आ सा व री  

 

लेखक: प्राजक्ता अजित  

छायाचित्र: मधुराणी सप्रे

मॉडेल: रावी

उन्हाळ्यातल्या दुपारी गावात तशी जाग कमीच असते. उन्हाच्या झळांनी रस्ते वितळून वाहतात की काय असा भास होतो, फार वेळ ऊन पाहिलं तर डोळे तळावतात. पाण्याच्या जुन्या टाकीच्या हौदापाशी परिटाच्या बायका कपड्याचे धुणे लावतात. दुपारच्या जेवणांनंतर खिडक्यांवर पडद्याच्या ओलसर पापण्या ओढून घरं वामकुक्षी घेतात, दुकानं हलकी हलकी पेंगू लागतात आणि सावलीत पक्ष्यांची गर्दी होते. अगदी द्वाड पोरंटोरं सुद्धा सुट्टी असून असल्या उन्हात फिरकत नाहीत. कुठल्याशा डेरेदार झाडाखाली मातीत "गली" करून गोट्यांचा खेळ चालतो. अशीच वेळ भाऊकाकांना फार आवडते. यावेळी वाड्याच्या अंगणालगतच्या खोलीत त्यांच्या आरामखुर्चीत बसून ते हलक्या आवाजात रेडियोवर गाणी ऐकतात.

अंगण अगदी रस्त्यालगत असलं तरी आता रहदारी थंड असते. बाकीच्या वेळी वाड्याचा  दर्शनी भाग अगदी रिकामा असतो. कुंपणावरची मधुमालती कधी अगदी शिस्तीत होती, आता रानटी वेलीसारखी फोफावली आहे, सोनचाफाही इतका उंचापुरा झाला आहे की कडेकडेच्या सदाफुली, अबोली सगळ्यांवर छत्री धरल्यासारखा सावली ठेवतो! अंगणातला झोपाळा अगदीच गंजून गेलाय. झाडं जरातरी राखली जातात, भाऊकाकांची खुर्ची झोपाळ्याकडे पाठ फिरवूनच असते. एरवी कधी अंगणात फिरले तर चाफ्याच्या घमघमाटाने घुसमटल्यागत चेहरा करतात आणि बाकीच्या वेळी कपाळावर कायमच्या आठ्या असतात.


डोक्यावरचे केस आता विरळ झालेत, शुभ्र आणि जाडसर भुवया थकून झुकल्यासारख्या दिसतात. सुरकुत्यांच्या जाळ्यात कपाळावरच्या आठ्या मात्र ठसठशीत दिसतात. वर्षानुवर्षं चेहरा साच्यात घातला आणि त्यातच रुतून बसलाय असं वाटावं. उंचेपुरे आणि भारदस्त खांदे वयाचं आणि एकटेपणाचं ओझं घेऊन वाकलेत आणि आता फार हळू तरंगल्यागत चालतात. त्यांनाही त्यांच्या वयाचा अंदाज नाही असं कुणाला वाटावं पण अगदी दररोज तासून धार लावल्यासारखा त्यांचा मेंदू तल्लख आहे. कुणी विचारलं तर "यावर्षी ऑगष्टात चौर्‍यांशी पूर्ण होतील " असं उत्तर देतील, पण त्यांना विचारायचं धारिष्ट्य करणार कोण ? बोलणारे चार लोक केव्हाच "वर" गेलेत. आता आसपास इतका बदलून गेलाय, शेजार पालटलाय. सगळ्या जगातून विलग त्यांचं फक्त वाड्यापुरतं मर्यादित विश्व राहिलं आहे. नाही म्हणायला घरकाम करणारा शिवा आणि दिवसातून एकदा मलमपट्टी करायला येणारा दिवाकर एवढेच ओळखीचे दोन चेहरे आहेत. बाकी सगळ्यांना भाऊकाका ठरवून विसरून गेलेत.


पहाटे उठायची काहीच घाई नसते पण रिटायर होऊन वीसेक वर्ष झाली तरी भाऊकाका पहाटेच उठतात. औटहाऊसमधून शिवा येईपर्यंत आपला चहापाणी उरकून घेतात. इतक्या वर्षांपासून डायबेटिसची सोबत असल्यासारखी आहे, पथ्यपाणी,गोळ्यांच्या वेळा तंतोतंत पाळतात. गेल्या काही महिन्यात शुगर कंट्रोल होईना झाली आणि पायाला जखम झाली. चालायला त्रास होत असूनही भाऊकाकांना हात दिलेला आवडत नाही. शिवालाही हे चांगलं माहीत आहे. त्यांनी हाक मारली तरच तो त्यांना मदतीला जातो, त्यांच्यावर लक्ष मात्र ठेवून असतो. पायाच्या दुखण्यामुळे भाऊकाकांची देवपूजा बैठकीतून खुर्चीवर आली, पीतांबराची लुंगी गुंडाळू लागले पण देवांवर फुलं वाहायची नाहीत हा नियम बदलला नाही. नैवेद्याच्या खडीसाखरेवर मुंग्यांच्या पिढ्या वाढल्या, त्या साखरेला त्यांनी कधी हात लावला नाही. जेवणाच्या पक्क्या वेळा शिवा ध्यानात ठेवून पाळतो. उपासतापास, देवधर्म सारं त्यांनी वर्ज्य ठेवलंय.

आज सकाळपासून भाऊकाका काहीसे अस्वस्थ आहेत. रोजच्यासारखं पूजा करून मागल्यादारी तुळशीत पाणी घालायला गेले आणि कुंपणाकडे पोरांचा कल्ला ऐकू आला. कुंपणातून परसात क्रिकेटचा बॉल पडलेला होता आणि तारेखालून बॅट घालून काढायची कुणीतरी शक्कल लढवली होती. तो प्रकार पाहून भाऊकाका इतके संतापले की धावून गेले पोरांवर, पोरं ’बॉल द्या’ म्हणून गयावया करू लागली, काका आणखी रागावले. शिवा आतून धावत आला आणि त्याने मध्यस्थी केली म्हणून नाहीतर काकांनी हातातलं ताम्हण फेकून मारायला कमी केलं नसतं! "कार्टी उच्छाद घालतात नुसती, मला टारगट पोरं आवडत नाहीत, फिरकू नका पुन्हा इथे... " काका किंचाळले जाताजाता, "तरी सांगत होतो म्हाताऱ्याच्या मागल्यादारी नको खेळायला...डोकं सटकलंय त्याचं." कुणीतरी बोललेलं कानावर पडलंच. काकांच्या डोक्यात नुसता कलकलाट माजला होता. जेवतानाही नजर सैरभैर होती. आताशा आजूबाजूच्या लोकांचं त्यांच्याबद्दल हेच मत होतं. शिवाने त्यांच्या अंगणातल्या खुर्चीत त्यांचा रेडियो आणून दिला आणि तो जेवायला गेला. "अजुनी रुसून आहेऽऽऽ खुलता कळी खुलेना... " गाणं ऐकता ऐकता काका थोडेसे सैलावले आणि झपझप पडदे पडल्यासारखे खूप वर्ष मागे गेले...

अंगणात इवलीशी आसावरी कळ्या खुडत होती, तिच्या लालचुटुक रिबिनीला एक हात लावून दुसऱ्या हाताने एकेक कळी खुडून परडीत टाकत होती. शाळेतून नुकतेच आलेले भाऊकाका तिला म्हणाले,


"आसू चल बाळा घरात, संध्याकाळी कळ्या खुडू नये..."


तोंड फुगवून आसावरीने परडी देवखोलीत नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी पहाटे परडी फुलून घमघमली होती. साखरझोपेतल्या आसावरी सारखीच गोड गोड दिसत होती.

 

पुन्हा पडदा बदलला, आसावरी डेस्कवर अभ्यास करत बसली होती, एका हातानं रिबिनीशी चाळा करत दातात जीभ धरून गुंगून जाऊन काहीतरी वाचत होती. भाऊकाकांनी मागून येऊन टाळी वाजवली आणि ती इतकी दचकली की रडू लागली. काका हसले आणि ती त्यांना येऊन बिलगली. हरणाहून गरीब दिसत होती, तिच्या डोळ्यात तिच्या आईची मूर्ती नि माया दोन्ही एकदम दाटून आली. काकांना क्षणात अपराधी वाटलं.


आणखी एक चित्र, अडनिड्या वयाची आसावरी उशिरा घरी आली म्हणून काका अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते. हातपाय धुवून आलेल्या आपल्या मुलीला खुर्चीत बसवून ते फक्त फिरत राहिले. तासभर त्यांची घालमेल पाहून "भाऊ उद्यापासून नाही व्हायचा उशीर, शप्पथ." रडवेली आसावरी बोलून गेली. काकांनी तिला जाऊन झोपायला सांगितलं आणि आईविना पोरीला वाढवायची जाणीव त्यांना रात्रभर बोचत राहिली.


दुपारच्या तासाभरात आसावरीची वेगवेगळी रूपं भाऊकाकांना पुन्हापुन्हा आठवत राहिली. कळ्या खुडणारी, नैवेद्याची खडीसाखर त्यांच्या हातावर ठेवणारी, गुलाबी रिबिनींचा हट्ट धरणारी, चाफ्याचं झाड लावणारी, त्यांचे पाय चेपून देणारी आणि त्यांच्याशी भांडून शेजारच्या माधवाचा हात धरून पळून गेलेली आसावरी...


चारचा ठोका पडला आणि फाटक उघडून दिवाकर आला, भाऊकाका रोजच्यापेक्षा थकलेले दिसत होते. आतल्या खोलीत येऊन त्यानं ड्रेसिंगचं सामान काढलं. भाऊकाकांची अजूनही चाफ्याच्या कळीवर तंद्री लागली होती. तेवढ्यात कोणीतरी चुटकन इवलीशी टाळी वाजवली. भाऊकाका दचकले,


"अगं तुला सांगून आणलं होतं ना, गप्प बस तिथे मांडी घालून" दिवाकरनं दटावलं.


"आबा, पण मी या आजोबांना खडीसाखर देत होते, बाप्पाची खडीसाखर सगळ्या मुंग्या खात होत्या, मी झटकून खाल्ली आणि आता यांना आणली पण यांचं लक्षच नैये" रिबिनीशी एका हाताने खेळता खेळता ती म्हणाली.


"सॉरी हं भाऊकाका, ही माझी छोकरी, आज आईला वेळ होणार होता ऑफिसमधून यायला म्हणून हिला आणावं लागलं..."


"दिवाकर हिचं नाव काय रे...?"


"आसावरी..."


भाऊकाकांच्या आठ्या पुसल्या गेल्या, गालात हसले,


"आसू बाळा हवी तेवढी फुलं खुडून घे...आणि दिवाकर एक विनंती आहे, हिला रोज बरोबर घेऊन ये."


मलमपट्टी झाली, आसावरीनं कळ्या खुडून देवात ठेवल्या, दिवाकर आणि ती निघून गेले. भाऊकाका खुर्चीतून उठले,  माजघरातल्या कोपऱ्यात आसावरीची कित्येक पत्र पडून होती, त्यांनी ती शिवाला रद्दीत द्यायला दिली. आसावरीच्या आईचा एकच फोटो टेबलवर काढून ठेवला आणि कोनाड्यातल्या पत्र्याच्या डब्यात एक भोवरा, चार बांगड्या आणि दोन गुलाबी रिबिनी होत्या त्या छोट्या आसावरीसाठी काढून ठेवल्या.


"मुली फार झर्रकन मोठ्या होतात ना... छे... बापाच्या डोळ्यात अजून कळ्याच असतात, खुलल्या तरी जीव अडकतो त्यांच्यात... आज मी सोडवला, आसू तुझ्यावरचा राग आणि तुझ्यात अडकलेला जीवही... "

भाऊकाकांनी रेडियो लावला,


"उड जायेगा... हंस अकेला... हंस अकेला... जग दर्शन का मेला..."


किती काळ हरवलेलं, विसरलेलं काहीतरी आज त्यांना पुन्हा गवसलं होतं. त्यांनाही तसंच निरागस, निर्मळ, निर्मोह करणारं आसावरीचं बालपण.

प्राजक्ता अजित  

न्यूजर्सी युएसए मध्ये वास्तव्य. वाचनाची आवड. कॉलेजमध्ये असताना कविता लेखन,स्टुडंट मॅगझिनच्या मराठी विभागाचे संपादन. लग्नापूर्वी शिक्षणात आणि सध्या चार वर्षाच्या मुलामध्ये रमल्यामुळे वेळ मिळेल तसे  छंद म्हणून वैयक्तिक ब्लॉग स्वरूपात हलकेफुलके ललित व कविता लेखन. बालआरोग्य तज्ज्ञ.