मागील पानावरुन..

 

नवऱ्याच्या कामानिमित्त आम्ही नंतर दोन वर्ष मलेशियाला राहिलो. कधीतरी ऑफिसमध्ये बोललेले परदेशी फिरण्याचे स्वप्न पूर्ण होता होता थायलंड, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया अश्या देशांचे छापे सुद्धा माझ्या पासपोर्टवर दिसू लागले. सिंगापूर हे माझ्यासाठी खरंच लकी ठरलेलं शहर होतं. ह्या देशाने माझ्यामधल्या नवीन माझी मला ओळख करून दिली होती, ज्या मला मी कदाचित मुंबईत कधीच भेटले नसते. बाहेर राहून नवीन देश फिरता फिरता मला नवीन नवीन अनुभव मिळू लागले. थोडी थोडी स्वतःहूनच फोटोग्राफी करायला शिकले. एकटीने घरी वेळ कसा घालवायचा ह्या विचाराने नवीन नवीन पदार्थ शिकू लागले. ते पदार्थ शिकून त्याचे फोटो काढायचा एक छंदच जणू लागला मला. नोकरी करून कदाचित ह्या गोष्टी मी शिकू शकले नसते. माझे छंद जोपासायला मला वेळ मिळू लागला.

 

काही वर्षांनी मुलगा झाल्यावर मी तर स्वतःला पूर्णपणे बदलून टाकलं. तो छोटा असताना आम्ही परत सिंगापुरला आलो. आईपण आल्यावर मी पूर्णच बदलून गेले होते. त्याच्याबरोबर गप्पा मारणं,  त्याच्यासाठी खाऊ करणं, दिवसभर खेळणं, त्याला फिरायला नेणं,ह्या गोष्टी मला आवडू लागल्या. नोकरी करणाऱ्या मला मी कधी गृहिणी झाले ते कळलंच नाही. माझं मूल हे माझं रुटीन बनलं. त्याच्याबरोबर  राहून त्याच्या मित्रांच्या आया माझ्या मैत्रिणी बनल्या. हळू हळू माझा मित्रपरिवार इथे सुद्धा खूप वाढत गेला. तो इतका वाढला की माझ्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही १२० जणांना बोलावलं होतं !

 

नवीन मैत्रिणींची ओळख करून घेणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, नवीन नवीन पदार्थ करणे, नवीन गोष्टी नव्याने शिकून घेणे, घर सजावट करणे, सगळे सण नव्याने साजरे करणे, सणासुदीचे पदार्थ करणे, लोणची, मिठाई, मोरंबे असे अनेक गृहोपयोगी गोष्टी मी करू लागले. दिवसभर मुलांमध्ये इतका व्यस्त जाऊ लागला आणि काही राहून जातंय असं वाटायला वेळच मिळेना. माझे मन आता गृहिणीच्या नोकरीत इतके रमून गेले की आज मला नोकरी न करण्याची अजिबात खंत वाटत नाही.

सिंगापुरमध्ये मुलांसोबत 

 

मला कधी वाटलंही नव्हतं की मी लिखाण करेन,कविता करेन पण माझ्या रिकाम्या वेळात माझ्यामधल्या लेखिकेची माझी ओळख झाली. मी वाचन करू लागले. माझा मराठीचा बोल ह्या ग्रुपची मी सदैव ऋणी राहेन की त्यांच्यामुळे लेख लिहायला आणि लिखाण सुधारायला मी शिकले. सिंगापूरच्या ऋतुगंध मासिकामध्ये जेव्हा माझा पहिल्यांदा लेख छापून आला होता तेव्हा मला जे काही वाटलं ते मी शब्दातसुद्धा मांडू शकत नाही. वर्षभर मी त्या मॅगझीनसाठी लिहिले. मामबो च्या छापील दिवाळी अंकात माझा लेख मी जेव्हा पाहिला तेव्हा आनंद गगनात मावला नाही. पहिल्यांदाच त्या लेखासाठी जेव्हा ऑडिओ रेकॉर्डिंग केलं तो अनुभवसुद्धा भन्नाट होता. नवीन गोष्टी शिकण्यात खूप मजा आली होती. सिंगापूरला राहून सगळी ठिकाणं एवढी छान माहिती झाली आहेत की फिरायला येणाऱ्या कोणाला त्यांची आयटीनररी बनवून द्यायची पण आवड मला निर्माण झाली. त्यात सुद्धा एक मजा वाटू लागली आणि काही काळासाठी टूर ऑपरेटर असल्यासारखं पण वाटू लागलं.

 

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मुलीचा गृहिणीपर्यंतचा प्रवास अफलातून होता. मी गमावली ती नोकरी आणि नोकरी केल्यावर मिळणारी सॅलरी. पण त्या बदल्यात नव्याने आयुष्याची सुरुवात केलेल्या मला कितीतरी गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आणि मी अजून शिकतेच आहे. स्वावलंबनाचा धडा मला सिंगापूरने दिला. नव्याने गृहिणी म्हणून रूजताना अनेक कठीण गोष्टींचा सामना दिला पण जेव्हा कधी यश मिळाले तेव्हा तो आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा होता. आपल्याला कसे जमेल हा विचार करत बसण्यापेक्षा विहिरीत उडी टाकायची आणि मग आपोआप पोहायला शिकता येतं, असा विचार करून जर आयुष्य जगलो तर किती छान जगता येतं हे मी स्वानुभवातून नक्कीच सांगू शकते.

 

परदेश फिरण्याची स्वप्नं पाहणारी ती राजकन्या आता राणी बनून होम मिनिस्टर झाली आहे आणि तिच्या राजासमवेत सिंगापूर नावाच्या राज्यात सुखासमाधानाने आपल्या मुलांसोबत गुण्यागोविंदाने नांदत आहे.

श्रद्धा सोहोनी

मूळची आमच्या मुंबईची. लग्नानंतर सिंगापूर ला वास्तव्य करून आहे. सध्या गृहिणी म्हणून कार्यरत आहे. वाचन, लिखाणाची मला आवड आहे. नवीन पाककृती बनवून खाणे आणि खायला घालणे, नवी जुनी गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे, नवीन ओळखी करून घेणे , भटकंती करणे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भरपूर गप्पा मारणे हे माझे छंद आहेत