब द ल

श्वेता चक्रदेव

विश्वात एकच गोष्ट कायम आणि स्थिर असेल तर ती म्हणजे बदल. इतके मोठे विरोधाभास असणाऱ्या वाक्यात सर्व सजीव आयुष्य आणि निर्जीव वस्तू या सगळ्यांचे भूत, वर्तमान आणि भविष्य एकवटलेले आहे. सकाळ झाली की दुपार, मग रात्र होते. उन्हाळा सुरु होतो, संपतो, थंडीची चाहूल घेऊन पानगळ येते, हिवाळा येतो, मग पुन्हा वसंत येतो. मूल जन्माला येते, मोठे होते, त्याला मुले होतात, कोणे एकेकाळचे ते मूल म्हातारे होते, आणि या जगातून निघून जाते, एक चक्र संपले पण थांबले का तर मुळीच नाही. हे बदल अपरिहार्य, नियमित आणि अटळ असतात, यातल्या कोणत्याच बदलांवर आपला फारसा वचक नसतो की ते आपल्या अखत्यारीतही नसतात.

 

हे बदल बाह्य बदल आहेत, हे बाह्य बदल आपल्यात अंतर्गत बदलही घडवून आणतात. पण आपण या बदलांना आणि त्यानंतर येणाऱ्या अंतर्गत बदलांना देखील सवयीचे झालेले असतो. माणसाच्या अंतर्गत होणारे बदल जे त्याचे अंतर्बाह्य बदलवून टाकतात ते नेहमीच आश्चर्यकारक असतात. आज मी काही लोकांच्या अंतर्गत बदलांकडे त्रयस्थपणे बघण्याचा प्रयत्न करणार आहे. हा देखील माझ्यातला एक बदलच.

लिलीया तरावा, न्यूझीलँडच्या एका क्राईस्ट चर्चच्या कल्ट (समुदाय) मधे जन्माला आलेली आणि वाढलेली मुलगी, आपल्याला आपले आई वडील संस्कार देतात, शिक्षण देतात ते योग्यच असते, किंबहुना आपण शपथेवर ते योग्यच असते हे सांगतो. अशा एका कल्टमधे वाढलेली लिलीया जिथे, जसे आणि जितके सांगितले जाईल तसेच वागायचे, बोलायचे. लहानपणापासून तिला वाटायचे की, तिचा जन्म आई होण्यासाठीच झाला आहे. तिने १३-१४ वर्षाची होईपर्यंत हे देखील ठरवून टाकले होते की, ती कोणाच्या मुलांची आई होणार आहे. तिच्यात जाणीवपूर्वक उत्तम आई होण्यासाठी ती बदलही घडवून आणू लागली. ती ६ वर्षाची असताना तिला उत्तम मार्क मिळाले म्हणून, मोठ्या कौतुकाने जेव्हा तिच्या आजोबांना तिने आपली गुणपत्रिका दाखवली तेव्हा, तुझ्यासारख्या मुली आपल्याला नको आहेत असे जेव्हा ते म्हणाले, त्या क्षणी काहीतरी बदलले. ज्याच्या मुलांची आई व्हायची स्वप्ने ती बघत होती, त्याने एक दिवस शाळेत खूप विनोद सांगितले म्हणून त्याला मरेस्तो मारताना तिने पाहिले, आणि ती सांगते तसे त्या क्षणी काहीतरी बदलले.

 

ह्या अशा समाजात तिला तिची मुले वाढवायचीच नाहीयेत, जिथे तिच्यासारखी बाई नकोच आहे असा समाज तिला नकोय हा मोठा बदल तिला तिची प्रत्येक कृती करताना तिला विचार करायला भाग पडत राहिला. आणि याची प्रणिती म्हणजे ती तो कल्ट, तो एकांगी समुदाय सोडून बाहेर पडली. हे बाहेर पडणे कधीच सोपे नव्हते, पण हे करण्याचे सामर्थ्य तिला मिळाले या तिच्यात अंतर्गत झालेल्या बदलाने, आणि तिचे आयुष्यच बदलून टाकले. तिच्या आयुष्यातून तिचे कुटुंब, ती वाढली तो समाज सगळेच दुरावले, पण हा नव्याने झालेला तिच्यातला बदल तिला साथ द्यायला समर्थ ठरला, लिलीयाच्या आतली स्वातंत्र्याची चाड तिला स्वस्थ बसू देईना. तिच्या समाजच्या किंवा त्या समाजाच्या मुख्य व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पहिले, तर हा बदल फार धोक्याचा होता, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नियमांवर चालणाऱ्या समाजासाठी देखील. तरीदेखील या सगळ्यांना पुरून उरला तो तिच्यातला बदल. बदल आक्रमक असतो, न्याय मागणारा असतो.

रोज हसत-खेळत ट्रेनमधे भेटणारा इस्माईल, बायकांच्या हक्कांबद्दल पोटतिडिकीने बोलणारा इस्माईल, एक दिवस दाढी वाढवू लागतो. घरातल्या आया-बहिणींना बुरखा घेतल्याशिवाय बाहेर पडू देत नाही. रोज भेटल्यावर वडापाव खायला चल ना म्हणणारा हा मुलगा असा इतक्या थोड्या काळात नखशिखांत बदलून जातो. जगातले सगळेच धर्माच्या चष्म्यातून बघत, जणू त्याला आता दुसरे काहीच दिसेनासे होते. त्याच्या आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींना, घरच्यांना हा बदल नकोस होतोय हे त्याला दिसतही नाही. हा बदल आता त्याच्यात हळूहळू विखार आणू लागतो, आणि एक दिवस तो घरातून नाहीसा होतो. तो जो नाहीसा होतो, तो एक दिवस पोलीस त्याचा मृतदेह घेऊन येतात तेव्हाच दिसतो. तो कुठे निघून गेला, त्याच्यात असा काय बदल घडला हे सगळेच आता अनुत्तरित राहणार होते. माणसातून माणसाला उठवून नेणारा हा कुठला बदल? बदल विनाशकारी पण असतो म्हणजे.

क्रिस्टिना म्हणून जन्माला आलेली मिसूरीच्या एका शेतकऱ्याच्या घरातली, तीन भावांनंतर झालेली, घरच्यांचा अभिमान. वडील भावांना जेव्हा पंक्चर झालेले टायर बदलायला शिकवायचे तेव्हा त्या माठ्यांना काही कळायचे नाही पण क्रिस्टीनाला झटकन समजायचे. तिचे वडील म्हणायचे, माझ्या मुलीला येत नाही अशी एकही गोष्ट नाही. वयात येताना तिला कळायला लागले होते की, आपल्यात बदल होतोय. इतर मुलींसारखे मुलग्यांनी आपल्याकडे बघावे असे वाटतच नाहीये आपल्याला. वर्गातली मेरी तिला आवडायला लागली. एक दिवस हिम्मत करून तिने तिला पत्र लिहिले, जे मेरीने तिच्या घरच्यांना दाखवले. छोट्या गावात जिथे प्रत्येक माणूस अन माणूस माहित असतो, तिथे याचा बभ्रा व्हायला वेळ नाही लागला. आपल्या घराची शान असलेल्या क्रिस्टिनाची सगळ्यांना शरम वाटू लागली. तिला एक दिवस शाळेतून तिच्या असण्यामुळे हाकलून देण्यात आले, तिला घरी घेऊन जात असताना तिला तिच्या वडिलांच्या डोळ्यात शरम दिसली, आणि ती म्हणाली की, काहीतरी बदलले. ती क्रिस्टिना कधीच नव्हती, बघता बघता तिचा क्रिस होण्याचा बदलाचा प्रवास चालू झाला. आज तिच्या छोट्याश्या घरात बसून तिच्याशी बोलताना, डोळ्यात पाणी आणून क्रिस म्हणाला की, त्यादिवशी माझ्या बद्दलच्या त्या शरमेने मला जाणीव करून दिली, माझ्या पुढच्या खडतर प्रवासाची. आज घरच्यांनी त्याला स्वीकारलंय. बदल असाही असतो म्हणजे, स्वतःला स्वतःची ओळख करून देणारा.

अंबाक्का, एका अत्यंत गरीब घरात जन्माला आलेली आठवी मुलगी. जिथे एकाला खायला घालायला धान्य नाही, तिथे या आठ-दहा मुलांच्या रगाड्यात अंबाक्काचे पोट कुठले भरायला. वयात यायच्या आधीच पोटातल्या भुकेने, तिला कोणाच्या तरी वासनेच्या भुकेला बळी पडायला भाग लावले आणि मग तो एक चरितार्थाचा, उदरनिर्वाहाचा भागच झाला. काळ जसा पुढे जात होता, तसे अंबाक्काचे प्रस्थ वाढत गेले. कोणे एकेकाळी रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारला तरी त्रास होणारी अंबाक्का, बघता बघता एका मोठ्या कोठ्याची मालकीण झाली. कोवळ्या कळ्यांचा बाजार करणे तिच्या डाव्या हाताचा मळ झाला. सद्गदित होऊन भावनाविवश अंबाक्का म्हणते की, किती बदलले मी, नरकात देखील जागा मिळणार नाही मला. बदल असाही असतो, नरकातही जागा न मिळवून देणारा.

Taking flight: from war orphan to star ballerina नावाचे आपल्याला बदलून टाकणारे पुस्तक आहे. आफ्रिकेतली युद्धामुळे अनाथ झालेली एक मुलगी निकेला देप्रिन्स, जी जन्माला आली तेच त्वचेवर डाग घेऊन, ती म्हणते माझे आयुष्यच बदलले या डागांनी, 'सैतानाचे मूल' म्हटले जायचे तिला, युद्धाने तिला अनाथ करून तिला एक जोराचा फटका दिला. अनाथआश्रमात फक्त बदलाच्या आशेवर दिवस काढताना, कुठंतरी मिळालेल्या मासिकातल्या बॅलेरिनाचा फोटो तिला वेगळ्याच विश्वात घेऊन गेला.

 

ती म्हणते, तो फोटो पाहीला आणि काहीतरी बदलले, मला कळले माझे ध्येय काय आहे. विचार करायला गेले तर, अत्यंत गरिबीत आणि कंगाल अवस्थेत असलेल्या आफ्रिकेतल्या एका अनाथगृहातली आणि अंगावर डाग असलेली कृष्णवर्णीय मुलगी, बॅलेरिनाचा फोटो मिळाल्यावर म्हणते काहीतरी बदलले. जगात आपल्याला वाटते त्यापेक्षा मनुष्याच्या आयुष्याची किंमत नगण्य आहे, कोण्या रिबेल गुंडांनी तिच्या गर्भवती शिक्षिकेचे तिच्या पोटात मुलगा आहे कि मुलगी हे पाहण्यासाठी पोट फाडले, आणि त्यातल्याच एकाने मजा म्हणून आपल्या मिकेलाचेही पोट फाडले. वाचताना अंगावर काटा यावा अशा परिस्थितीत ही मुलगी म्हणते की, गोष्टी बदलणार होत्या. माझे ध्येय बॅलेरिना होणे होते आणि ते होणार होते. बदल किती अचंबित करणारे असतात, कुठूनशी एलेन देप्रिन्स येते आणि तिला दत्तक घेऊन अमेरिकेत घेऊन येते. तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करते. आणि बदल घडतात निकेला देप्रिन्स, स्टार बॅलेरिना होते. म्हणजे निराशेच्या खाईत असताना देखील, अजून अजून दुःखाकडे नेणारे आयुष्यातले, परिस्थितीतले बदल नि:शंक आशावाद दाखवणारेही असतात, येणाऱ्या सुखाची चाहूल देतात. न कळता असे ऊन मागून येते सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते. बदल दुःखाचे मुखवटे घेऊन सुखाकडे घेऊन जाणारेही असतात.

समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या या लोकांच्या कथा ऐकल्या की, एक नक्की कळते त्यांच्यातल्या बदलांचे पडसाद त्यांच्या कृतींमधून, वागणुकीतून जगाला दिसत गेले पण या त्यांचं मूळ हे त्यांच्यात अंतर्गत झालेले बदलच होते. हा बदल कोण आहे नक्की? बदल हा व्यक्तिसापेक्ष, बुद्दीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष चांगला किंवा वाईट असू शकतो. कोणासाठी चांगला, उमेद देणारा बदल हा कुणासाठी तरी प्रचंड धोक्याचा, काळजीचा किंवा नाउमेद करणारा असू शकतो. एक वाक्य आहे, any change is always from inner to outward.

माणसाचा स्थायीभाव हा बदलाला घाबरणारा आहे. बदल हा काही धोका, अडचणी तर नाही ना घेऊन येणार हा विचार करतो आणि कोण्या गर्तेत सापडलेला कोणी चांगल्या बदलाची आशा करतो. खरे बघायला गेले तर त्याला त्या गर्तेत ढकलणारा बदल झाला म्हणूनच पुढे त्या गर्तेतून बाहेर काढणारा बदल देखील घडणार असतो. ही साखळी असते, चक्र असते. त्यातले हवे तसे आणि हवे ते निवडून घेता येत नाही. आपल्यासाठी वाईट बदल आपल्याला शिकवणारे, आपल्याला तयार करणारेच असतात. आणि चांगले बदल, काही काळाची शांतता, दिलासा आणि आनंद देणारे. रॉबिन शर्माचे एक छान वाक्य आहे,

 

"Change is bad at first, messy in the middle and gorgeous in the end, then why not embrace it?"

बदल हा कधीच फक्त चांगला किंवा फक्त वाईट असूच शकत नाही, तो चांगले-वाईट या दोन टोकांच्या मधे फिरत राहतो, वेळ आणि काळानुसार. बदलाला काही पोत, रंग, आकार, गुणधर्मच नाही. तो जिथे जाईल तिथला असतो आणि तो देखील तेवढ्यापुरताच. गुंतून न पडता पुढे चालत राहणे खरेतर बदलाकडूनच शिकायला हवंय आपण.  हा बदलच आपल्याला हाताला धरून अंतिम ध्येयापर्यंत नेणार आहे.

खरेतर आपले काम किती सोपे आहे, change is good, बदल म्हणजे वाढ, बदल म्हणजे नावीन्य, बदल म्हणजे अनुभव, बदल म्हणजे स्व शी ओळख. आपले काम आहे, आपल्या अंतर्बाह्य होत जाणाऱ्या प्रत्येक बदलाकडे जितके जमेल तिथले निर्विकार आणि तटस्थपणे बघणे. दर बदलागणिक अधिक अधिक स्वतःला ओळखणे, आपल्या प्रवासाची दिशा ओळखणे. अगदी छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा वाटणारा बदल आपल्याला काहीतरी सांगत असतो, दाखवून देत असतो, आता ते बघायचे की नाही, ते फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. आशा करते, तुमच्यातला बदल तुम्हाला ओळखण्याचे कसब आणि कुशलता मिळो.

श्वेता चक्रदेव

क्लिनिकल रिसर्चर, कॅन्सर रिसर्चर, लेखक, गायक, अभिनेत्री, निवेदक, निर्माती, व्यावसायिक, फायर फायटर, बारटेंडर, सोलो ट्रॅव्हलर, आई. फूडी आणि कूक, अनेक संस्थात स्वयंसेवक, पिट्सबर्ग मराठी मंडळ सेक्रेटरी, ढोल ताशा पथक सदस्य, कला-साहित्य आस्वादक.