व र्किं ग  वु म न  ते   हो म -मि नि स्ट र 

श्रद्धा सोहोनी

 

एक आटपाट नगर होतं. त्या नगराचं नाव होतं मुंबई. कोणे एके काळी ह्या नगरात एक राजकन्या एका कंपनीमध्ये फायनान्स एक्सिक्युटीव्ह म्हणून काम करत होती. ती खूप मन लावून दिवसरात्र काम करायची. तारीख ३१ मार्च असो किंवा दर महिन्याची सॅलरी ट्रान्सफर असो, राजकन्या अर्धा अधिक वेळ ऑफिसमध्येच असायची. रात्री दमून झोपली की स्वप्नं पडायची तिला. स्वप्नात तिला पंख मिळालेले असायचे आणि ती उडून परदेशी भ्रमण करते आहे अशी स्वप्नं बघायची. तिला कुठे माहित होतं की परदेश भ्रमणाचं तिचं स्वप्न एक दिवस सत्यात उतरेल.

एकदा त्या राजकन्येच्या ऑफिसमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं ट्रैनिंग सुरु होतं बरं का. तेव्हा त्या ट्रेनरने तिला विचारलं, "तुझी एक इच्छा सांग किंवा एखादं स्वप्न सांग जे तुला सत्यात उतरलेलं आवडेल." ही कायम स्वप्नांच्या दुनियेत असायची. तिने चटकन उत्तर दिलं, "मला माझ्या आई बाबांबरोबर परदेश फिरायचा आहे. माझं स्वप्न आहे की एकदा तरी फॉरेनमध्ये मला जायचंय." लगेच तो ट्रेनर म्हणाला," पॉसिटीव्ह राहा नक्की स्वप्न पूर्ण होतील." तो ट्रेनर बहुतेक ज्योतिषी असावा कारण अगदी खरोखरच त्या राजकन्येचं स्वप्न आज पूर्ण झालंय.

 

अहो, थांबा थांबा. तुम्हाला भेटायचंय का त्या राजकन्येला? मी देते तिची ओळख करून. अहो ती दुसरी तिसरी कोणी नसून मीच आहे, जिला परदेशात एकदा तरी पाऊल ठेवायचं होतं . स्वप्नांच्या दुनियेत फिरायचं होतं . पासपोर्टचा आगापिछा नसताना सुद्धा पटकन बोलून गेलेली माझी इच्छा पूर्ण होईल, हे मला अगदी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मी पहिल्यापासूनच करिअर ओरिएंटेड होते. अकाउंट्स, फायनान्स, टॅक्स हे माझे आवडीचे विषय आणि बाबा सीए असल्यामुळे त्यांच्या ऑफिसमध्ये बारावीपासूनच कामाची सवय लावून घेतली होती. मी पण सीए करणार असं आधी ठरवलं होतं हो. पण त्या एप्रिल, ऑक्टोबर च्या वाऱ्या कोण करेल ह्या विचाराने सीएचा नाद सोडला आणि सरळ नोकरी करायला लागले.

 

घरी बसणं मला अजिबात आवडत नव्हतं. वीकेंड आला तरी मी घराबाहेरच असायचे. मित्र मैत्रिणींबरोबर धमाल, मजा, मस्ती, चित्रपट पाहणे, कधीतरी आवड म्हणून संजीव कपूरच्या रेसिपी पाहून त्यांचा घरातल्यांवर प्रयोग करून बघणे हे माझे छंद होते. जेवण अगदी क्वचितच बनवायचे. बावीस वर्षाची झाले आणि आईने स्थळं पाहायला सुरुवात केली. माझी पहिली अटच अशी होती की मी घरी बसणार नाही आणि मी परदेशी राहणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही. कारण मला नोकरी सोडायची नव्हती.

लग्नाआधी मुंबईत नोकरी करत असताना 

 

गौरीशचं स्थळ आलं तेव्हा तो मुंबईमध्येच नोकरी करत होता. फक्त कामानिमित्त परदेशी जावं लागत होतं. सर्व दृष्टीने योग्य स्थळ असल्याने आणि मला हवा असलेला जोडीदार मी त्याच्यात पाहिल्याने अगदी दोन दिवसातच पसंती देऊन आमचं लग्न ठरलं. तो लग्नाआधी परदेशी असतानासुद्धा मला सर्वांनी चिडवले होतं, "आता कसली तू राहतेस इथे? तू जाणार आता भारत सोडून." पण माझे विचार फार पक्के होते. माझ्यासाठी परदेश हा फक्त फिरण्याचे ठिकाण असंच मनात होतं. लग्नानंतर मला परदेशी राहायला मिळेल हे मला स्वप्नात सुद्धा तेव्हा खरं वाटलं नव्हतं.

आमचं लग्न झालं आणि अगदी दुसऱ्या महिन्यातच नवऱ्याला सिंगापूरच्या नोकरीची संधी मिळाली. आपल्याला परदेश बघायचा होता ते आपलं स्वप्न आता पूर्ण होणार म्हणून खूष झाले, पण त्याच क्षणी सर्व सोडून, नव्याने संसार करायला परदेशात जायचं ह्या विचाराने माझ्या मनाची चलबिचल सुरु झाली. माझी नोकरी, आई, बाबा, नातेवाईक, जिवलग मित्रमैत्रिणी ह्या सर्वांना सोडून जायचा विचार सुद्धा मला त्रास देऊ लागला. पण काहीतरी चांगलं देवाने ठरवून ठेवलंय आणि आम्हाला ही संधी चालून आली आहे ह्या विचाराने आम्ही सिंगापूरला जायचं ठरवलं. आणि इथूनच सुरुवात झाली माझ्या नवीन आयुष्याची.

सिंगापुरमध्ये आगमन 

 

​एखादं रोपटं जसं खतपाणी देत गेल्यावर बहरून येतं तसंच माझ्या बाबतीत घडलं. नव्याने नव्या शहरात, नवीन वातावरणात, नव्या लोकांमध्ये मी हळूहळू रुजत गेले. स्वतःला बदलत गेले. आणि ह्या बाबतीत मी संपूर्ण क्रेडिट देईन ते माझ्या नवऱ्याला. वेळोवेळी त्याने मला धीर दिला, नवीन गोष्टी करण्याची परवानगी दिली आणि नोकरी न करता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं.

 

सुरुवातीला इथे आले तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं. सिंगापूरची ट्रिप ही माझी पहिली वहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप. इथे फक्त दोनच ओळखीच्या मैत्रिणी होत्या. संसार पण अगदी छोटा होता. तीन भांडी, चार वाट्या, चार चमचे, चार प्लेट आणि थोडेसे लागणारे सामान घेऊन मी माझा संसार सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात तर मजाच यायची. एकतर इथले लोक काय बोलतात ते कळायचं नाही.  "कॅन कॅन, ओके ला, डोन्ट नो ला" अश्या तुटक तुटक इंग्रजी भाषा समजून घ्यायला लागल्या.

 

नोकरी करणाऱ्या मला घरी बसून चैन पडेना. घरकाम करायला प्रचंड कंटाळा यायचा. चमचे सुद्धा न घासणाऱ्या मला, सिंगापूरला जाऊन बाथरूम सुद्धा घासावं लागतं ह्या विचाराने वैताग येऊ लागला होता. घरी बसून आमच्यासाठी सर्वस्व त्यागणाऱ्या आमच्या आईची किंमत मला कळू लागली होती. गृहिणीची कामं म्हणजे किती असतात हे समजून चुकलं होतं. थोडे तीन चार महिने घरी बसून मग एका ठिकाणी मला नोकरी मिळाली. खूप भारी वाटत होतं. म्हणजे भारतात जो माझा पगार होता ना त्याच्या सरळ तिप्पट चौपट पगार दर महिन्याला हाती येत होता.

 

हळू हळू इथे मित्रपरिवार वाढू लागला. इथल्या नवीन नवीन गोष्टी पाहून मजा वाटत होती. इकडचे नवीन नियम, नवीनच पहिल्यांदा आयुष्यात पाहिलेले पदार्थ, चिनी मित्र मैत्रिणी, नवीन शेजारी, सगळं अगदी नव्याने अनुभवत होते. सर्वात भारी वाटलं होत ते म्हणजे, इथला रेल्वेचा प्रवास. चौथी सीट नाही, ना काही गर्दी. सगळे अगदी नियम पालन करून प्रवास करताना दिसायचे. भारीच वाटायचं एकदम. सगळं छान चालू असताना मिठाचा खडा पडतो ना, अगदी तसंच झालं आणि मला कायमच्या पाठदुखीचा त्रास लागला. माझ्या सिंगापूर डॉलर मिळवून देणाऱ्या नोकरीची मला आहुती द्यावी लागली. तिथेच माझ्या करिअरचा शेवट झाला आणि माझ्यामधील गृहिणीने जन्म घेतला.

पुढे वाचा..