व्य क्त 

 

धीरज अकोलकर

शनिवार दुपारची वेळ होती. सारं लंडन आळसावल्यासारखं. कामं, जेवण वगैरे उरकून मी निवांत बसतच होतो, तेवढ्यात फोन वाजला. फोनवर सोफीया. तिचा आवाज थरथरत होता. काही क्षण नुसते हुंदकेच ऐकू आले. 

"सोफी, अगं काय झालं? अशी रडतेस का?", मी विचारलं...

"रॉनल्ड..."

बाकी काहीच बोलेना ती. काळजात धस्स झालं. 

"रॉनल्डने आत्महत्येचा प्रयत्न केला...", सोफी धीर करून म्हणाली.

माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

"काल रात्री किचनमधली सुरी मनगटावर चालवली त्याने... बेशुद्ध व्हायच्या आत त्यानेच पोलिसांना फोन केला. मी घरी नव्हते. काही कामासाठी हॅनोव्हरला गेले होते. पोलीस घराचं दार फोडून आत गेले तर हा रक्ताच्या थारोळ्यात किचनच्या जमिनीवर पडलेला. त्याला ते मनोरुग्णालयात घेऊन गेले. मला फोन केला तशी मी धावत सुटले. बर्लिनपर्यंत कशी येऊन पोचले ते माझं मलाच माहित नाही. आज सकाळी रुग्णालयाच्या बाथरूममध्ये पायजम्याच्या नाडीने फास लावून घ्यायचा प्रयत्न केला रॉनने...परत..."

सोफी हमसून हमसून रडायला लागली. 

"मी निघतोय", मी म्हणालो, "मिळेल त्या विमानाने येतोय..."

"लवकर ये. मी घाबरून गेलेय..." तिने फोन बंद केला.

 

काही क्षणांच्या स्तब्धतेनंतर मी कामाला लागलो. तिकीट काढलं. बॅगेत चार कपडे कोंबले. आईने पाठवलेले काही मसाले घेतले. मनाला बजावलं -" ही रडण्याची वेळ नाही. तो जिवंत आहे. देखरेखीखाली आहे. सोफी हादरलेली असणं साहजिक आहे. आपण भक्कम राहायचं. शांत राहायचं. कितीही अनावर झालं, तरी अश्रू ढाळण्याची वेळ येता कामा नये. वाटलंच तर कुठेतरी कोपऱ्यात जाऊन मोकळं होऊन यायचं..." म्हणेम्हणेपर्यंत डोळ्यात पाणी भरलं. 

 

लंडन सोडलं, तश्या आठवणी दाटून आल्या. 

 

काही वर्षांपूर्वी रॉन मला भेटला. गरीब घरातलं मूल. वडील टॅक्सी ड्रायव्हर. आई गृहिणी. चौदा भावंडं. एवढं मोठं कुटुंब असताना, परवडत नाही म्हणून वयाच्या तिसऱ्या वर्षापासनं ह्याला अनाथाश्रमात ठेवलेलं. दहा एक वर्ष तसा वाढला... मग एका मानसिक संतुलन बिघडलेल्या काकीने ह्याचा सांभाळ करायचं ठरवलं. दोन वर्षातच तिला मृत्यू आला. ह्याची ससेहोलपट परत सुरु झाली. ब्राझीलच्या एका मोठ्या शहरात पडेल ती कामं करत, हमाली करत हा मुलगा मेडिकल कॉलेजपर्यंत जाऊन पोचला. दोन वर्षं सटासट उत्तीर्ण होत गेला. बेदम कष्ट करूनही तिसऱ्या वर्षाची फी भरणं शक्य झालं नाही त्याला. कॉलेज थांबलं. हार न मानता, रेड क्रॉस ह्या संघटनेबरोबर हा अतिशय दुर्गम भागात पॅरामेडिक म्हणून कामाला लागला. स्वतःचे अश्रू विसरून दुसऱ्यांचे अश्रू पुसायला शिकला.

 

माझ्या घरी दोन दिवस राहायला आलेला होता, तर आपुलकीने, प्रेमाने भरभरून बोलला. दिवसात एकदाच जेवायचा. गरिबी काय काय संस्कार करते ते अनुभवल्याशिवाय कळत नाही आपल्याला!!! ज्या दिवशी तो निघणार त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता, म्हणून आदल्या रात्री कौतुकाने केक आणला, मेणबत्या लावल्या. बाराच्या ठोक्याला केक घेऊन त्याच्या समोर गेलो तर एखाद्या निरागस, लहान मुलासारखा खुद्कन हसला आणि अचानक हुंदके द्यायला लागला. मला काही कळेनाच. आजपर्यंत मी कोणालाही एकाच वेळेला हसताना आणि रडताना पाहिलेलं नाही. मी केक टेबलवर ठेवला आणि ह्याला मिठीत घेतलं. मनसोक्त रडला-हसला. केक कापून झाल्यावर थोडा शांत झाला तसं मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये म्हणाला, "आजपर्यंत मी कधीच केक पाहिला नव्हता... माझ्या वाढदिवशी रात्री मी एकटाच समुद्रावर जात असे..." 

 

त्या रात्री माझी उशी चिंब भिजून गेली. पुढे माझा आणि त्याचा संपर्क राहिला. अधेमधे इ-मेल येत असे. खुशाली कळे. खूप प्रयत्न करूनही मेडिकल कॉलेजमध्ये परत प्रवेश मिळत नव्हता त्याला. आर्मी जॉईन करतो म्हणाला, तसं फोनवरूनच त्याला दटावलं. माझं ऐकायचा. मोठ्या भावासारखा मला वागवायचा. एके दिवशी त्याला सोफी भेटली. जर्मनीहून ती ब्राझील फिरायला गेली होती. दोघे गुंतले, प्रेमात पडले आणि काही महिन्यांनंतर तिच्या मदतीने तो बर्लिनला येऊन पोचला. 

 

आमची तीन चार वेळा गाठ भेट झाली. मी कामाच्या निमित्ताने बर्लिनला सततच जात होतो, तेव्हा ह्या दोघांबरोबरच राहायचो. हा सकाळी चारच्या थंडीत उठून पेपर टाकायला जायचा, दुपारी जर्मन भाषेचा अभ्यास करायचा. आपण शिकायचंय, डॉक्टर व्हायचंय ह्या ध्येयाने नुसता पछाडलेला!!! रॉन दिसायला अतिशय देखणा, उंचापुरा, दणकट शरीरयष्टी. सोफी तर नाजूक, सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, हळुवार बोलणारी, हलकेच हसणारी. जोडा दृष्ट लागेल इतका सुंदर दिसायचा...अन आता दृष्ट लागली होती!!!!

 

बर्लिनला विमान पोचलं. घाईघाईत बाहेर पडलो. ट्रेनच्या दिशेला चालायला लागणार तर समोरच सोफी उभी! लंडनमध्ये केलेला सगळा निश्चय केरात गेला. तिला अलगद जवळ घेतली, अन दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला...

 

हिवाळ्याची वेळ. बर्फाळलेले रस्ते. ती गाडी चालवता चालवता बोलत राहिली. अनेक गोष्टी समजल्या. रॉनच्या मनोरुग्णालयापर्यंत कधी येऊन पोचलो ते कळलंही नाही. बाहेर एक विषण्ण उदासी होती. आतमधले दिवेदेखील कंटाळलेले, हिरमुसलेले. धीर धरून आत गेलो. पेशंटना भेटण्याची वेळ टळून गेली होती, पण मी येणार म्हणून सोफीने आधीच परवानगी काढून ठेवलेली.  तेवढ्यात अचानक पावलांची चाहूल लागली, अन मान वळली...

 

एक नर्स अतिशय काळजीपूर्वक रॉनला धरून घेऊन येत होती. हा पूर्णपणे गळलेला. डोळे जवळजवळ मिटलेलेच. जहाल औषधांच्या प्रभावाखाली होता. एक एक पाऊल ओढत ओढत चालत होता. जवळ आला तर चेहरा पाहवेना त्याचा. डावा डोळा काळानिळा झालेला, सुजलेला. स्वतःच्या बुक्क्याने ह्याने स्वतःचाच डोळा फोडण्याचा प्रयत्न केलेला...

 

काय कोण जाणे, पण एव्हाना आतून मी पूर्ण शांत झालो होतो.

 

नर्स रॉनला एका बाजूच्या खोलीत घेऊन गेली. ती आमच्यासोबतच बसणार होती. त्याला एकटं सोडण्याची परवानगीच नव्हती. 

"तू जा आतमध्ये", सोफी म्हणाली, "मी बाहेर थांबते."

 

मी आत गेलो. दाराच्या आवाजाने रॉनला जाग आली. माझ्याकडे पाहिलंन तर त्याचा विश्वास बसेना. पुढच्याच क्षणी, तश्याच अवस्थेत माझ्या मिठीत कोसळला. धाय मोकलून रडायला लागला. असह्य, आर्त वेदना... कोणाच्या डोहात किती अश्रू साठलेले असतात कोण जाणे! जणू काही ते भूकंपाची वाट पाहत असतात...

 

"मी चुकलो... मी चुकलो... मला माफ कर, करशील ना माफ? मी चुकलो, चुकलो रे मी...." 

 

त्याचे शब्द जाळत गेले काहीतरी आतपर्यंत...

 

आजी-आजोबा थोपटायचे मला लहानपणी, तसं ह्याला हळुवार थोपटत राहिलो. केकवरच्या विझलेल्या मेणबत्त्यांचा धूर भरून राहिला होता त्या छोट्याश्या खोलीत की काय कोण जाणे... गळलेलं पान जमिनीवर स्थिरावतं, तसा शेवटी रॉन शांत झाला. समोरची खुर्ची ओढली, अन बसलो. 

 

"खूप वाळलायस... असं चालणार नाही. एवढी औषधं घ्यायची तर पोटात अन्न नको?" मी दटावलं तसा गडबडला. "मी जेवण करून आणणार आहे, सकाळी आणि संध्याकाळी. खायला लागेल. व्यवस्थित. कळलं?" 

 

"हो. जेवेन.", म्हणाला. 

 

दार उघडून सोफी आत आली तसा तिच्याकडे वळला, "आता माझं काही खरं नाही..." अन हसला हलकेच. तशी शेजारी बसलेली नर्स देखील गालातल्या गालात हसली, म्हणाली, "आता विश्रांती घ्यायला हवी..." 

जाताजाता ह्याने अलगद, सावरलेली मिठी मारली. "थॅन्क यू" एवढंच बोलला, अन जाता झाला... पावलं ओढत नव्हता आता, उचलून टाकत होता - तीन दिवसात पहिल्यांदाच!

 

पुढच्या काही दिवसांत, त्याची जिवाभावाची मैत्रीण रेहानासुद्धा बार्सिलोनाहून येऊन पोचली. वेळ छान जाऊ लागला. रॉन डॉक्टरांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने बरा होत होता. चोवीस तासाची नजरकैद (त्याचाच शब्द) थांबली. पुढे एकट्याने आंघोळीला जायची परवानगी देखील मिळाली, तसं त्याला हायसं वाटलं. नर्सेस ह्याच्या प्रगतीने अचंबित झालेल्या. हा रोज ध्यान करत होता, चित्र काढत होता, खूप विचार करत होता, जेवत होता, थोडा व्यायाम करायला लागला होता, आम्हाला भेटायला स्वतःहून खाली येऊ लागला होता, आम्ही निघताना भर्रकन स्वतःच्या खोलीत जाऊन खिडकीपाशी उभा राहात होता. 

 

एके दिवशी डॉक्टर म्हणाले, "आम्ही औषधं देऊ शकतो, आम्ही प्रेम नाही करू शकत..." 

 

किती ताकद असते नाही प्रेमात? आपण सगळेच अपंग असतो, दुखावलेले असतो, भळभळत असतो...काहींचा काळानिळा झालेला डोळा दिसतो, काहींचा नाही दिसत... पण स्पर्शाची, आपुलकीची न माफीची गरज असते ती सगळ्यांनाच. क्रोधाच्या, आरोपांच्या नि अपराधांच्या पलीकडे जाऊन आपण प्रेम तर करू शकतो ना? मग का नाही करत? का नाही बसत एक दुसऱ्याच्या समोर? का नाही ऐकत त्यांचे आक्रोश? का नाही त्यांना जवळ घेत? मनगटावर सुरी चालेपर्यंत का थांबतो आपण?

 

मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं...

 

अशाच एका संघ्याकाळी आम्ही सगळे हॉस्पिटलमध्ये बसून गप्पा मारत होतो. तजेलदार झालेला रॉन, निश्चिन्त झालेली सोफी, खळखळून हसणारी रेहाना... काहीतरी फुटकळ चर्चा संपली तसा रॉन गंभीर झाला, म्हणाला, "मी ठरवलंय मनाशी... भरपूर विचार केलाय... नि उद्या मी माझ्या डॉक्टरांशी काही महत्वाचं बोलणार आहे. आजपर्यंत वाटत होतं की ह्या गोष्टी मी कोणालाच सांगू शकणार नाही. प्रत्येक क्षण मी हे ओझं घेऊन चालतो आहे. काही भीषण घटना घडल्या आहेत माझ्या लहानपणी. सारं काही मी दडवून ठेवलंय. नको आता मला ही गुपितं... कुजून, कुजून जणू त्या सगळ्या साठवलेल्याचं एक विष झालंय... ते बोटांत एकवटतं, तेव्हा सुरी धरावीशी वाटते हातात... मूठ पिळावीशी वाटते... दुसरा काहीच मार्ग दिसत नाही... गडद, काळ्या रंगाचं धुकं असतं तेव्हा फक्त! प्रचंड राग येतो, तो मी रागीट आहे म्हणून नव्हे... हे माझ्या भूतकाळातलं विष आहे, ते डोक्यात जातं, डोळ्यांमधून ठिणग्यांसारखं बाहेर पडतं... पुरे झालं आता... मला जगायचं आहे... आता मला जगायचं आहे...."

 

आम्ही निस्तब्ध ऐकत राहिलो. त्या संध्याकाळी खोलीत दिवा लावण्याचंही भान कोणाला राहिलं नाही.

 

जसा जसा रॉन डॉक्टरांशी बोलू लागला तसा तसा अजूनच बरा होऊ लागला. बाकी कोणाला हा फरक दिसला की नाही ते माहित नाही, पण आम्हा तिघांना तो नक्की जाणवत होता. त्याच्या पाठीचा कणा पुन्हा ताठ झाला होता, डोळ्यांत नुसती चमकच नाही तर हलका खट्याळपणाही दिसायला लागला होता, चेहऱ्यावरच्या रेषा पुसट होत होत्या, मिठीत ताकद परत येत होती...

 

पुढच्या पाच दिवसात डॉक्टरांनी रॉनला घरी पाठवण्याचा निर्णयही घेऊन टाकला.

 

कधीमधी जेंव्हा मी एकटा असतो, तेव्हा विचार करत राहतो. काय बरं झालं असेल ह्या मुलाच्या आयुष्यात? अनाथाश्रमात कुणी काही अत्याचार तर केला नसेल? आई-वडील गेल्यानंतर अजून काही झालं असेल का? मला माहित नाही. माझ्या लहान भावासारखा असूनदेखील रॉन मला ह्याबद्दल काहीच बोललेला नाही. पण बर्लिनमधल्या त्या उण्यापुऱ्या, गोठलेल्या काही दिवसांत हा हरवलेला मुलगा मला बराच काही शिकवून गेला आहे...

 

वैद्यकीय शास्त्रानुसार रॉनवर उपचार होणं, त्याला औषधांची गरज असणं हे मला तंतोतंत मान्य आहे. पण रॉनच्या आजाराचं मूळ हे त्याच्या अव्यक्त गुपितांमध्ये होतं ह्याची मला पुरेपूर खात्री पटली आहे. ह्या अव्यक्ताचं रूपांतर कितीतरी दैहिक आजारांमध्ये होताना मी अनुभवलेलं आहे. आज मी कोणाला क्षणाक्षणाला रागवताना किंवा खूप भावनाविवश होताना पाहतो, तेव्हा मला वाटतं की प्रत्येकालाच व्यक्त होण्याची बेफाट गरज आहे... 

 

आपणच आपले तुरुंग बांधून घेतो, आपणच तयार करतो आपला गडद अंधार, नि मग वाट सापडेनाशी झाली की गडबडून जातो...दोष देत राहतो दुसऱ्यांना नि विसरून जातो की आपल्या अंधाराची जबाबदारी फक्त आपली असते. लोक मदत करू शकतात, पण आपला दिवा आपणच लावायचा असतो... अन त्याची पहिली पायरी व्यक्त होणं ही आहे.

 

Gus Van Sant  ह्यांच्या 'पॅरानॉईड पार्क' (Paranoid Park) ह्या चित्रपटाच्या शेवटी एक अप्रतिम प्रसंग आहे - एका पंधरा वर्षाच्या मुलाकडून अकल्पित अशी चूक अनावधानाने घडते. तो कोमेजून जातो. त्याच्या प्रत्येक नात्यावर ह्याचा वाईट परिणाम होऊ लागतो. सर्वांशी भांडणं होऊ लागतात नि हळूहळू हा मुलगा सगळ्यांपासून दूर, एकाकी होऊन बसतो. तेव्हा त्याची एक जवळची मैत्रीण त्याला हळुवारपणे सांगते, "नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. तू चिडचिडा झालायस, हळवा झालायस. तुला वाटलंच तर माझ्याशी निःसंकोचपणे बोल, पण ते ही अवघड असेल, तर एका कागदावर सगळं काही लिही…मनात येईल ते लिही. शिव्या घाल. वाटेल ते सगळं त्या कागदावर ओक. मग दूर जा कुठेतरी, नि तो कागद जाळून टाक...मोकळा हो...."

 

डॉक्टर मनोज भाटवडेकर (माझा मामेभाऊ) यांच्या एका हायकूची आठवण होते इथे. 

 

"आज मला उमगलंय...

की माझ्या घराला 

आतून कुलूप आहे..."

 

आज रॉन बर्लिनच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत महत्वाच्या हुद्द्यावर काम करतो आहे. त्याला जर्मन नागरिकत्व मिळालं आहे. दोन वर्षांत तो मेडिकल कॉलेज मध्य प्रवेश घेणार आहे. तो आणि सोफी आता एकत्र नाहीत. पण दोघंही जिवाभावाचे मित्र आहेत. 

 

रॉन भविष्याकडे पाहतो आहे... त्याने दिवा लावला आहे, त्याने कुलूप उघडलं आहे.

व्यक्त होता होता तो मुक्त झाला आहे!

 

(सत्य घटनेवर आधारीत)

 

धीरज अकोलकर

धीरज अकोलकर २००० साली पुण्याहून आर्किटेक्ट झाला आणि कामासाठी लगेच मुंबईच्या बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये रुजू झाला. तिथे त्याने अनेक मोठमोठ्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर आणि असोसिएट प्रोड्युसरचं काम केलं (उदाहरणार्थ लगान, देवदास, चरस, आणि ब्लॅक). ह्यानंतर तो चित्रपट निर्मितीची कला आणि त्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडन युनिव्हर्सिटीच्या सुप्रसिद्ध गोल्डस्मिथ कॉलेजमध्ये गेला आणि २००७ साली त्याने तिथून स्क्रीन रायटिंग आणि निर्मितीमध्ये विशेष प्राविण्यासह एमए ची पदवी घेतली. त्यानंतर गेली बारा वर्षे तो अनेक चित्रपट आणि माहितीपट बनवत आहे. २०१० साली त्याने 'वार्डो फिल्म्स लिमिटेड' ह्या नावाची स्वतःची कंपनी स्थापली आहे आणि ह्या कंपनीमार्फत तो चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती करतो. 'लिव्ह अँड इंगमार', 'लेट स्क्रीम बी हर्ड', 'वॉर्स डोण्ट एण्ड' अशा सारखे गाजलेले चित्रपट त्याने निर्मिलेले आहेत. टीव्ही साठी छोटे चित्रपट आणि काही डॉक्युमेंटरी चित्रपट त्यांने निर्मिलेले आहेत. सध्या लंडनमध्ये राहतो.