गो ठ ले ले  क्ष ण  

 

डॉ. प्रियदर्शन मनोहर

 

आजकालच्या जगात बदल इतक्या झपाट्याने आणि सातत्याने घडतात की जगात 'बदल' हीच एक न बदलणारी गोष्ट आहे असं म्हटलं जातं. घडणाऱ्या बदलांचा वेगही वाढत चालला आहे. नव्या नव्या टेक्नॉलॉजीमुळे लोकांच्या आयुष्यात उलथापालथ घडत आहे. जुने व्यवसाय झपाट्याने काळाच्या ओघात गडप होत आहेत आणि आधी कधीही न ऐकलेले नवे व्यवसाय निर्माण होत आहेत. कोणे एके काळी एखादा माणूस पोस्टात किंवा बँकेत चिकटला की तो तिथे जन्माचाच चिकटला असं मानलं जात असे. जुन्या उद्योगधंद्यांमध्ये तर आपापल्या मुलांनाही चिकटवून घेण्याची मुभा होती. म्हणजे लोक स्टील फॅक्टरी, कार फॅक्टरीमध्ये पिढयानुपिढया काम करत आलेले आहेत. पण ते ही कालौघात नामशेष झालं आहे. अशा दीर्घकालीन नोकऱ्या आता उपलब्ध नाहीत आणि लोकसुद्धा कोणत्याही एका नोकरीत इतका वेळ स्थिरावत नाहीत. आजकालच्या जगात प्रत्येक व्यक्ती त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये पाच ते सात वेळा तरी व्यवसाय किंवा नोकरीचं स्वरूप संपूर्ण बदलते असा संशोधनाचा निष्कर्ष आहे! शिवाय लोक केवळ नोकरी, गावं, घरं इतकंच नाही तर देशसुद्धा बदलतात.

 

पश्चिमी राष्ट्रांमध्ये नातीसुद्धा स्थिर नाहीत. घटस्फोटांचे प्रमाण ५०% जवळपास आहे. घटस्फोटित लोक मग लग्न न करता नवी नाती जुळवतात किंवा पुढचे लग्न जुळवतात. म्हणजे अगदी जवळच्या, इंटिमेट नात्यांमध्येही बदल घडत असतातच. हल्ली असं ऐकतो की भारतामध्येसुद्धा घटस्फोटांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पुलंच्या 'असा मी असामी' मधल्या धोंडो भिकाजी जोश्याला त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवशी त्याचे वडील उपदेश करतात,"अरे हे बघ - नोकरी ही लग्नाच्या बायकोसारखी, काय समजलास? दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोडण्यात काहीच अर्थ नसतो! शेवटी सगळ्या बायका आणि सगळ्या नोकऱ्या सारख्याच! काय समजलास बेंबट्या?"  

 

हे तत्वज्ञान आता किती कालबाह्य झालंय! आता कुणीही बाप आपल्या पोरांना असं सांगणार नाही. उलट असं म्हणेल की,"बाबा रे तुला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर झपाट्याने घडणाऱ्या बदलांना कसं सामोरं जाता येईल, होणाऱ्या बदलांचा कसा आधीच अंदाज बांधता येईल, अपरिहार्यपणे होणाऱ्या बदलांचा स्वतःला फायदा कसा करून घेता येईल किंवा तुला हवा तो परिणाम साधण्यासाठी तुला हवे तसे बदल कसे करवून घेता येतील हे तुला कळलं पाहिजे. नुसतं एका जागी टिकून जरी राहायचं असेल तरीसुद्धा तुला पळावं लागेल तर मग पुढे जाण्याची बातच सोड! नुसता उभा राहिलास तर मागे गेलास म्हणून समज! थांबला तो संपला!" माझाही अनुभव जवळपास तसाच आहे. मी माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या गावात आणि देशांत स्वतःला कसं रुजवलं त्यातल्या काही सुरस आणि चमत्कारिक गोष्टी इथे सांगणार आहे.   

 

माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मला तीन वेळा खूप मोठे आमूलाग्र बदल करावे लागले आहेत. पहिला बदल बेळगावहून पुण्याला कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी आलो तेव्हा झाला. पुण्यात माझं वास्तव्य एकूण बारा वर्षं होतं. इंजिनियरिंग कॉलेजची चार वर्षं आणि पुढे नोकरीची आठ वर्षं. ह्या बारा वर्षात सतरा वर्षाच्या तारुण्याच्या उंबरठयावर असलेल्या कोवळ्या तरुण मुलाचं रूपांतर अनुभवी पुरुषात झालेलं होतं. आणि हा बदल अर्थातच सहजासहजी घडला नव्हता.

 

नाती जोडली जाणे आणि तुटणे, मित्र मिळणे आणि हरवणे, गैरसमज आणि दिलजमाई, परीक्षांमधलं झगमगीत यश आणि सपशेल अपयश, मिळालेले सन्मान आणि झालेले अपमान, यशस्वी ठरलेले आणि फसलेले निर्णय, व्यावसायिक प्रशिक्षण आणि ज्ञानार्जन, युनिव्हर्सिटीचं सुवर्णपदक आणि मुंबई आयआयटीची मिळालेली पण सोडून दिलेली ऍडमिशन, नोकरीचा अनुभव, नोकरीत मिळालेल्या आणि गमावलेल्या प्रगतीच्या संधी, लग्न आणि एका पोराचा बाप होण्याचा अनुभव, पहिली अपार्टमेंट खरेदी, घरगुती कटकटी आणि नसते वितंडवाद, कॅन्सरसारख्या रोगाशी सामना करणाऱ्या व्यक्तीची दीर्घ काळ काळजी घेणे आणि दोन जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू, स्वतःतल्या लेखनशक्तीची जाणीव होणे, परदेशी जाण्याची तयारी, त्यातलं यशापयश आणि आर्थिक नुकसान. शेवटी आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आणि कष्टांनी जमवलेलं सगळं घर, संसार, करिअर सोडून अज्ञातात घेतलेली झेप. इतक्या अनुभवांची पुंजी पुण्यातल्या बारा वर्षांत माझ्याकडे जमली होती.

पुण्यातले दिवस. सोबत अनघा.

 

पण ह्या पुण्याच्या बारा वर्षांच्या विविधरंगी वास्तव्यात एक क्षण असा आला होता की त्या एका क्षणात माझ्या त्या पुण्याच्या एका तपाचा आणि त्याच्या पुढच्या आयुष्याचा अर्थ साठवलेला आहे. कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात मी हॉस्टेलकडून कॉलेजकडे निघालो होतो. बेळगाव सीमाभाग असल्यामुळे आमच्या ॲडमिशनला राजकीय कारणांमुळे उशीर झाला होता. आम्ही कॉलेजमध्ये आलो तेव्हा आमची पहिली टर्म जवळजवळ संपतच आली होती. कॉलेजमध्ये आम्हाला कोणीही ओळखत नव्हतं. पुण्यात आमच्या ओळखीचं तेव्हा फारसं कुणी नव्हतं. कॉलेजमध्ये काय चाललंय ते एक अक्षर कळत नव्हतं कारण टर्म चालू होऊन चार महिने उलटत आलेले होते. शिवाय कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या गणिताच्या अभ्यासक्रमात खूपच फरक होता. त्यामुळे गणित ह्या हक्काच्या विषयात पण नाकातोंडात पाणी जात होतं. काही विषयांची पुस्तकं मिळत नव्हती. मेसचं अन्न नीट पचत नव्हतं. वर्कशॉपमध्ये डाळ शिजत नव्हती कारण घरी काही हाताने काम करण्याचा अनुभवच नव्हता. इंजिनियरिंग ड्रॉईंगच्या कामाला पुनःपुन्हा 'रिपीट' असा शेरा मिळत होता. एकूण सगळं जग झाकोळात चाललं होतं. कशातही पास होता येईल असं वाटत नव्हतं.

 

अशा सगळ्या विचारात असताना कॉलेजच्या मागच्या दाराच्या दिशेने जात होतो. वाटेत रेल्वे रूळ होते. त्यावर उगीचच रेंगाळलो. इतक्यात वळणावरून शिवाजीनगर स्टेशनवरून सुटून पुणे स्टेशनकडे जाणारी एक रेल्वे येताना दिसली. मी जाग्यावरच खिळलेला राहिलो. तसाच उभा. त्या गोठलेल्या क्षणात मी ही गोठलेला. काय करावं? काहीच केलं नाही तर सगळे प्रश्न संपतील. पण मग काहीच मागे उरणार नाही. बाजूला व्हावं. का? भीती वाटते? रेल्वेची भीती वाटते की कॉलेजची? रेल्वेची भीती एका क्षणात संपणार आहे. रेल्वे येतेच आहे पुढे. आता ड्रायव्हरने खच्चून शिट्टी फुंकली. इतक्या जवळ येत चाललेल्या गाडीची ती कर्कश शिट्टी कानाचे पडदे फाडून आता शिरली. पायांना गाडीच्या रुळांची कंपनं जाणवू लागलेली होती.

 

काय करावं? कोणतं आव्हान जास्त मोठं आहे? माझी हिंमत मला सिद्ध करायची आहे पण मी ती कशी सिद्ध करणार? कोणत्या मार्गाने? ड्रायव्हरचं डोकं आता इंजिनाच्या बाहेर आलं. तो आकांताने ओरडत होता. मी बाजूला होण्यासाठी हातवारे करत होता. पण माझा संभ्रम गेला नव्हता. मला उत्तर हवं होतं. कुठलं आव्हान जास्त कठीण आहे? जीवन की मृत्यू? मला भीती कशाची वाटते आहे? जीवन की मृत्यू? मला त्या भीतीवर मात करायची आहे. मी असा घाबरत, पळत बसणार नाही. पण मी एका वेळी एकच आव्हान घेऊ शकतो. कुठलं आव्हान स्वीकारू? जीवन की मृत्यू? कुठलं? कुठलं?

 

गाडीची कर्कश शिट्टी कानाजवळून गेली. ड्रायव्हरच्या फेड आऊट होत जाणाऱ्या शिव्या ऐकू आल्या. गाडीच्या वाऱ्याचा तोंडावर सपकन फटकारा बसला. मी एक पाऊल अजून मागे सरकलो. गाडी धडधडत पुढे निघून गेली. मी रूळ ओलांडून कॉलेजच्या आवारात आलो. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग डिपार्टमेंच्या पायऱ्यांवर बसलो. आता माझ्या पायातलं त्राण गळून गेलं होतं. सगळं अंग थरथर कापत होतं. पण मन मात्र निश्चल झालं होतं. मनाने खूणगाठ बांधली होती की ह्या कॉलेजमधल्या  सगळ्या परीक्षा व्यवस्थित पास होऊन, इथला पदवीधर होऊनच मी ताठ मानेने तिथून बाहेर पडणार होतो. पुढे तसंच झालं.

 

चार वर्षांनी ती डिग्री मिळून वर पुणे युनिव्हर्सिटीचं सुवर्णपदक मिळालं. त्या यशाच्या पाठीमागे तो एक रेल्वे रुळावरचा गोठलेला क्षण आहे ज्याचं श्रेय मी मला देऊ शकत नाही. परमेश्वराची इच्छा असल्यामुळे माझ्याकडून त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला गेला असावा असं मला वाटतं. आणि तिथून पुढे मी पुण्यनगरीत खऱ्या अर्थाने रुजायला आणि फुलायला सुरुवात झाली.  

पुढे वाचा..