धू न  तु झी  मा झी  

 

ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर 

एक संक्षिप्त पत्रव्यवहार, नाताळाच्या दरम्यान.

 

छोटा चार्ली: प्रिय सांताक्लाॅज, या नाताळाला मला एक भाऊ पाठव.

सांताक्लाॅज: प्रिय चार्ली, नाताळाच्या आधी मला तुझी आई पाठव!

 

विनोद आचरट होता तरी मला हसू आलं आणि एकदम शाळेतला किस्सा आठवला. लहानपणी शाळेत कवितेच्या पुस्तकात ओळी होत्या; “बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई”. वर्गातल्या एका चावट मुलाने मग “तुझ्या वडलांमुळे मी झाले आई” दुरुस्ती (?) केली!

 

आई कोणाहीमुळे होऊ दे, आई होणं आणि आई असणं यात मात्र खूप फरक आहे. आणि हा फरक प्रत्येक आईला (किंवा बाबाला) घडोघडी जाणवतो.  

 

माझी मुलगी साधारणत: ३ वर्षांची असताना ‘मी आज तिला वाचायला शिकवीन’ म्हणून अनेक महिने जिद्दीने प्रयत्न केला पण पत्रिकेतील ‘वाचनयोगाला’ अनुसरून तिला शिकायचं तेव्हांच ती शिकली. याचा अर्थ तिला वाचायला तेवढे महिने लागले असं नाही तर ती इच्छा होऊन, मग अक्षर व शब्द यांचं नातं समजून घ्यायची ओढ लागायलाच खूप वेळ गेला. त्या महिन्यांत मी ‘हसतखेळत शिक्षण’ (उप)भोगलं!  हसतखेळत शिक्षण म्हणजे मी तिला शिक्षण द्यायचे, ती दुर्लक्ष करत खेळायची आणि बघणारे हसायचे. तिसऱ्या वर्षीच ‘हे काम आपल्याला जमायचं नाही’ या निष्कर्षाप्रत आम्ही दोघीही आलो. तेव्हांपासून तिच्या अध्ययनाची वाट माझ्या अध्यापनाला न छेदता जाते. मागे वळून पाहिलं की वाटतं, मी कुठे चुकले?

 

जगाला मी शिकवते पण माझ्या मुलीला काहीही- अगदी 'चहाचा कप उचलून ठेव’ - इतकी साधी गोष्टदेखील शिकवण्यास कशी असमर्थ ठरते? आणि मग विचारांचे मोहोळ उठतात. कशीही का शिकेना, पुस्तकं वाचते ना आता, मग मी का तडफडते आहे?आम्ही दोघे चौथ्या वर्षी सहजी वाचू लागलो, मुलीने इतकं का बरं लढावं? आणि जर थोडं माझं, थोडं त्याचं आणि बाकी सगळं स्वत:चं घेऊन ही जन्माला आहे तर मी आमचे मोजदंड तिला का लावते आहे?

 

वाचायला (न) शिकवण्याने युद्धाला जे तोंड फुटले ते गेली १० वर्षे  चालूच आहे. लालन एका भाषेत होतं, ताडन दोन्ही भाषांत! सलामीला 'सोन्या राजा' झालं तरी मी तिसऱ्या मिनिटाला 'शहाण्याला शब्दांचा मार, चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा' हे ऐकवते. वर 'आमच्या वेळी हे अंमलात आणलं जायचं' हेही! एकदा माझ्या आईसमोर खडाजंगी झाली, तिनं नातीला थोडा दम दिला आणि मग मला चांगलं खडसावलं -our pecking order! मी तिला विचारलं "ती 'वाईट' वागली तर मी चिडू नये हे कबूल; पण ती असं वागू नये यासाठी मी काय करू?"

 

“ते नाही हं मला माहित!” असं म्हणून आईने तो विषय बदलला. मग मी एका अमेरिकन मैत्रिणीला माझी कथाव्यथा सांगायला फोन केला तर ती म्हणते, “मीच तुला फोन करणार होते, माझं दोन्ही मुलांशी खूप वाजलं, शेवटी थकून मलाच रडू आलं, काय करू?”

 

थोडा वेळ गेल्यावर पुन्हा माझं विचारमंथन. मी का चिडले? अभ्यास हे कारण फारच क्वचित असते. बरेचदा कारण फुटकळ किंवा वरवर साधे दिसणारे असते. भारतीय कला, पाश्चात्त्य खेळ यांचा सराव किंवा तयारी, खोली लावणं, इलेक्ट्रॉनिकी साधनांचा अतिवापर, अतिवाचन/अपुरं वाचन …  

 

अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं पासून सुरू झालेला हा प्रवास आता ‘आंतरजालाच्या विळख्यात बालक व पालक’  या वळणावर येऊन ठेपला आहे. सहप्रवासी मित्रमैत्रिणीची अपत्यांविषयी सारखीच तक्रार आहे, उठताबसता हुज्जत व उद्धटपणा, अरे ला कारे, हातातला फोन ठेवत नाहीत, काही सांगितलं तर ऐकत नाहीत. 

 

सुखाची कल्पना आपण आधी एका चौकटीत बसवतो, पण मध्येच तिला तडा जातो, मग चौकट बदलते किंवा कल्पनाच बदलावी लागते. तोच प्रकार मातृत्वाचा. आपल्या बालपणानुसार, तेंव्हाचे ठोकताळे वापरून आणि सद्य परिस्थितीतले उचलून आपण मुलांना एका साच्यात बसवतो. पण मूल त्रिकोणी आणि साचा चौकोनी ही तफावत जाणवली की चूक कळते पण भीतीदेखील वाटते. साचा चुकीचा की आपली पद्धत चुकीची? ही भीती का वाटते? पूर्वी धोका ठोस रूपात पुढे उभा असायचा - व्यसनं किंवा आर्थिक तोटा. आता धोका कुठला, शत्रू कोण हेच कळेनासं झालंय. शतकानुशतकं मुलं जन्माला येत आहेत पण ‘बालसंगोपन’ नामक चर्चेचा, अभ्यासाचा विषय कधी झाला? 

 

तो दिवस सरतो. मी थोडी नाराज होऊन रात्री दुसऱ्या दिवसाची 'खेळी' (की डावपेच??) मनात आखते आणि झोपते.   


नवा दिवस उजाडतो. पुन्हा एकदा मी फळं खाण्यापासून मुक्ताफळं उधळणेपर्यंतच्या सर्व टप्प्यातून तिच्यासकट जाते. नवा दिवस नवा साचा आणि नवी आव्हानं घेऊन येतो. त्यांना तोंड द्यायला मी पुस्तकात वाचून ‘शिस्त, मोकळीक, जेवणाचे प्रकार, कसे रागवायचे? रागवावे की नाही?’ उत्तर शोधू लागते.  सगळी पुस्तकं वाचून काथ्याकूट करून होतो. तर्कशास्त्रातले सर्व उपाय शोधून बुद्धिवादावर तासून मी परत थकते;  ‘आता पांढरे बुधवार करू का’ या विचारात मी हताश होऊन बसते. आणि अचानक.. जणू काही वादावादी झालीच नाही असं भासवत.. मुलगी जवळ येऊन गळ्यात हात टाकते, "तू आज बटाट्याच्या काचऱ्या करशील का, मला खूप खाव्याशा वाटतायंत" हे (शुद्ध मराठीत) म्हणते आणि निघून जाते!

दक्षिण मुंबईतून निघून बांद्र्याकडे जाणारा एक सुंदर - सेतू बांधा रे सागरी - असा पूल आहे. त्याच्या मुखाशी एक आईबाळाचं शिल्प आहे. त्यावर मथळा आहे 'A child gives birth to a mother’.  या विधानाला ‘everyday’ ही पुस्ती जोडायला पाहिजे. त्या एका वाक्यात या नात्याचं सगळं सार दडलं आहे. 

 

काचऱ्यांसाठी बटाट्याचे पातळ काप करताना मला या ओळी सुचतात.. 

आमच्या वेळी असं होतं , तुमचं मात्र तसं नसतं 

मी सकाळ तू रात्र,  वादविवाद निमित्त मात्र 

तुझी माझी वेगळी धून , तरी आपली पटे खूण 

 

खमंग फोडणीत मी बटाटे परतत राहते, एक वाफ दिली की काचऱ्या मस्त शिजतात.  मी 'आई' म्हणून पुन्हा नव्याने रुजते!

ज्योत्स्ना माईणकर दिवाडकर 

वाचायची गोडी खूप लहानपणी लागली; पण लेखनाची नशा अनुभवायला काही दशकं गेली. शिक्षणासाठी १९९१ साली अमेरिकेत आले तेव्हांपासून ‘पत्रलेखन’ हा शिरस्ता व गरजही बनले. त्यातून आपण लिहिलेल्या शब्दांना दाद किंवा हशा मिळत आहे ही जाणीव होऊ लागली. तरीदेखील आपण कशासाठी, कोणासाठी, कशावर की कोणावर लिहावं हा विचार सुचलाच नाही. डेट्राॅईटच्या काही मराठी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करायची वेळ आली आणि लक्षात आलं की सभेत बोलण्याइतकं आपल्याला त्याची संहिता लिहिणं सुद्धा आवडत आहे! आणि मग सांस्कृतिक कार्यक्रमांचं परीक्षण लिहायचं मनावर घेतलं. चांगला प्रतिसाद तर मिळालाच पण; खूप प्रोत्साहनही. आता लेखन हा छंद, मंडळाचं काम यापलिकडे जाऊन माझी गरज होऊन बसलं आहे; ‘मामबो’ची कृपा, दुसरं काय!