मागील पानावरुन..

वयाच्या तिशीच्या सुरुवातीला उच्च शिक्षणासाठी मी ऑस्ट्रेलियात गेलो तेव्हा मला माझ्या कर्तृत्वाचा अभिमान जरूर वाटत होता. स्वतःच्या पायांवर खंबीरपणे उभं राहण्याच्या पुण्याच्या अनुभवांवरून  मला असं वाटलं होतं की मी आता कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. पण ह्या माझ्या अभिमानाला ऑस्ट्रेलियात लगेच तडा गेला. तिथे वेगळ्याच तऱ्हेची संकटं माझी वाट पाहत होती. पहिली गोष्ट म्हणजे मी तिथे ज्याच्यासाठी गेलो होतो - म्हणजे उच्च शिक्षणासाठी - ते काही मला सुरुवातीच्या काळात रुचलं नव्हतं. मग त्याचा नाद सोडून मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नांतही यश मिळालं नाही.

ऑस्ट्रेलियात तेव्हा व्यावसायिक नोकरीच्या संधी कमी होत्या आणि गौरवर्णी नसलेल्या कसबी इंजिनियर्सचा त्यांना अनुभव नव्हता. तिथल्या बहुसंख्य लोकांना भारत तंत्रज्ञानात किती प्रगत आहे ह्याची कल्पनाच नव्हती त्यामुळे "हॅ! भारतातला इंजिनियर! ह्याने काय टेक्नॉलॉजी पाहिली असणार? ह्याला काय येत असणार? ह्याला काय कळणार?"  ह्या त्यांच्या दूषित पूर्वग्रहाशी सामना करावा लागला. शेवटी असं वाटायला लागलं की ही,"जबरदस्तीने घरी बसण्याची भयंकर बेकारी नको. मला कोणतंही काम चालेल - द्या! मी करीन ते काम! अगदी एखाद्या कामगाराचं काम असलं तरी चालेल. ते करायला मी तयार आहे पण हे बिनकामाचं घरी बसणं नको!" अशी माझ्या मनाची तयारी झाली. पण माझं कॉलेज शिक्षण अशा तऱ्हेची  नोकरी मिळवायच्या आड येत होतं.

 

माझी ही नोकरीधंदा नसल्याने आणि घरी एकाकी असल्यामुळे चाललेली घालमेल पाहून शेवटी माझ्या अपार्टमेंटच्या मालकाने मला त्याच्या शेतावर काम करायला येशील का अशी विचारणा केली. त्याच्या शेतावर त्याचे घोड्यांचे तबेले होते. रिअल इस्टेट बरोबरच शेती आणि घोडे पाळणे/विकणे अशातऱ्हेचे त्याचे जोडधंदे होते. त्याचं वाक्य ऐकून एक क्षणभर माझ्यासाठी काळ गोठला! एकीकडे बेकारीतून सुटका करणारी नोकरीची संधी होती तर दुसरीकडे मायदेशात स्वतःची आणि बायकोची उत्कृष्ट चाललेली करियर वाऱ्यावर टाकून ह्या परदेशात आता 'शेतमजूर' होऊ पाहणारा मी! पण ही नोकरीसुद्धा मी केली नाही तर बेकारांच्या रांगेत उभा राहणारा मी! कोणतं चित्र चांगलं आहे? कशासाठी मी आलो इथे? काय बोचत होतं मला म्हणून निघालो तिथून?

 

माझा चेहरा बघून तो बिचारा घाईघाईने माझी माफी मागत मला म्हणाला,"तुझ्याकडे कॉलेजची डिग्री आहे हे मला माहित आहे पण तू नुसता घरी बसून तरी काय करणार? काहीतरी व्यर्थ विचार करत बसशील आणि डिप्रेस होशील. त्यापेक्षा माझ्या प्रॉपर्टीवर काम कर, त्यात मन गुंतव आणि जेव्हा तुला तुझ्या मनाजोगती नोकरी मिळेल तेव्हा तू निघून जा. नो प्रॉब्लेम." मी त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणालो,"जॉर्ज - तुला कल्पना नाही की मला ही नोकरी देऊ करून तू माझ्यावर किती उपकार केले आहेस ते. तू कशाला माझी माफी मागतोस - हा तुझ्या मनाचा मोठेपणाच आहे. तुला काम करणाऱ्या माणसाची गरज आहे आणि मला कामाची गरज आहे. मग त्यात भीडभाड कसली? मला कोणतंही काम लहान मोठं वाटत नाही. मी तुझ्या शेतावरचं काम आनंदाने करेन. मला फक्त पंधरा दिवस मुदत दे. मला दोन मुलाखतींची निमंत्रणं आली आहेत. त्या मुलाखती झाल्या की मी माझा निर्णय तुला कळवेन. मनापासून धन्यवाद!"

सुदैवाने त्यातल्या एका ठिकाणी माझं कोष्टक जमलं आणि पुढची दहा वर्षं माझं उच्च शिक्षण, नोकरी, संसार व्यवस्थित झाला. ऑस्ट्रेलियात आम्ही सगळे चांगलेच रुजलो आणि वाढलो. पण अतिप्रगत रिसर्च करण्यासाठी एक चांगली संधी माझ्यासाठी अचानक चालून आली आणि पुन्हा एकदा आम्ही आमचं चंबूगबाळं आवरलं आणि अमेरिकेला प्रयाण केलं. इथे नव्या गावात, नव्या संस्कृतीत, नव्या लोकांशी ओळखी करून घेत, नवी मैत्री करत आमचं आता बस्तान पिट्सबर्गला नीट बसलं आहे. इथे सुरुवातीच्या काळात जे भले बुरे धक्के बसायचे ते बसलेच, आश्चर्यचकित व्हायचीही वेळ आली पण ह्यावेळी आमचा अनुभव आमच्या पाठीशी होता.

१. संशोधन सादर करताना

२. संशोधन प्रबंध संपादन

आम्ही चाळीशीच्या जवळ आलो होतो आणि स्थलांतराची, स्थित्यंतराची चांगली तयारी करून आलो होतो. त्यामुळे जे दणके बसले त्यांची तीव्रता एव्हडी जाणवली नाही. इथला एक गोठण्याचा क्षण एका चांगल्या अर्थाने माझ्या साठवणीत आहे. ध्यानीमनी नसताना उदयन आपटे ह्या आमच्या मित्राने माझ्याकडून माझ्या दोन कथांच्या एकांकिका करून घेतल्या आणि त्या बसवल्या. दुसरा मित्र प्रमोद नेमळेकर ह्याने "मराठी बाणा इन बर्ग" ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मला आणि अनघाला करायला सांगितलं. त्या दिवशी तीन तासांचा जो भरगच्च 'रंगसंगीत' कार्यक्रम पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळासाठी सादर झाला त्यातला स्टेजवरून सादर केला गेलेला प्रत्येक शब्द मी लिहिलेला होता! प्रेक्षकांचा त्या कार्यक्रमाला जबरदस्त प्रतिसाद लाभला. त्यावेळचा बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष पिट्सबर्गचा गिरीश ठकार त्यावेळी प्रेक्षकांत उपस्थित होता आणि त्याने खुश होऊन तिथल्या तिथे त्या कार्यक्रमाला $१,००० ची देणगी दिली!

"रंगसंगीत" कार्यक्रम

त्या कार्यक्रमाला मंडळाला जो खर्च आला होता ते सगळे पैसे त्या दिवशी त्या कार्यक्रमाने कमावले. हे सगळं मला अगदी अनपेक्षित होतं आणि नवलाचं होतं. कार्यक्रम संपल्यावर सर्व प्रेक्षकांनी उत्सुर्तपणे उभं राहून टाळ्या वाजवल्या तेव्हा असं जरूर वाटलं की पुण्यात जाणवलेली लेखन विषयक वाटचाल आज यशाच्या शिखरावर येऊ पाहत आहे. गेली बारा वर्षं आम्ही तो कार्यक्रम सादर करत आहोत आणि बऱ्याच वेळा त्यात मी लिहिलेल्या एकांकिका किंवा संगीतिका सादर होत असतात. संपूर्ण महाराष्ट्राचं नाही पण माझ्या गावकऱ्यांचं मनोरंजन करण्याइतपत ताकद माझ्या लेखणीत आहे ह्याचं मला समाधान वाटतं.

 

नवीन ठिकाणी रुजण्याच्या बाबतीत गावं वेगवेगळी असली तरी, संस्कृती, भाषा, देश, वेष आणि खंड वेगवेगळे असले तरी, आव्हानं वेगवेगळी असली तरी काही काही गोष्टी समान आहेत. स्वतःवर विश्वास हवा. आव्हानांना सामोरं जाण्याची हिंमत हवी. कष्ट करण्याची तयारी हवी. कुणाची तरी समर्थ साथ हवी. गणपती बाप्पाचा आशीर्वाद असतोच आपल्या पाठीशी नेहमी. मग त्याच्या आशीर्वादाने आपला संसार बिनधास्त जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन जावा आणि महाकवी माडगूळकर म्हणतात तसं आनंदाने करावं - 

थोडी हिरवळ थोडे पाणी; मस्त त्यात ही रात चांदणी

उतरा ओझी विसरा थकवा; सुखास पळभर चुंबू

इथेच टाका तंबू!  

गाव कोणतंही असलं तरी आपोआप रुजवात होतेच!

डॉ. प्रियदर्शन मनोहर

कॉलेज पासून साहित्य लेखनाला सुरुवात केली. अनेक कथास्पर्धांतून बक्षिसे (दै. लोकसत्ता, सकाळ, विमल प्रकाशन, एकता आदी). 'पैंजण', 'बुवा', 'श्री व सौ', 'एकता', 'झेप', रंगदीप', 'वसंत', 'बेळगाव समाचार' अशा दिवाळी अंकांतून अनेक कथा प्रसिध्द झाल्या आहेत. 'कथा कुणाची व्यथा कुणा' हा कथासंग्रह, व 'आनंदाचा फॉर्म्युला' हा ललित लेखसंग्रह अजब पुस्तकालय, कोल्हापूर यांनी प्रकाशित केला आहे. अलीकडेच 'सिग्नल' हा एकांकिका संग्रह अरिहंत प्रकाशन, पुणे ह्यांनी प्रसिद्ध केला आहे. 'ऑफ द हूक' आणि 'ऑफ द हुक - पुस्तक दोन - जीवनगाथा' हे दोन लेखसंग्रह दहावी दिवाळी ह्या प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यंत एकूण वीस संगीतिका आणि एकांकिका लिहून उत्तर अमेरिकेत सादर केल्या आहेत. 'आनंदाचा फॉर्म्युला' ह्या विनोदी लेखसंग्रहाला वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव यांनी दिलेला कृष्णराव हुईलगोळ साहित्य पुरस्कार. 'संगीत नाट्यसंभव' ह्या संगीत नाटकाच्या संहितेला 'खल्वायन, रत्नागिरी' आणि 'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा' संहिता लेखन पुरस्कार. अमेरिकेतील मराठी नाटकाच्या वृद्धीसाठी विशेष पुरस्कार - द बिग बँग थिएटर, कॅन्सस सिटी.