बा य नॉ क्यु ल र  

कविता दीक्षित 

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपलं लेकरू जेव्हा बघतां बघतां मोठ्ठ होतं आणि एक दिवस उच्चशिक्षणासाठी दूरदेशी जायला निघातं तेव्हा त्या लेकराच्या माउलीची अवस्था एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हासू अशी होते. लेकराच्या प्रेमापोटी मग ती आसू पुसते आणि लेकराला म्हणते....

आज सुरू झालं आपल्या आयुष्याचं...

एक नूतन पर्व !

 

तुझं, सर्वव्यापी स्वावलंबन बाणवण्याचं, 

माझं, तुझ्या खुशहालीवर अवलंबण्याचं.

 

तुझं, नवीन बदलांचं स्वागत करण्याचं,       

माझं, बदल आनंदानी स्वीकारण्याचं. 

 

तुझं, स्वत:ला सिद्ध करण्याचं,

माझं, सुखासन सिद्ध होण्याचं.

 

तुझं,  प्रगतीयुक्त भरभराट होण्याचं, 

माझं, भरभरून आशिर्वाद देण्याचं. 

 

तुझं, कधीच मागे वळून न बघण्याचं,

माझं, आयुष्याचा मागोवा घेण्याचं.

 

तुझं, भविष्याची स्वप्न रंगवण्याचं,

माझं, भूतकाळात रमून जाण्याचं.

 

तुझं, प्रगतीपथावर कूच करण्याचं,

माझं, निवृत्तीपथावर स्थिरावण्याचं.

 

तुझं, आभाळाला कवेत घेण्याचं,

माझं, आभाळाला हात टेकण्याचं.

 

तुझं, आकाशाला गवसणी घालण्याचं,

माझं, आकाश ठेंगणं होण्याचं.

 

तुझं, सर्वांगिण विकासाचं,

माझं, आत्मिक विलासाचं.

 

निर्धास्तपणे कर सुरूवात, ह्या आव्हानात्मक पर्वाची,

सोबत तुझ्या कायम असेल, शिदोरी माझ्या आशिर्वादाची.

कविता दीक्षित 

वाचनाची आवड म्हणून मामबोची सदस्य झाले. सदस्यांनी लेखनही केलं पाहिजे ह्याआग्रहामुळे प्रथमच लिहिण्याचं धाडस केलं आणि सर्वांकडून मिळालेल्या  प्रेमळ प्रोत्साहनामुळे थोडंफार लिहायला लागले. इंग्रजी भाषेचं प्रशिक्षण देण्याव्यतिरिक्त संगीत, चित्रकला आणि समाजकार्य हे आवडते छंद जोपासते.