दि गु मा मा 

लेखक: मिलिंद केळकर

कथाचित्र: शैलेश देशपांडे 

संध्याकाळची वेळ होती. आभाळ कसं भरून आलेलं होतं, दिवसभर पावसाची रिपरिप होऊन देखील तो कमी होण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे संध्याकाळचे सात वाजले असताना बाहेर बराच गडद अंधार भासत होता. फोन वाजला. पलीकडच्याने माझे नाव विचारले आणि मी हो म्हणताच घाईत म्हणाला,

 

“मी दिगुमामा बोलतोय. बेळगावचा दिगुमामा.”

“हो मामा, मला आहे ध्यानात. पण तुमच्याकडे फोन नव्हता ना? आता कुठून बोलताय? कसे आहात?”

“मी पुण्याला आलो आहे. सकाळपासून इथेच आहे. काही काम होते अरे. आता रात्री अकराच्या बसने परत बेळगावी जाणार आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला भेटून जायचे होते. येऊ का थोडा वेळ?”

मी बाहेरच्या पावसाकडे आणि अंधाराकडे पाहिले. या पावसात येणार?

“मामा तुम्ही पुण्यात कुठे आहात? पावसात कसे याल? मीच येईन तुम्हाला भेटायला. तुमचा पत्ता सांगा मला.”

दिगुमामाचा आवाज उगाच रडवेला वाटला. “अरे मी कुठे उतरतोय? मला पुण्यात कुणी पाहुणा राहिलाच नाही. एक होता, त्यालाच दिवसभर शोधत होतो. पण नाही भेटला. कंटाळलोय. त्यात तुझ्या पुण्यातले रिक्षावाले. तुझ्या भागात कुणी यायला तयार नाही. शेवटी एकटा तयार झाला आणि कर्वे नगरला सोडतो म्हणून कुठे दुसरीकडेच सोडलेनि. पण ते सोड तू. तुझ्या घरचा आल्याचा चहा प्यायचा आहे रे. सुधाताई करायची तसा जमतो का तुम्हा कुणाला?”

मामाने आईचे नाव घेतल्यावर माझे बोलणेच खुंटले. मी त्याला या म्हणालो. रिक्षाने त्याला चक्क रास्ता पेठेत सोडले होते. आता दुसरी रिक्षा मिळवून तो इथे येणार म्हणजे आठ तरी वाजणार. अकराला स्वारगेटला बस म्हणजे साडेदहाला निघावे लागणार. म्हणजे इनमिन दोन तासासाठी येतोय तो. मी गणितच करायला लागलो. माझ्याहून पंधरा वर्षांनी मोठा दिगुमामा. म्हणजे आत्ता सत्तरीला पोचलाय. या वयात हे असे फिरणे! येऊ दे. मी हिला गरम भात आणि कुळथाचे पिठले करायला सांगितले. सोबत पापड आणि आंब्याचे लोणचे मिळाले की मामाला आवडेल. तिने मग गोड काही हवे म्हणून गुळाच्या सांज्यासाठी रवाही भाजायला घेतला.

 

शाळेतून परत येताना अनेकदा आम्हाला दिगुमामा दिसायचा. गल्लीच्या कोपऱ्यावर महापालिकेने ठेवलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर मांडी घालून बसलेला असायचा. आम्हाला पाहताच कुणाही मुलाला हाक मारायचा. आम्ही धावत जायचो त्याच्याजवळ. उठून उभा राहून पायजम्याच्या खिशातून लिम्लेटच्या गोळ्या काढून आमच्या हातावर ठेवायचा. गोळ्यांपेक्षा मुले अधिक असतील तर दातांनी तोडून तुकडे द्यायचा. आम्हाला त्याचे काहीच वाटायचे नाही. त्या चघळत आम्ही त्याच्याशी बोलायचो. शाळेत काय काय झालं याबद्दल त्याला नेहमी कुतूहल वाटायचं. आम्ही मुलं सांगायचो ते सगळं खूप उत्साहाने ऐकायचा. कधी कुणाला कौतुकाने टपली मारायचा, तर कधी पाठीवर थाप मारत आपले किडलेले दात दाखवत तोंडभरून हसायचा. कधी टाळ्या वाजवायचा. तो कोपऱ्यावर दिसला नाही की आम्हा मुलांना चुकल्यागत वाटायचे.

कधी कुणी पालकाने त्याच्या गोळ्यांबद्दल त्याच्याकडे तक्रार केली, त्यानंतर काही दिवस दिगुमामा आम्हाला अर्काच्या गोळ्या देऊ लागला. त्या तोंडात चघळून तोंड उघडून आम्ही जोराने श्वास आत घ्यायचो, तेव्हा घशात गार गार वाटायचं. पुढे मात्र परत तो लिमलेटवरच आला.

आमच्यापैकी कुणाचाही तो खरे तर मामा नव्हता. पण आम्ही सगळे त्याला दिगुमामाच म्हणायचो. तो वयाने आमच्याहून पंधरा वर्षाने मोठा असेल, पण मोठी माणसंदेखील त्याला दिगुमामाच म्हणायची. त्याची खरी भाचरं मात्र आम्ही कधी पाहिली नाहीत, कारण त्याला बहिण नव्हती. एक मोठा भाऊ आहे, असं आईकडून कळलं होतं, पण त्याकाळात तो कधी दिसला नाही. दूर कुठेतरी मिल्ट्रीमध्ये मोठ्ठा हापिसर आहे असं आक्का, दिगुची आई आम्हाला सांगायची.

आक्का विधवा होती. तिचा एक जुना वाडा होता आणि त्यातल्या सर्व खोल्या छोट्या कुटुंबाना भाड्याने दिल्या होत्या. ते तुटपुंजं भाडं जगायला पुरायचं नाही म्हणून दिगुमामाची पत्नी घरगुती खानावळ चालवायची. फार नाही, पाच सहा नेहमीची ताटे जेवायची तिच्या हातचं. मग ती शिवणकाम करायची, विणकाम करायची. गल्लीतल्या बायकांनी मिळून तिला शिलाई मशीन घेऊन दिले होते.

दिगुमामा मात्र काहीही करायचा नाही. तरुण होता, धडधाकट होता. शिक्षण अगदी बेताचं झालं होतं. पण शाळेत असताना खूप शहाणा होता, असे बाबा सांगायचे. गणितात नेहमी पहिला. त्याच्या वर्गात असलेल्या एका श्रीमंताने पुढे त्याला आपल्या दुकानात हिशेबनीस म्हणून बोलावलं होतं. पण आक्का त्याचे थोडे जास्तच लाड करायची. त्याला काही शिंक खोकला आला की धावून औषध घेऊन यायची. त्याला बळेच झोपायला लावायची. दिगुमामाला हेच नेमकं हवं असायचं. मग असं काम चुकवत राहिला आणि नंतर जाणं बंदच करून टाकलंनी. हे सगळं मला आई बाबांनी आक्का गेल्यानंतर म्हणजे अगदी हल्लीच सांगितलं.

“अरे, तुझा भाऊ एवढा इंजिनिअर झाला, सरकारी नोकरीत लागला, तुला काय शिकायला धड झाली दिगू? अजून ये माझ्याकडे. मी शिकवतो,” असे माझे बाबा त्याला एकदा म्हणाले होते, तेव्हा तो फक्त ओशाळ हसून पायाच्या अंगठ्याकडे बघत बसला होता. आई बाबांनी खूप धडपड करून त्याच्या मुलांना गरीब मुलांसाठीच्या शिष्यवृत्ती मिळवून देऊन शाळेत घातले होते. ती मात्र पुढे बरी शिकली, पदवी वगैरे मिळवून दोघेही – एक मुलगा आणि एक मुलगी – ब्यांकेत लागली.

गल्लीच्या कोपऱ्यावर दिगुमामाच्या शेजारी जमिनीवर सिगारेटची थोटकं पडलेली असायची. कधी तंबाखू खाऊन थुंकलेली धार दिसायची. पण आम्ही मुलं समोर असली की तो त्याची ही व्यसनं आमच्यापासून लपवायचा प्रयत्न करायचा. अर्थात आम्ही सगळ्यांनी त्याच्या नकळत त्याला सिगारेट पिताना पाहिलं होतंच. “दिगुमामा असा करून धूर काढतो,” असं मी कुणा पाहुण्यांना सांगून, हाताची मूठ करून, तर्जनी आणि मधल्या बोटात खडू धरून, अंगठ्याकडून तोंडाने हवा ओढल्याचा आणि मग हात बाजूला करून धूर सोडल्याचा आविर्भाव करून दाखवला होता. नंतर आईनं मला बेदम धुतलं आणि “परत असं कधी नाही करायचं” असं बजावलं होतं.

आई बाबांना दिगुमामाची इतकी कणव का वाटायची, माहित नाही. प्रत्येक सणासुदीला दोन नैवेद्यांबरोबर पत्रावळ किंवा केळीच्या पानावर एक तिसरे जेवण वाढले जायचे. पैकी गाईचा नैवेद्य आणि तिसरे जेवण दिगुमामा उचलून न्यायचा. पुढच्या गल्लीत एक गोठा होता, तिथे तो गाईचा नैवेद्य पोचवायचा. मी ही कधी कधी त्याच्याबरोबर गोठ्यात जायचो. गाईंच्या मूत-शेणाच्या वासाने कसं छान वाटायचं. गाईचे डोळे तेव्हापासूनच आवडायला लागले, ते आजही.

“तिसरा नैवेद्य या बैलाला!” असं आई एकदा दिगुमामाकडे हात करून दाखवत म्हणाली. तो नुसताच किडके दात दाखवत हसला आणि पत्रावळ गोल गुंडाळून घेऊन गेला. दिवाळीच्या वेळी आमच्या बरोबर बाबा दिगुमामासाठीही शर्ट पायजम्याचं कापड घेऊन द्यायचे. आम्हाला नवल वाटायचे त्यावेळी. तशी काय आमची स्थितीही श्रीमंतीची नव्हतीच. दोन प्राथमिक शिक्षकांच्या पगारावर तीन मुलांना मोठं करायचं आणि स्वतःच्या स्वप्नातलं घरही बांधायचं होतं त्यांना. पण आई बाबा असेच होते आणि ते असे खिश्याबाहेर जाऊन अनेकांना मदत करायचे हे खूप नंतर लक्षात आलं.

आम्ही घर बदलले, गल्लीपासून दूर स्वतःच्या घरी राहायला गेलो आणि दिगुमामाचे रोज दर्शन घडेनासे झाले. मग माझ्या बहिणींच्या लग्नात त्याला आणि आक्काला पाहिले. आक्काने माझ्या कपाळावरून हात फिरवून “किती मोठा झालास रे. कधी येत नाहीस आता मुगाचे लाडू खायला,” असे म्हटले, तेव्हा मला उगाचच ओशाळल्यासारखे झाले. लहानपणी गल्लीत खेळताना कधी पाणी प्यायला आक्काच्या खोलीत जायचो, तेव्हा ती न चुकता स्टीलच्या त्याच त्या डब्यातून मुठीएवढा छोटा मुगाचा किंवा कणकेचा लाडू काढून द्यायची. पण मी एकटा गेलो तरच! इतर कुणा मुलांना तिने लाडू दिलेले मी कधी पाहिले नाही. त्या लाडूंची खास चव आणि गुळाबरोबर मुगा - कणकेचा तो आंबूस गोड वास मी खरेच विसरून गेलो होतो. मी आक्काला मिठी मारली आणि वाकून नमस्कार केला. “आक्का, मी आता इंजिनिअर व्हायला जातोय. चार वर्षं शिकायचं आहे. तुझे मुगाचे लाडू तिथे नाही मिळणार मला.”

“मला माहितेय रे. दिगूने सांगितलंय. म्हणून हे बघ तुझ्यासाठी मुगाचे लाडू आणलेत,” असं म्हणून आक्काने चक्क कनवटीला बांधलेली एक कागदाची पुरचुंडी काढून दिली. मी पुडी उघडून बघितली तर त्यात मुगाचे पाच लाडू! तिथून थेट पळालो आणि वधूपक्षाच्या खोलीत आईच्या सुटकेसमध्ये पुडी ठेवून दिली.

गरिबीत कष्टात दिवस काढत, जुन्या वाड्याच्या अंधाऱ्या दोन खोल्यात राहून, एका निकामी मुलाचे पालन आणि त्याच्या भविष्याची काळजी करीत, कर्तृत्ववान मोठा मुलगा आपल्याला विचारतदेखील नाही याची खंत मनात दाबून ठेवत ही बाई चक्क शहाण्णव वर्षे जगली. शेवटच्या काही वर्षात एकच फरक पडला, तो म्हणजे गावाकडे तिचं छोटंसं शेत होतं, तिकडे शुद्ध प्रकाशमान वातावरणात काही काळ जगली.

पुढच्या चार वर्षात आईकडून दिगुमामाच्या बातम्या मिळत राहिल्या कधी कधी. त्याची पत्नी मुलांसकट त्याला सोडून दुसऱ्या कुठल्या गावी निघून गेली. जाण्यापूर्वी आईला भेटून, खूप रडून गेली. म्हणाली, दिगुमामा दारूही पिवू लागला होता. काम काहीच नाही करायचा, पण पत्नी दारूला पैसे देत नाही म्हणून आक्काकडून पैसे मागून घ्यायचा. आक्का आपल्या छोट्या नातवांना कधी उपाशी ठेवायची, पण या रेड्याला मात्र रोज पोटभरून जेवू घालायची. दिगुमामा रोज प्यायचा नाही, पण व्यसन होतेच. कधी पैसे मिळाले नाहीत तर मित्रांकडून कर्ज घ्यायचा. मग आक्का काहीतरी घरातलं विकून ते कर्ज चुकवायची. मुलांवर याचा खूप परिणाम होऊ लागला म्हणून दिगुमामाची बायको आक्काशी भांडून निघून गेली. तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या मुलांसकट पुनर्वसनाची सोय केली म्हणे. दिगू मामा त्यावर काही बोलला नाही. त्याने तिला विरोध केला नाही आणि तिची मनधरणीही केली नाही. त्याला जणू त्याचं काही सोयरसुतकच नव्हतं. आपण कसे राहतो, आपल्यामुळे आपल्याच लोकांना कसा त्रास होतो, हे त्याला कळायचे नाही की त्याला त्याचे सोयरसुतक नव्हतेच, देव जाणे. पण त्या दिवसापासून त्याने दारू प्यायची मात्र पूर्ण सोडून दिली.

माझ्या लग्नाचे आक्काला आमंत्रण देण्यासाठी मी आईबरोबर गेलो होतो. आता ते दुसऱ्याच कुठल्या भाड्याच्या खोलीत रहात होते. आईने सांगितले की मोठा मुलगा सुमंत नोकरीतून निवृत्तीनंतर कुठे दक्षिणेत राहतो, तो वाडा पाडून त्याजागी मोठी इमारत बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आला होता. आक्का आणि दिगुमामाला राहायला एक फ्लॅट देतो म्हणाला आणि खात्यात काही लाख रुपये टाकतो असेही सांगितलेन. त्या आश्वासनावर आक्काने त्याला सह्या दिल्या. त्या वाड्याचे काम सुरु झाले होते, म्हणून आक्का आणि दिगुमामा या तात्पुरत्या घरी रहात होते.

लग्नानंतर आम्ही दोघे बेळगावहून दूर जाऊन माझ्या नोकरीच्या ठिकाणी राहू लागलो. पुढे खूप काळ आक्का आणि दिगुमामा यांचा संपर्क राहिला नाही. आम्ही बेळगावी यायचोच थोड्या दिवसांसाठी. त्यात ते दोघे शहरापासून पंधरा किलोमीटरवरील त्यांच्या शेताच्या गावी जाऊन राहतात असे आईकडून कळले. तिकडे तर जाणे कधी झालेच नाही. पण आईकडून त्या दोघांच्या बातम्या मिळत राहिल्या. सुमंतने वाड्याच्या प्रकरणात आईला फसवले. घर नाही दिले की मोठी वाटणीची रक्कम नाही दिली. अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता दिल्या त्याने आई आणि भावाला. कुणी आक्काला सुचवले की तिने कोर्टात जावे. नुसती धमकी दिली तरी सुमंत सरळ होईल. पण आक्का आणि दिगुमामा तयार झाले नाहीत. “जाऊ दे, आता गावी जाऊन शेती करतो आम्ही. तिथेच राहतो, दोन खोल्या आहेत,” असे आक्काने ठरवले. दिगुमामाला तर काहीच फरक पडत नव्हता. तोही गेला. त्यापूर्वी बाबांनी आणि काही इतर हितचिंतकांनी सुमंतशी बोलायचा प्रयत्न केला. पण निवृत्तीनंतरदेखील तो मिल्ट्रीच्या खाक्यातच होता म्हणे. त्याने कुणाचेच ऐकले नाही. आई बाबांनी या दोघांना सूचना केली की जमिनीबद्दल सुमंत काही बोलायला आला तर कुठल्याही कागदावर सह्या करायच्या नाहीत.

त्यानंतर बेळगावी दोनेकदा दिगुमामा भेटला. आक्का गेल्यावर आम्ही त्याला भेटायला गेलो. ती शेवटच्या आजारात असताना दिगुला काहीच झेपणारे नव्हते म्हणून गाववाल्यांनी सुमंतला फोन लावला होता. पण सुमंतने त्यांचे काहीच ऐकले नाही. तो शेवटपर्यंत आलाच नाही. कुठल्या तरी दूरच्या नात्यातल्या एका डॉक्टरने आक्काला आपल्या गावी त्याच्याच हॉस्पिटलात नेऊन ठेवले. तिची चांगली सेवा केली असे कळले. पोटचा पोर आईला आई मानत नाही, तिलाच लुबाडून देशोधडी लावतो आणि शेवटच्या दिवसात बाईला कुठल्या ठिकाणी जाऊन उपकार करून घ्यावे लागतात. कुठल्या कर्मांचा हा परिणाम असावा? हे विधिलिखित असते की काही अरभाट घटना? तो परमेश्वरच जाणे.

आक्का गेल्यावर गावच्या आणि नात्यातल्या हितचिंतकांनी पुन्हा एकदा सुमंतच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. बरेच वाद झाले. एक कोटीहून अधिक किमतीचा वाड्याचा व्यवहार झाला असताना भावाला आणि आईला फसवून सुमंतने त्यांचा हिस्सा दिला नाही, याबद्दल कोर्टात जाऊ, सगळीकडे प्रचार करू, बाकी काही नाही तर सुमंतला बदनाम नक्कीच करू, वगैरे धमक्या दिल्या गेल्या. भावाच्या उर्वरित आयुष्यासाठी काहीतरी करणे त्याचे कर्तव्य आहेच, याची जाणीव करण्याचा प्रयत्न झाला. शेवटी केवळ बदनामी नको म्हणून सुमंतने दहा लाख रुपये दिगूमामाच्या नावावर पाठवले.

भोळ्या दिगुमामाला फसवून कुणीही त्याचे हे पैसे लुटून नेईल, ही नवी काळजी होती. त्याचे जे कुणी जवळचे नातेवाईक होते, ते वयाने वृद्धच होते. त्यामुळे त्यांना बँक खात्यात नॉमिनी बनवणे शक्य नव्हते. कुणी तरी दिगुमामाच्या मुलांची चौकशी करून शोध काढला. मुलीने तिची परिस्थिती अगदीच खराब असूनसुद्धा दिगुमामाशी फोनवर बोलायलाही मनाई केली. मुलगा बापाशी बोलला खरा, पण तेही आक्का आणि बाबाने त्या दोन मुलांचे आणि त्यांच्या आईचे आयुष्य कसे पार उध्वस्त केले हेच सांगायला! त्या दुःखात खंगून जाऊन, मुलांना मोठं करण्यासाठी राबत आई कँसरने झिजून मेली, हे सांगायला. त्याने बालपणी त्याच्या मनावर कोरल्या गेलेल्या अनेक प्रसंगांची आठवण करून देऊन दिगुमामाला दुखवायचा प्रयत्न केला म्हणे. पण दिगुमामा रडला नाही. शेवटी, त्या शापित धनातली कवडीही आम्हाला नको, पुन्हा संपर्क करू नको, असे सांगून मुलाने फोन बंद केला.     

  

गावातल्या वरीष्ठांनी काहीतरी करून दिगुमामाचे पैसे सुरक्षित ठेवले आणि त्यातून त्याला महिन्याला काही पैसा मिळत राहील अशी सोय केली. तो त्यानंतर गावातल्याच कुणाच्या घरी जेवतो, शेतात कुणाला कामावर ठेवलंय, वगैरे सांगून आईने सुस्कारा सोडला.

परत मला दोनदा फोन करून, रिक्षावाल्याकडे फोन देऊन त्याला पत्ता समजावयाला लावलान दिगूमामाने. आणि रात्री पावणे नऊला नखशिखांत भिजलेली पाच फुट सहा इंचाची एक हडकुळी वृद्ध व्यक्ती माझ्या दारात उभी ठाकली. पूर्ण तोंडभर सुरकुत्या, डोक्यावर तुरळक पांढरे केस. पण डोळे तसेच तरुण, प्रेमळ आणि मंद हसणारे. शिवाय पाठ एकदम ताठ!

“हे काय मामा! छत्री नाही का तुमच्याकडे? किती भिजलाय ते. आणि या वयात कसले हे पावसात भिजायचे खेळ करताय तुम्ही!” असे मोठ्या आवाजात म्हणत मी मामांना आतून कोरडा टॉवेल आणून दिला.

“अरे, माझे कान शाबूत आहेत. जोराने नको ओरडू. आणि डोळ्यावर चष्मासुद्धा नाही बघ. वाचायला वापरावा लागतो, पण सकाळी तरुण भारत पूर्ण वाचून झाल्यावर तोही दिवसभर कशाला लागतो?” डोके, हात, पाय, चेहरा खरखर पुसत दिगुमामा मोठ्याने हसला. पूर्वीपासून किडलेले अर्धे तरी दात अजूनही तोंडात असल्याचे मी पाहिले.

“मामा, तुमचे कपडे सुद्धा भिजलेत पूर्ण. बॅगेत आहे का कोरडी जोडी? चला आत, बदलून घ्या.”

“नाही रे. दिवसभर असाच फिरतोय एक पत्ता शोधत. कपडे दोनदा भिजले, तेव्हा कोरडे होते ते बदलले बघ. आता अंगावर आणि बॅगेत ओलेच कपडे आहेत बघ.” परत मामा मोठ्याने हसला.

मी बळजबरी त्याला आतल्या खोलीत नेऊन माझी एक कोरडी कुर्ता पायजम्याची जोडी मामाला दिली. ते तो बदलत असताना जाऊन त्याचे ओले कपडे पिळून तारेवर टाकले. आम्ही बाहेर आलो तोवर हिने गरम चहाचा कप मामांच्या हातात ठेवला.

मामांनी घोट घेतला आणि म्हणाला, “अगदी सुधासारखा चहा केलास बघ. भरपूर आले आणि साखर घालून. खरे तर तिच्या चहाहून चांगला, असे मी म्हटले तर ती आता वरून येऊन टपली मारणार नाहीच्चे!”

मामाकडून त्याच्या पुण्याच्या वारीचे कारण विचारले. तो म्हणाला, त्याच्या ओळखीचा आणि नात्यातला एक कर्नल गोखले आहे पुण्यात. त्याच्याकडे गावातल्या एका तरुण मुलासाठी नोकरी मागावी म्हणून मामा पुण्यात आला होता. “त्या मुलाच्या आईच्या हातचे जेवतो रे मी रोज दुपारी. ती म्हणाली मुलाला शहरात नोकरी लावून द्याल का मामा? तर त्या माउलीला नाही कसे म्हणणार? म्हणून म्हटले कर्नल गोखलेला गाठावे. तो आक्काला चांगला ओळखायचा. देईल नोकरी तर बोलावून घेईन त्या मुलाला!”

“मग काय झाले? मिळतीय का नोकरी?”

“अरे कुठले काय? त्या कर्नलचे घरच मिळाले नाही. दिवसभर शोधले तरी.”

“काय पत्ता आहे? सकाळीच नाही का मला फोन करायचा? मी दिला असता शोधून आणि तिथे घेऊनही गेलो असतो.”

“अरे, मला माहित होता पत्ता. एकदा दोनदा मी आक्काबरोबर आलो होतो त्याच्याकडे, सुमंतबद्दल चौकशी करायला!”

“म्हणजे चार वर्षापूर्वी. हो ना?”

“अरे, आठ वर्षे झाली असतील. निवृत्त होऊन इथे पुण्यातच राहतो बघ तो. मला पक्का पत्ता माहित होता. शनवार पेठेत त्या पाराखालच्या छोटूकल्या मारुती मंदिराच्या मागे होता त्याचा वाडा.”

“शनवार पेठेत दहा तरी मारुती मंदिरे आहेत. पण आता कुठला पार उरला नाही. दाखवा पूर्ण पत्ता.”

“अरे लिहिलेला कुठे माझ्याकडे? जे काय आहे ते या डोक्यातच.”

मी थक्कच झालो. हा माणूस कुठल्या ग्रहावरून आलाय? कुठल्या काळात राहतोय? त्याने आधी फोन शोधून त्या निवृत्त कर्नलची चौकशी केली नाही. त्याला त्याचा पत्ता नीट माहित नाही. शनवार पेठेत पाराखाली असलेल्या मारुती मंदिराच्या मागचा वाडा हा त्याचा आठ वर्षापूर्वीचा संदर्भ. तो गोखलेच का, शनवार पेठच ना, मारुतीचेच मंदिर की आणखी कुठल्या देवाचे? हे काहीही नक्की नसताना हा सत्तरीचा गृहस्थ आठ नऊ तास साध्या बसने प्रवास करून अनोळखी पुण्यात येतो. एकटा दिवसभर छत्रीशिवाय पावसात भिजत तो काल्पनिक पत्ता शोधतो. कशासाठी? तर एक पुसट ओळख असलेला निवृत्त गृहस्थ गावातल्या एका तरुणाला नोकरी देईल या आशेने!

 

मला वाटले, याहून थोडे कमीच कष्ट दिगुमामाने त्याच्या तरुणपणी आपल्या कुटुंबासाठी नियमित केले असते तर त्यांच्या सर्वांच्या आयुष्याची एवढी वाताहत झाली नसती. या माणसाला कुणीच कसे हे समजावले नाही? याला स्वतःला हे कसे उमजले नाही? का असे जगला हा माणूस? कुणीही काहीही न करता, भावना न जपता, सत्तर वर्षे हा कसा जगत राहतो? कदाचित आक्काच्या पावलावर पाउल ठेऊन शंभरीसुद्धा गाठेल. कुणी सांगावे? माझ्या मनात असे अनेक प्रश्न उचंबळून आले अगदी. पण मामाकडे वेळ कमीच होता. जेवून त्याला अकराची बस पकडायची होती. आम्ही जेवायलाच बसलो.

हिने मामाचे आवडते अन्नच दिल्यामुळे मामा भलताच खुश झाला. भात पिठल्यावर भुरके घेत ताव मारला त्याने. भाजलेले पापड पुन्हा मागून खाल्ले. लोणच्याच्या फोडी चोखत मिटक्या मारल्यान. सांजा चवीने खाल्ला. “आक्का आजारी पडण्यापूर्वी तिने केलेले भात पिठले खाल्ले, त्यानंतर असे चविष्ट जेवण कधी जेवलो नव्हतो ग सुनबाई!” म्हणाला. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात मला पाणी दिसले. पहिल्यांदाच आवाजात थोडा गहिवर भासला.

त्याचे ओले कपडे आणि एक कोरडा टॉवेल एका पिशवीत घालून मामाला दिला. त्यातच हिने आंब्याच्या वडीचे आणि चिवड्याचे असे दोन पुठ्ठ्याचे डबेही घातले. अंगावर ओढायला एक नवी शाल दिली. अंगावरचे कोरडे कपडे तसेच असू देत, घेऊन जा असे त्याला निक्षून सांगून त्याचा विरोध दाबून टाकला.

“सुधाताई असती तर तिनेही असेच केले असते बघ. तू दिसाय वागायला तिच्यासारखाच आहेस,” दिगुमामा म्हणाला.

 

“ताई आणि गोविंदराव गेल्याचे वाचले होते मी पेपरात. तेव्हापासूनच तुला भेटावेसे वाटत होते बघ. आज योग आला.”

 

दारातून बाहेर पडण्यापूर्वी दिगुमामा म्हणाला. आम्ही दोघे त्याच्यासमोर वाकलो तेव्हा आम्हाला थांबवून मला आणि पत्नीला उद्देशून म्हणाला,

“माझ्यासारखा करंटा तुम्हाला काय आशीर्वाद देणार रे पोरानो. पण तरी सुखी रहा, असे म्हणतो झालं.”

मी त्याला बळजबरीने आमच्या गाडीतून स्वारगेटला सोडायला निघालो. गाडीतून निघताच तो मला म्हणाला,

 

“बोल, तुला मला काय विचारायचे होते? जेवणापूर्वी तू विचारताना थांबलास ना?”

मी क्षणभर मामाकडे वळलो. परत समोर बघत म्हटले, “मामा, असे का? असे का जगलात तुम्ही? तुम्हाला कधीच याचा काही त्रास नाही झाला? तुमच्यामुळे तुमच्या लोकांची आयुष्ये उध्वस्त झाली त्याची पर्वा..”

“कुणाची आयुष्ये बदलण्यास आपण समर्थ कुठे असतो रे? आपल्या हातात काही नसते. आमचे अण्णा प्रत्येकाला सांगत असत, ‘ठेविले अनंते तैसेची राहावे.’ आपल्या हातात काही नसतेच. आपल्या नशिबात जे काही असेल, ते घडत राहते. आपल्या कृतीमुळे कुणाचे काही बरे झाले, तर आपल्याला गर्व आणि आनंद होतो. तर कुणाचे जीवन बिघडले तर आपण अपराधी भाव घेतो. पण खरेच, आपल्या त्या कृत्यास काही पर्याय असतो का तेव्हा? एवढे घरंदाज श्रीमंत आमचे अण्णा, त्यांचा अकाली आजाराने मृत्यू ओढवला. तेव्हा त्यांना कुणी वाचवू शकले नाही. त्यांची संपत्ती काही उपयोगास आली नाही आणि त्यांनी कृतकृत्य केलेले इतके लोक होते, त्यापैकी कुणी काही करू शकले नाही. अगदी ठरवून ठेवल्यागत ते मेले. मी त्यावेळी फक्त बारा वर्षाचा होतो. सुमंतदादा तेव्हा मिल्ट्रीच्या प्रशिक्षणास दूर गेला होता, तो अंत्यसंस्कारास आलादेखील नाही. आक्का रडली तीसुद्धा तिचा आधार संपला म्हणून, स्वार्थाने! नंतर सगळे नात्यागोत्यातले लोक अण्णांच्या संपत्तीचे लचके तोडायलाच आले. गिधाडांसारखे. मला त्यावेळी भान आले. आपण काहीही, कसलेही प्रयत्न करायचेच नाहीत असे ठरवले. जे होतंय ते होऊ द्यायचे. तठस्थ राहायचे. आपल्या आयुष्याला मार्ग देत बसायचे नाही. जो मार्ग दिसतो, त्यावर चालत राहायचे.”

स्वारगेटला पोचलो आम्ही. वीस मिनिटे आधीच. मागची बॅग उचलत दिगुमामा म्हणाला, “माझे नाव अण्णांनी दिगंबर ठेवले. मला ते हसून म्हणायचे, “तू नागडा आलास या जगात आणि नागडाच परत जाणार येथून. इथले काहीही घेऊन जाऊ शकत नाही कुणी.” मी त्याहीपुढे जायचे ठरवले. मी जन्मभर दिगंबर राहिलो! कसलेही सुख दुःख नाही, कशाचेही सोयरसुतक नाही. असाच मरणारही एक दिवस. तो माझा दादा, इतका धनवान आहे. त्याला आपण किती यशस्वी आहोत असे वाटते. त्याची बायको किती मोठी, प्रसिद्ध डॉक्टर होती. काय झाले तिचे? फुकटात मेली. माहित आहे? पाय मुरगळण्याचे निमित्त झाले, तिथे म्हणे रक्ताची गाठ धरलिनी, ती रक्तप्रवाहाबरोबर मेंदूत पोचली म्हणे. तीन दिवसात, काही समजायच्या आधी खेळ खल्लास! असाच दादाही एक दिवस मरणार. त्याची संपत्ती त्याचे दुखणे आठ दिवस वाढवू शकेल फक्त. पण त्यानंतर? सगळे पेशंट मरतात आणि सगळे डॉक्टरही मरतात एक दिवस. कशाला जन्मभर रोज मरत जगायचे?”

दिगुमामा गाडीतून उतरला. मी आजवर त्याचे असे दीर्घ बोलणे कधी ऐकलेच नव्हते. मी नुसता आ वासून ऐकत राहिलो होतो. जाण्यापूर्वी म्हणाला, “हे आयुष्य त्या आजच्या जेवणासारखे आहे रे. वाफाळलेला ताजा गरम भात, त्यावर लसणाची फोडणी असलेले तिखट पिठले. समोर आहे, तर ओरपायचे. सोबत तोंडाला पाणी आणणारा आंबटगोड लोणच्याचा खार आणि कुरकुरीत खरपूस पापड. तोंड गोड करणारा सांजा. मिळतोय तोवर खाऊन घ्यायचा. पुढचे जेवण कुणाला ठाऊक, कुठे वाढले आहे आणि कसे असणार आहे? मिळणार आहे तरी का?”

दिगुमामाच्या तरंगत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना दृश्य धूसर झाल्यागत दिसले. मनात आले, याने गुरूमंत्राचा अर्थ आपल्या परीने लावला. तेही कदाचित विधिलिखित. पण त्यावेळी कुणी त्याला सांगितले असते, की बाबा, ‘भूतकाळात घडलेले विधिलिखित असते आणि भविष्यासाठी मात्र कृतीस्वातंत्र्य आहे,’ तर याचे जीवन काहीतरी वेगळेच झाले असते. पण तो पर्याय तरी कुठे होता दिगम्बराकडे?

 

मिलिंद केळकर

वडील श्री गोविंद केळकर हे एक चांगले लेखक आणि कवी होते आणि त्यांच्याकडून वाचनाची आवड आणि लेखनाचे बाळकडू मिळाले. वयाच्या बाराव्या वर्षी ‘मुलांचे मासिक’ या मासिकात पहिली कथा प्रसिद्ध झाली. पुढे काही काळ हंस, नवल, मोहिनी आणि किर्लोस्कर या मासिकांमधून कथा आणि प्रवासवर्णने प्रसिद्ध झाली. बेळगावच्या इंग्रजी दैनिकासाठी बरीच इंग्रजी पुस्तक परीक्षणे लिहिली. श्री श्री रविशंकर माझे अध्यात्मिक गुरु झाल्यानंतर त्यांच्या ज्ञानविचारांशी तारा जुळल्या. तेव्हापासून आजवर त्यांच्या इंग्रजी पुस्तकांचे मराठी भावानुवाद करीत आहे. आजवर अशी १८ पुस्तके प्रसिद्ध झाली असून सात प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. या पंचवीस पुस्तकांपैकी श्री श्रींच्या ‘अष्टावक्रगीता’, ‘पातंजली योग सूत्र’, ‘उपनिषदे’ यावरील विचारांच्या भावानुवादाने आत्यंतिक समाधान दिले. इतर स्वतंत्र स्फुट लिखाण केवळ आंतरजालावर करतो. बरेच विचार छायाचित्रांमधून मांडण्याचा प्रयत्नही असतो.