मा झा  पु न र्ज न्म 

 

राजश्री कुलकर्णी  

“जगप्रसिद्ध न्यू यॉर्क मॅरथॉन!” 

जगातलं सर्वात मोठ्ठं आणि लोकप्रिय मॅरथॉन! वेगवेगळ्या देशातून दरवर्षी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक या स्पर्धेत भाग घेतात. गेल्यावर्षी, यात माझी निवड झाली होती. मी या स्पर्धेत भाग घेणार होते. ट्रेनिंग सुरू होऊन चार महिने झाले होते.

 

२०१७ च्या ऑक्टोबर महिन्यातली ही गोष्ट आहे. मला सगळं अगदी जसंच्या तसं आठवतंय. नोव्हेंबरच्या पाच तारखेला न्यू यॉर्क मधे, मॅरथॉन (२६.२ मैल/ ४२ किलोमीटर्स) मी पहिल्यांदाच धावणार होते. त्यासाठी व्यवस्थित सराव सुरू होता. धावणं, भरपूर पाणी पिणं, व्यवस्थित खाणं, वेळेवर झोपणं इत्यादी सर्व गोष्टी पध्दतशीर सुरू होत्या. अंथरूणावर पडले, उशीवर फक्त डोकं टेकवलं की गाढ झोप लागायची. तब्येतीची किंचितही तक्रार नव्हती. 

 

लक्षणे: अचानक एक दिवस, मला छातीला एका बाजूला काहीतरी वेगळेपणा जाणवला. माझी वार्षिक तपासणीचीही अनायसे वेळ झाली होतीच. माझ्या नेहमीच्या डॉक्टरनं मॅमोग्राम, शिवाय सोनेग्राफीदेखील करायला सांगितली. ती सोनोग्राफी करत असतानाच तिथल्या तंत्रज्ञाला काहीतरी संशयास्पद वाटलं. माझ्या डॉक्टरकडे रिपोर्टस् आले. मग Core आणि Needle Biopsy झाली. 

याच दरम्यान माझं मॅरथॉनदेखील पूर्ण झालं होतं. ‘वयाच्या ४७व्या वर्षी पहिलं मॅरथॉन!’  लेख लिहायला चांगला विषय मिळाला होता. त्याबद्दल विचार करायला सुरूवात केली होती. पण, तेवढ्यातच माझ्या biopsy करणार्‍या सर्जनचा फोन आला की ‘The test is positive’! मला ‘ब्रेस्ट कॅन्सर’ झाला होता! 

 

खरंच वाटेना. ‘कॅन्सर’हा शब्दच खूप घाबरवून टाकणारा आहे. कॅन्सर नेहमी दुसर्‍याला होतो, असा आपला समज आहे. माझ्यासारख्या इतकी उत्तम तब्येत असण्यार्‍या बाईला कॅन्सर होऊ शकतोा? खरंच?? शक्यच नाही. हा नक्की माझाच रिपोर्ट आहे ना? कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

खूप मोठा धक्का बसला होता. मलाच नाही तर माझ्या नवर्‍यालाही. दुसर्‍या डॉक्टरचं मत घेण्यासाठी, जगप्रसिद्ध मेमोरियल स्लोन केटरींगच्या डॉक्टरला आम्ही भेटलो. Lymph Node Biopsy झाली. तीही पॉझिटीव्ह आली. आता हा कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे ते बघायला CT scan झाले. PET Scan ही झालं. सुदैवाने हा कॅन्सर इतर कुठे पसरला नव्हता. नोव्हेंबरच्या १३ तारखेला मला ‘कॅन्सर स्टेज २’ झाल्याचं निदान झालं. 

 

डॉक्टरनं मला विचारलं की, तुला हे निदान ऐकून काय वाटतंय? “Are you angry? Are you sad? Are you nervous? Why me? असे प्रश्न तुझ्या डोक्यात येताहेत का?” खरं तर असे प्रश्न माझ्या डोक्यात कधीच (तेव्हाही, ट्रीटमेंट घेतानाही आणि आताही) आले नाहीत. जबरदस्त आश्चर्याचा धक्का मात्र मला नक्कीच बसला होता.

Acceptance is important. Once you accept, life becomes easier.

 

निदान झालं. सगळ्या टेस्ट्स झाल्या. कॅन्सर झाला हे कळल्यापासून एक महिन्याच्या आत माझी ट्रीटमेंट सुरूदेखील झाली. आधी किमोथेरपी, मग सर्जरी आणि त्यानंतर रेडीएशन करावं लागेल, असं डॉक्टरनं सांगितलं.  डिसेंबर ११, सोमवारी माझी पहिली किमो होती. ऑफिसला रजा (short term disability) टाकली. काळजी घ्यायला नवरा, मेडिकलच्या दुसर्‍या वर्गाला असणारा माझा मुलगा होता, भरपूर मित्र-मैत्रिणी तर होतेच, पण माझी परदेशात राहणारी बहीणही मदतीसाठी आमच्याकडे रहायला आली. मी खरोखरीच नशीबवान होते. 

हेड शेव्हींग: मला ज्या प्रकाराची औषधं देण्यात येणार होती, त्यात दुसर्‍या किमोथेरपीनंतर केस जातील, हे डॉक्टरनं आधीच सांगितलं होतं. केसांचे पुंजकेच्या पुंजके हातात येणं, हे नैराश्यात अजूनच भर टाकणारं होतं. तसेही जर केस गळणार होतेच, त्यामुळे मग केस गळण्याआधीच मी ‘हेड शेव्ह’ करायचं ठरवलं. कुठेतरी वाचलेलं आठवलं..

“You can’t stop the waves, but you can learn to surf!”

कॅन्सर मला झाला, हे खरं होतं, पण त्याला सामोरं कसं जायचं, हे मात्र पूर्णपणे माझ्या हातात होतं. माझ्यासाठी माझ्या नवर्‍याने, राजेशने, ‘हेड शेव्हींग पार्टी’ आयोजित केली. YWCA प्रिंस्टन सेंटर अशा पार्टीज् आयोजित करायला मदत करतात. तिथल्याच एका छोट्याशा हाॅलमधे २०-२५ मैत्रिणींच्या घोळक्यात ही पार्टी झाली. गुलाबी रिबन्स (ब्रेस्ट कॅन्सरचे प्रतिक), गुलाबी-पांढरे बलून्स, कप केक्स, पिंक शॅम्पेन इत्यादी सुंदर सजावट केली होती. माझ्यासोबत ‘कौस्तुभ’नं, माझ्या मुलानंही मुंडन केलं. तो खूप हृदयस्पर्शी अनुभव होता.

 

किमोथेरपी आणि साईड इफेक्टस्:

दर पंधरा दिवसांनी किमोचा एक राऊंड असायचा. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पांढऱ्या पेशींचा आकडा वाढवायला एक इंजेक्शन घ्यावं लागायचं. किमोचे आणि इंजेक्शनचे, दोन्हीचे साईड इफेक्टस् अतिशय वाईट होते. म्हणजे अंग दुखणं, हाडं दुखणं, स्नायू कमकुवत होणं, मळमळणं, नैराश्य येणं, हाता-पायांची सालं निघणं, ऍसिडिटी, निद्रानाश, अतिप्रचंड थकवा, माऊथ अल्सर/तोंड येणं, घशाला कोरड पडणं, गिळायला त्रास होणं, हात सुजणं, डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन होणं, चक्कर येणं अशी ही यादी खूप मोठी होती. चारचार तास धावू शकणारी मी, दहा-पंधरा पायर्‍या चढायला सुद्धा मला त्रास होत असे.

मला सगळ्या मिळून आठ किमोज् घ्यायच्या होत्या. ५-६ किमोज नंतर तर माझी नखंसुध्दा काळी पडली. पापण्या, भुवयांचे केसदेखील गेले. स्वत:ला आरशात बघितलं तर, मी स्वत:च स्वत:ला ओळखेनाशी झाले. परग्रहावरून आलेलं कुणीतरी असावं, इतकं रूप बदललं होतं. सातव्या-आठव्या किमोनंतर तोंडाची चवही पूर्णपणे गेली. मीठ, साखर, तिखट कशाचीच चव लागत नसे. कुठल्याही पदार्थाची चव न लागणं, ही एक महाभयंकर गोष्ट आहे. 

डिसेंबर ते मार्च, हा न्यू जर्सीमधला ऐन हिवाळा. घराबाहेर हाडं गोठवून टाकणारी थंडी आणि प्रत्येकाच्या घरात आजारपण होतं. त्या वर्षीची फ्लूची साथ फार वाईट होती. शिवाय किमोमुळे (पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाल्यामुळे) मला इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली होती. डॉक्टरने मला शक्यतोवर सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे त्या काळात मी जास्त बाहेर पडत नसे किंवा फारसं कोणाला भेटत नसे. मला कोणत्याही परिस्थितीत आजारी पडणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे मला माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत, ‘माझ्या’सोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला मिळाला, ‘राजश्री’ची जवळून ओळख झाली. रूप बदललेली, चव न लागणारी, कुणालाही भेटू न शकणारी मी, एक ‘साध्वी ’ झाले होते. 

 

मॅरथॉनची तयारी करणं आणि किमोथेरपी घेणं यातील सारखेपणा: माझे उपचार सुरू असताना मला यातील सारखेपणा जाणवला. आश्चर्य वाटलं ना? पण खरं आहे ते! 

 

उदाहरणच द्यायचं झालं तर मॅरथॉन ट्रेनिंग करताना तुमची जीवनशैली निरोगी असावी. असं सांगतात की योग्य गोष्टी खा, भरपूर पाणी प्या, वेळेवर झोपा, जास्त प्रोटीन्स आणि फायबर्स खा, ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. तंतोतंत, ह्याच सगळ्या गोष्टी मला किमोच्या दरम्यान सांगण्यात आल्या. ज्याप्रमाणे ट्रेनिंग झाल्यानंतर, प्रत्यक्ष रेसचा दिवस जवळ येऊ लागतो, तेंव्हा नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यायला सुरुवात करायची असते. रेसच्या दिवशी कपडे कुठले घालायचे, रेसपूर्वी नाश्त्याला काय खायचं, सोबत खाण्याचे-पिण्याचे कोणते पदार्थ घ्यायचे, ... ही सगळी तयारी एक दिवस आधीपासून सुरू होते. त्याशिवाय माहिती असतं की अख्खा दिवस बाहेर जाऊन आल्यानंतर, घरी येऊन खूप थकायला होणार आहे. त्यामुळे निघायच्या आधीच रात्रीच्या जेवणाची तयारी करून बाहेर पडावं लागतं. शिवाय अशा या मॅरथॉन रेसेस जवळपास नसतात. म्हणजे जायला कमीत कमी एक तास, यायला एक तास आणि ३-६ तासांची रेस असे सात-आठ तास लागतात. सगळं अगदी तस्संच!! 

माझ्या प्रत्येक किमोसाठी मी मेमोरियल स्लोन केटरींग च्या Basking Ridgeच्या शाखेत जात असे. जायला जवळ-जवळ एक तास, यायला एक तास, प्रत्येक वेळी रक्ताची तपासणी, ऑन्कोलॉजिस्ट सोबतची मिटींग आणि त्यानंतर प्रत्यक्ष किमो. सगळं धरून तसेच ६ ते ८ तास प्रत्येक वेळी लागायचे. आणि धावल्यानंतर जसं थकायला होतं, तसाच एकंदरीत हा सगळा प्रकार बर्‍यापैकी थकवणारा असायचा. गेल्या डिसेंबरपासून माझ्या अशा आठ रेसेस झाल्या. प्रत्येक किमोच्या तयारीच्या वेळी, मला मॅरथॉनच्या तयारीची आठवण यायची. 

 

अजूनही असं वाटतं की खरंच मला माझ्या धावण्याचा नक्कीच फायदा झाला. रेसनंतरच्या अंगदुखीची आणि थकव्याची आधीच ओळख झाली असल्याने किमोनंतरचं हाडं दुखणं आणि अतिप्रचंड थकवा, सहनीय झाला. किमोच्या चार महिन्यांच्या कालावधीमधे मला जिममधे जाणं शक्यच नव्हतं. पण मी दररोज, न चुकता एक तास योगासने करीत असे; त्याचा मला नक्कीच फायदा झाला. किमोमुळे केस गेले. रूप पूर्णपणे बदललं. पण गंमत म्हणजे या काळात आंघोळ मात्र पटकन होत असे. केसच नसल्याने ते वाळवण्याचा संबंधच नव्हता, शॅंपूचा, वॅक्सींगचा खर्च नव्हता. तिथेही बचत! 

सर्जरी: १९ मार्चला आठवी किमो झाली. माझ्या ट्रीटमेंटचा एक तृतीयांश हिस्सा पूर्ण झाला होता. त्यानंतर मधे एक महिन्याचा कालावधी होता. ‘न्यू यॉर्कच्या’ मेमोरियल स्लोन केटरींगमधे, १८ एप्रिलला सर्जरी निश्चित झाली होती. आम्ही एक दिवस आधी न्यू यॉर्कला रहायला गेलो. सर्जरी व्यवस्थित पार पडली. त्या रात्री तिथे राहून, दुसर्‍या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. या सर्जरीमध्ये माझ्या काही लिम्फ नोड्स् देखील काढल्या. सहाजिकच माझ्या त्या हाताच्या हालचालींवर निर्बंध आले. त्यासाठी, दिवसातून पाच वेळा मला हातांचे व्यायाम करायला सांगितले होते. ते सगळे व्यायाम मी न चुकता करीत असे. त्यामुळे, माझ्या हाताच्या हालचाली पूर्ववत व्हायला खूपच मदत झाली. 

रेडएिशन: हा होता माझ्या ट्रीटमेंटचा शेवटचा टप्पा! सोमवार ते शुक्रवार, दर दिवशी, असे पाच आठवडे, म्हणजे एकूण मला २५ रेडएिशन्स सांगितले होते. राजेशनी, माझ्या नवर्‍यानी एक छानसे टेबल बनवले. दर दिवशी नवीन मित्र/मैत्रिणींसोबत मी MSK, Basking Ridgeच्या हॉस्पिटलात जात असे. माझ्यासाठी ते दरदिवशीचं आऊटींग असे. जायला-यायला प्रत्येकी एक तास, शिवाय काही मिनिटांची ट्रीटमेंट, असा माझा रोजचा तीन तासांचा तो दिनक्रम होता. 

 

एकत्र जाण्या-येण्यामुळे, गप्पा-विषय आणि मैत्री एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचले, यात शंकाच नाही. कॅन्सरचे असे ‘चांगले साईड’ इफेक्टस पण होते. १० जुलै २०१८ ला माझी रेडएिशनची शेवटची ट्रीटमेंट होती. पाच आठवडयाच्या त्या ट्रीटमेंटनंतर माझी त्वचा भाजल्यासारखी झाली होती. काही ठिकाणी water retention मुळे सुज आली होती. नेहमीचे कपडे घालता येत नव्हते. उपचार झालेली त्वचा बरी व्हायला पुढे दोन आठवडे लागले. 

 

मदत: आठ महिन्यांच्या कालावधीमधे असंख्य चांगले अनुभव आले. दर दिवशी कोणाचा तरी टेक्स्ट मेसेज येत असे. कुणाचा तरी फोन येई किंवा कुणीतरी भेटायला येत असे. कुणी माझ्यासाठी ‘रेकी’ केली, कुणी महाराजांचे अंगारे आणले, कुणी माझ्यावर कविता केल्या, लेख लिहीले, कुणी मला हाॅस्पिटलला नेण्यासाठी ऑफिसला सुट्ट्या घेतल्या, माझ्यासाठी भेटवस्तू आणल्या, फुलं आणली, पुस्तकं आणली, जेवण बनवलं, पार्ट्या आयोजित केल्या. मला बरं वाटावं म्हणून प्रत्येकानी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले. या काळात माझा सगळ्यात मोठ्ठा (आणि सर्वप्रकारचा) आधार होता, माझा नवरा राजेश! मेडिकलला शिकत असणार्‍या माझ्या मुलाची, कौस्तुभचीही खूप मदत झाली. माझी कुवेतला राहणारी बहीण, जयश्री स्वत:चा संसार सोडून माझ्या किमो आणि सर्जरीच्या दरम्यान आमच्याकडे रहायला आली. आईच्या मायेनं केलेलं तिच्या हातचं (रोजचं ताजं, सात्विक आणि पौष्टीक) जेवण मिळाल्यामुळे माझी रिकव्हरी लवकर झाली. 

या सगळ्या प्रवासात मी एकटी नव्हते. माझ्या मित्र-मैत्रिणींची आणि कुटुंबाची मला संपूर्ण साथ होती. मी खरोखरीच खूप नशीबवान आहे, याची परत एकदा नव्याने प्रचिती आली.

 

व्यायामाचं महत्त्व : या सगळ्या अनुभवातून जाताना मला व्यायामाचा खूप फायदा झाला. उपचार सुरू असतानादेखील, जेव्हा शक्य होतं, तेंव्हा माझं चालणं आणि योगासनं करणं सुरु होतं. बरेचदा आपण व्यायामाला खूप कमी लेखतो. व्यायामामुळे पोटाच्या तक्रारी, किमोचे साईड इफेक्टस् आणि मुख्यत्वे, एकटेपणा कमी व्हायला मला खूप मदत झाली.

 

कृतज्ञता: आपण बरेचदा कित्येक गोष्टी गृहीत धरतो. उदाहरणार्थ, उद्या मी हे करीन, ते करीन. ‘उद्या मी जिवंत असणार’, हे आपण गृहीतच धरतो. माझ्या ट्रीटमेंटच्या काळात, माझ्या चांगल्या ओळखीतले चार लोक कॅन्सर होऊन अचानक गेलेले मी बघितले. सुदैवाने, माझा कॅन्सर बरा होणारा होता. ट्रीटमेंटच्या काळात, बरेचदा, व्यायाम करताना (चालताना) डोक्यावरचा घाम थेट डोळ्यात जात असे, त्यामुळे भुवया आणि पापण्या असण्याचं महत्व कळलं. अजूनही बरेचदा जेवताना, मला जेंव्हा चव कळत नसे, तो काळ आठवतो आणि मग ताटात असलेलं जेवण अधिकच रूचकर लागायला लागतं.

हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी

छांव है कभी, कभी है धूप जिंदगी

हर पल यहाँ जी भर जियो

जो है समां कल हो न हो … 

...अशा गाण्यांचा अर्थ नव्याने उमगत जातो.

शेवटी: माझ्या कॅन्सरचा अनुभव लिहीण्यामागे कुणाची सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही. पण जागरुकता वाढावी, ही मनापासून इच्छा आहे. हा लेख वाचून दोन-तीन लोकांनी जरी मॅमोग्राम वेळेत काढला, तरी माझा हा लेख लिहीण्याचा हेतू यशस्वी झाला, असं म्हणायला हरकत नाही. घरातल्या इतर लोकांची काळजी घ्यायला, घरातल्या बाईनं सुदृढ असणं खूप महत्त्वाचं आहे. माझी समस्त स्त्री वर्गाला एक कळकळीची विनंती आहे, की दरवर्षी (किंवा डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे) मॅमोग्राम (आणि पॅपस्मीअर) करा. आपण आपल्या जवळच्या व्यक्तिंसाठी, त्यांना बरं वाटावं म्हणून आपण वाट्टेल ते करतो, पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतो. 

माझ्यासारख्या तब्येतीची काहीही तक्रार नसणार्‍या, कधी डोकेदुखीचीही गोळी न घेणार्‍या बाईला जर ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, तर तो कोणालाही होऊ शकतो. विशेषत: फॅमिली हिस्टरी असेल तर विशेष काळजी घेतली पाहिजे. सुदैवाने, माझी ट्रीटमेंट ताबडतोब सुरू झाली. आता मी पूर्ण बरी झाले आहे. माझा पूर्वीचाच जॉब परत सुरू झाला आहे. चालणं आणि थोडाफार इतर व्यायामही सुरू केला आहे. जीवनाची गाडी आता पूर्ववत रूळावर आली आहे. 

नोव्हेंबर २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीमधे, माझ्या आठ किमोथेरपीज्, एक मेजर सर्जरी आणि पंचवीस रेडएिशन्स झाले. उपचार झाल्यानंतर माझ्या डॉक्टरनं मला ‘कॅन्सर फ्री’ झाल्याचं शिक्कामोर्तब केलं आणि म्हणूनच या वर्षी माझा पुनर्जन्म झाला, हे अगदी खरं आहे! 

आठ महिन्यांचं ‘अनपेक्षित प्रोजेक्ट’ यशस्वीरीत्या पार पडलं आहे. दु:खांचा सम्राट असलेल्या, कॅन्सरशी चाललेली माझी झुंज आता संपली आहे.

… आणि म्हणूनच माझा हा ‘पुनर्जन्म’ आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि उगवणारा प्रत्येक नवीन दिवस मी आसुसून जगते आहे.

राजश्री कुलकर्णी  

नॉर्मल जगाच्या बाहेर धाडस करणारी राजश्री. उत्तम प्रकृती, उदंड उत्साह, “happy and healthy” चं प्रतिक असणारी राजश्री! न्यू जर्सीतच नव्हे तर उत्तर अमेरिकेतही अनेकांना परिचित असलेली. कोणाला तिच्या बृहन्महाराष्ट्रवृत्तातील पंढरीच्या वारीच्या लेखांमुळे माहिती असेल, तर कोणाला मॅरेथॉन रनर म्हणून! तिच्याकडून सतत काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. कधी सांगते, स्काय डायव्हिंग करून आली तर कधी वारी! चाळीशी उलटल्यावर मॅरेथॉन धावण्याचे रीतसर ट्रेनिंग घेऊन १२ हाफ मॅरेथॉन आणि नुकतीच न्यू यॉर्कची प्रसिध्द २६.२ मैलाची मॅरेथॉन तिने पूर्ण केली, ही आगळीवेगळी राजश्री.  तिने भारतात जाऊन वारकरी लोकांबरोबर पायी चालून १८ दिवसात २६० किमी ची पंढरीची वारी केली आहे. मध्यम वयाच्याच काय, पण तरूण मुलींना लाजवेल अशा तिच्या ह्या सगळ्या physical activities. शिवाय  सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचलन, ‘hidden gems’ या संस्थेच्या कामात सतत पुढाकार घेऊन केलेले कार्यक्रम, मराठी विश्वच्या ‘रंगदीप’ मासिकाचे एका वर्षी संपादन आणि नंतर सातत्याने केलेले संपादन सहाय्य अशा अनेक गोष्टी सुरु असतात. मराठी विश्वच्या ढोल-ताशा पथकात नाचायला राजश्री पुढेच असणार. अशी ही हरहुन्नरी, हौशी, आनंदी राजश्री.