मा झे  रु ट बॉ ल  प र्व  

प्राजक्ता पाडगावकर   

मला इथे अटलांटात आल्यापासून पीचची झाडे मागल्या अंगणी लावायची आहेत. त्यासाठी मी पार फ्लोरिडापर्यंत जाऊन एक बुटकी जात शोधते आहे पीचच्या झाडांची! आमचा कम्युनिटीमध्ये मोठी झाडे लावण्यावर म्हणे आक्षेप आहे! तरी मी अजून शोधतेच आहे! एका ठिकाणी मी फोन करून झाडाची विचारणा केली तर तिथे असा प्रतिप्रश्न आला, "झाड रुटबॉल सहित हवे कि अजून कसे?" मला अजिबात पत्ता नाही हा काय प्रकार आहे! मी आपले काही भलतेच यायला नको म्हणून परस्पर नाही म्हणून मोकळी झाले! एकच झाड मिळाले ते देखील असे बॉल वगैरे सारखे, जाऊ दे, पुढच्या हंगामात बघू म्हणून मी सोडून दिले! तरी तो शब्द घुमत राहिला डोक्यात, रुटबॉल...बॉलरूट ...काय काय काय.. अर्थात गुगलेश्वराची कृपा अगाध! लागलीच दृष्टांत दिला! तात्काळ साक्षात्कार!! दिव्यदृष्टीने जे दिसले त्याचे काय वर्णन करावे!! असो, करतेच तरी!

झाडाची मुळे, थोडी माती, असे सगळे एक मुटकुळे करून गोणपाटाच्या वेष्टनात गुंडाळलेले असते! जिथून ते झाड उगवले आहे  तिथली थोडी माती, पोषकतत्व आणि ओलावा, मुळांना सहज आणि सतत मिळत रहातो आणि गोणपाट असल्याने बाहेरच्या मातीशी, मुळांचा अजिबात संबंध येत नाही आणि तरी झाडाची वाढ बिनघोर होत राहते! अशी ही मुळांचा बॉल केलेली झाडे त्यांच्या निश्चित केलेल्या स्थळी जेव्हा पोचतात, तिथे जाऊन त्यांच्या मातीसहित त्यांना नव्या जमिनीत रुजवले जाते. मग ही मूळे स्वतःच्या मातीचा परीघ सोडून जिथे रुजवली गेली आहेत, तिथली माती ताडून तपासून तिथे हळूहळू आपली पकड रुजवू लागतात. गोणपाट आधी गळून पडतो, मग मूळच्या मातीचा थर आणि मग शेवटी जिथे रुजले आहे तिथली माती. काय गंमत आहे ना!

 

ह्या बागकाम संशोधनाच्या निमित्ताने मला ही संकल्पना मिळाली ती मला फारच पटली. आधी गंमत म्हणून आणि मग संकल्पना म्हणून. माझं गेल्या दहा एक वर्षांचे जगणं तसे आहे. एका संकल्पनेत ते मला अक्षरशः गवसलं! एकवटता आलं आणि मग मला अगदी हायसं वाटलं. मी आहे तो रुटबॉल केलेला पारिजातकाचा वृक्ष. मी जेव्हा माझे गाव सोडले-परिचित माती सोडली तेव्हा मी कंटाळले होते त्या छोट्या संथ जीवनाला. मला वेग हवा होता, धाडस आणि पराक्रम हवा होता! जगण्यातली झिंग हवी होती! म्हणून आधी मुंबईत आले. तिथे सात वेळा घरे बदलली, एका वर्षात. आणि मग लग्न करून चक्क शहरे आणि मग सरतेशेवटी देश बदलला. प्रत्येक गावाशी नाते रुजू पाहत होते, रस्ते सहज पाठ होऊ लागले होते आणि भाजीवाला ओळखीचा होऊन नुकतीच ज्यादाची मिर्ची कोथिंबीर देऊ लागला होता. तसे झाले की मनात एक अनामिक अस्वस्थता घेरून येई. हा परिचितपणा हळू हळू अंगावर वाढू लागे. इस्त्रीवाला, दूधवाला 'भैय्या' होऊ लागे आणि रिक्षावाले चक्क थांबून स्टेशन ते घर नेऊ लागत. बास ही म्हणजे शेवटची लॅप. ह्यानंतर हा ट्रॅक  बदलायचा. असे काहीसे ठरले होते.

सलग चार महिने त्याच मोलकरणीला पगार दिला, आता तिला माझ्या येण्याच्या वेळा समजू लागल्या, इतर घरातील कुरबुरी वगैरे ती प्रेमाने आणि हक्काने मला ऐकवू लागली की माझी बेचैनी शिगेला पोचू लागे. मनात एकच भोंगा घोंगावू लागे - निघ, निघ निघ आता इथून...बिल झालं... मग पुन्हा सगळा बोरियाबिस्तर बांधून मी निघून जायचे. चक्क शेजारच्या स्टेशनच्या परिसरात, नवीन घर भाड्याने घ्यायला आणि मग पुन्हा तीच सगळी नवखेपणाची शृंखला नव्याने अनुभवायला! आधी ठीक होते कारण मुंबईत  कुठेही राहिले तरी सोमवार ते गुरवारसाठी मुंबई बरी होती. शुक्रवार रात्र काही मुंबईत घालवायची नाही असा नेम केल्यासारखी मी सतत मुंबईतून पळ काढत असे... पुण्याला घरी जा, कधी गोवा, कधी हैदराबाद, कधी लखनौ, कधी महाराष्ट्रातले नक्षली इलाके, कधी गुरगांव, कधी दिल्ली...कुठेही...पण मुंबईत नाही... अगदी कुठे नाही तर मुंबईत दक्षिण मुंबई, अगदी समुद्रालगत....काहीही करून मला तो सागरातील ओंडका राहायचे होते. कोणत्याही काठाला कधी लागायचे नव्हते! कोणतेही नाते सलग निभवायचे नव्हते, अगदी जन्मोजन्मीचा भाजीवाला, भंगारवाला देखील नको होता. मला धूसर असायचे होते, प्रत्येकाच्या स्मृतीत धूसर. कोणी कधी आलेच असते माझा माग काढत तर प्रत्येक सोसायटीच्या रखवालदाराची एकसारखी प्रतिक्रिया मला निर्माण करायची होती.

 

'वो मॅडम? जो वो लंबीसी पतली सी हैं ...वही जो शायद यहा फ्लॅट नं ...कौन सा था वो...जी जी देखा हैं मगर अब याद नही आ रहा ...थी ही नही ज्यादा देर यहां ...अब पता नाही कहां गयी...'

भारतात राहतानाची  घरं 

 

मला मुंबईच्या गर्दीच्या दुधात बोर्नव्हिटा व्हायचं होतं, अगदी अगदी स्वतःला ढवळून हरवून घ्यायचे होते. कोणत्याही गर्दीत, कोणत्याही डब्यात कोणीतरी व्हायचं होतं. पुण्यात मला नाव आडनाव आणि अगदी वडिलांच्या नावाने ओळखणारा मोठा वर्ग होता, आहे. त्या परिचितपणाच्या मगरमिठीतून मला अगदी ठरवून दूर जायचं होतं. इंग्रजीत जे चिडून त्वेषाने 'गेट लॉस्ट!' म्हणतात ना, ते मला स्वतःला म्हणून नाही, तर जगून बघायचं होतं. का? माहित नाही, आयुष्याची २५ वर्ष एका शहरात, गावात काढल्यावर एक साय साठत जाते, परिचितपणाची...जाड मऊसर साय ... त्यातून होतं असं की खालचे सगळे अस्तित्वाचे दूध खळखळ उकळू शकत नाही की त्या सायीवरले काही बघू शकत नाही. ह्या अशा उबदार ओशट प्रेमळपणाचा मला उबग आला होता कदाचित.

 

तोच माज, तो मिजास, तीच मस्ती आणि तेच जिंकणं! सगळे इतके साचेबद्ध आणि खात्रीशीर की एखाद्या सिनेमातले अथवा मालिकेतले पात्र असल्यासारखे वाटू लागले होते....मला अगदी टोकापाशी जाऊन ते क्षितिज टरकावून पाहायचे होते! ह्यापलीकडे जग आहे का नाही? जिथे माझी ओळख नाही तिथे मला नव्याने ओळख निर्माण करता येते का नाही? आजीच्या गोष्टीतली मी गर्विष्ठ बेडकी झाले तर नव्हते ना? मला खात्री करून घ्यायची होती, स्वतःला अजमावून पाहायचे होते! म्हणून अगदी जगातले नावडते शहर निवडले-मुंबई! मला पोटतिडकीने ज्या शहराचा राग आहे, तिथेच मी गेले...स्वतःचा व्यवसाय सोडून नोकरी करणे म्हणजे माझ्यासाठी महाकठोर शिक्षा, तेच केलं, एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीला रुजू झाले आणि तिथून सुरु झाला हा स्वतःशीच खेळ! शिरा पुरी, पुढच्या घरी !

 

प्रत्येक वेळी नवा पार्टनर, नवे उपनगर आणि नवेच सगळे! कधी मुलगे रूममेट, कधी मुली, कधी जोडपी! काहीही चाले, माझी एकटीची राहण्याची सोय जशी होईल तशी मला मान्य होती! कोणत्याही प्रकारे मैत्रीपलीकडले गुंतणे मला अमान्य होते आणि मुंबईत ते सहजसाध्य होते! मी लोकलच्या वेळा बदलून जात असे, निरनिराळ्या स्टेशनानांवरून गाडी पकडत असे, कारण मला त्या गर्दीत देखील रेल्वेच्या मैत्रिणी, प्लॅटफॉर्म चे मित्र आणि पुलावरचे भिकारी परिचित नको होते...मी सतत स्वतःत मश्गुल...निनावी जणू....

पुण्यात, रुपालीत अर्धा तास बसले तर जिथे एक डझन लोक मला ओळखत होते, तिथे मुंबईत मला कोणीच ओळखत नव्हते! त्या अनोळखी असण्यात एक उब होती...एक शांताता होती आणि परिचयाचा धाक नव्हता अजिबात! मला माझे असणे एकाच विशिष्ट प्रकारे प्रोजेक्ट करायची गरज भासत नव्हती! खासच मज्जा होती त्या दिवसांची! मुंबईच्या जेव्हा मी प्रेमात पडले तेव्हा अशीच धास्तावले! आता हे शहर आपलेसे वाटू लागणार, इथले रस्ते गर्दी आपली होणार आणि इथला घाणेरडा पाऊस आणि लोकांचे चिकचिक उफाळून येणारे मुंबई स्पिरिट का काय ते ही आपले होणार का काय!! आणि मग झाले तसेच...मी २६/११ ला बरोबर अर्धा तास अगोदर ताजमधून माझ्या रशियन मित्रमैत्रिणींसोबत बाहेर पडले आणि मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसवर अडकून पडले...झालं! जुळली मुंबईशी नाळ! अशीच! 

पुढच्या पाच महिन्यात सगळे पाश तोडून मी चक्क ठाण्यात राहायला निघून गेले! पुन्हा तिथे तेच, अनंत  सामंतांच्या गोष्टीतले ठाणे राहून राहून मनात येऊ लागले...जुने पाडे, जंगल आणि मिसळ...गडकरी रंगायतन खुणावू लागले, जांभळी नाका, ब्रह्माचे मंदिर, तलाव बागा सगळे परिचित होऊ लागले...स्टेशनवरच्या अम्माकडून अर्था बोट गजरा मोठा मिळू लागला...पुन्हा पळ काढावा की काय...अजून दूर घोडबंदरला  घर! तिथून रोज कुलाब्याला जात असे...म्हणजे मग धड ना मी ठाण्याची ना धड दक्षिण मुंबईची...लग्न झालेली नवी सून ठाण्याच्या रखवालदाराला देखील धूसरच आठवत होती...माझा हेतू अजून सफल होत होता...

मी अजून देखील सभोवताली धुके घेऊन वावरत होते...मी होते आणि नव्हते देखील...

पुढे वाचा ..