संध्या काळी  तू  

 

शिवकन्या शशी

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....

मला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर

लोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर

सोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात

घेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....

तुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे

बघू देत लोकांना देवांना साधुंना

माझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून

तिच्या देहात लयदार मिसळताना.....

 

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....

मला सांग ना तुलाही असेच वाटते ना

कुठूनतरी समुद्राने वाट काढावी

नाहीतर गंगेने पदर उलटा करावा

चार व्याकुळ डोळ्यांत प्रलय व्हावा...

 

संध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....

मला माहित आहे तुला माहित आहे

लाटांना माहित आहे हाक त्यांचीच तर आहे

धावणाऱ्या रक्ताला मी फुलांनी अडवले आहे

नशिबाची कविता तिच्या लयीत सोडली आहे ......

 

संध्याकाळी तू.....  

शिवकन्या शशी

'शिवकन्या शशी' या नावाने गेली बरीच वर्षे कविता, कथा, लेख, अनुवाद इत्यादी स्वरूपाचे लेखन ‘मिसळपाव’, ‘ऐसी अक्षरे’ आणि ‘मायबोली’ या मराठी संस्थळावर करत आहे. तसेच ‘शब्दमल्हार’,‘खेळ’, ‘माहेर’ या नियतकालिकांतून आणि ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘पुण्यनगरी’ या वृत्तपत्रांतून वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावर लेखन. इंग्लिश भाषा आणि साहित्य यांचे वेगवेगळ्या स्तरावर गेली १८ वर्षे अध्यापन. सध्या मस्कत येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत विभागप्रमुख म्हणून कार्यरत.