आ भा 

भावना जोशी 

"भावना, अगं आत्ताच संस्थेतून फोन आला होता. आम्हाला पण बेबी मिळतेय बहुतेक"

 

माझ्या ऑफिसमधल्या एका मैत्रिणीचा फोन आला. किती उत्साहात होती ती. गेले बारा तेरा वर्षे त्यांचे प्रयत्न चालू होते पण बाळ होणं शक्य नव्हतं. अखेरीस खूप विचारांती आणि घरच्यांना समजावून, त्यांची मने वळवून, त्यांनी दत्तक घ्यायचा विचार केला होता आणि आज दोन वर्षांनी त्यांना फोन आला होता.

 

फोन ठेवला आणि मी मात्र पाच वर्षे मागे गेले. किती पटपट गेली ना वर्षे...

 

अजूनही मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो आहे. आम्ही (मी, केदार आणि अविक) तिघेही केदारच्या आईबाबांकडे निघालो होतो. रेडिओवर गाणी चालू होती आणि मागे अविकचे काहीतरी डायनोसॉर आणि लेगोब्लॉक्स बरोबर खेळ चालू होते. 

 

"केदार, अरे परवा अविक परत मला बेबी ब्रदर किंवा सिस्टर हवी आहे म्हणत होता. आपण करूया का रे विचार?" 

 

"म्हणजे तुला परत प्रेग्नन्ट व्हायचं आहे? नको ग बायको, आठवतंय ना आपली सातव्या महिन्यातली पळापळ.. मला नाही बघवत तुला झालेला त्रास..सोड…" 

 

"अरे पण आपण तेव्हाच ठरवले होतं ना, दुसऱ्याचा विचार करायचा झाला तर, दत्तक घेऊया मुलगी. ते म्हणतेय मी" 

 

"ओह दत्तक होय. बघ हं पण भावना. आता अविक सहा वर्षाचा होतोय. तू अधून मधून कॉर्पोरेट वर्ल्ड कसं बकवास आहे, सोडतेच जॉब म्हणत असतेस. आपण दुसऱ्याचा विचार केला तर मात्र तुला नोकरी करत राहावी लागेल. दोघांची शिक्षणं, फिया... खर्च आहेतच" 

 

"हो करीन रे मी नोकरी, मग ठरलं तर..." 

"काय आवड्या, आणायची ना रे तुला बेबी सिस्टर?" 

"हो आई, चल जाऊ, घेऊन येऊ..."

आणि मी आणि केदार हसू लागलो.

 

मग मात्र नुसती धावपळ, कागदपत्रं गोळा करणे, संस्थेला देऊन येणे. त्यांच्या सगळ्या प्रोसेस, आमचे घेतलेले इंटरव्हयू, अगदी अविकचा देखील. त्याला तर त्यांनी पत्र पण लिहायला सांगितलं होतं कि तुला बेबी सिस्टर का हवी आहे. फार गोड पत्र लिहिलं होतं त्यानेपण. त्या इंटरव्हयू दरम्यान आमची दोघांची दत्तक मुलाबद्दलची मतं,आमचे लहानपण कसं होतं, आम्ही एकमेकांना जोखून सांगायचं की एक आई किंवा बाप म्हणून आम्ही कसे आहोत. बापरे!!! जवळ जवळ दीड वर्ष गेलं ह्यात. 

दर दीड दोन महिन्याने मी त्या संस्थेच्या सोशल वर्करला फोन करत असे. 'आहे का हो आमच्यासाठी बेबी?' विचारत असे.ह्या सगळ्या कालावधीत अविकची मुंज झाली, केदारच्या बाबांचे अचानक आजारपण आणि आम्ही त्यांना गमावणे हा एक मोठा धक्का होता. त्यांनी मात्र हॉस्पिटलमध्ये असताना, "तुमची बेबी लवकर आणा म्हणजे मला पण बघता येईल" असं म्हटलं होतं. ते काही देवाच्या मनात मात्र नव्हतं.

मे महिना चालू झाला आणि एक दिवस ऑफिसमध्ये फोन आला. “आम्ही एक बेबी सिलेक्ट केली आहे, तुम्ही या बघायला.”  बघता क्षणी कुठेतरी क्लिक झालं कि हीच आपली पोरगी. शेंबडी होती, किरकिरत होती, त्या मावशींच्या कडेवरून माझ्याकडे यायला तयार पण नव्हती, फक्त लांबून टुकूटुकू बघत होती. अविकच्या पेडेट्रीशिअनकडून आम्ही ‘गो अहेड’ घेतला आणि मग तारीख ठरली, तिला घरी घेऊन यायची. मधल्या काळात मी वेळ मिळेल तसं तिला भेटत होते. गम्मत म्हणजे माणूस हा प्राणी किती स्पर्शाला आसुसलेला असतो हे फारच जाणवू लागलं. ती मला ओळखायला लागली होती. मी खाली ठेवलं की रडू लागली होती.

 

माझ्याही आत कुठेतरी तुटत होतं तिला सोडून येताना. केदार आणि अविक पण शनिवारी रविवारी माझाबरोबर येत होते. अविक तिच्याशी खेळत होता. त्याची प्रतिक्रिया तर फारच बोलकी होती घरी परत येताना, "मला वाटत होतं तशी नाहीये.पण ही मस्त आहे,माझ्याबरोबर खेळेल ना लगेच?" तेव्हा खरं तर ती नुकतीच आधार घेऊन चालायला लागली होती, तेरावा महिना लागला होता तिला. 

त्याआधी सोशल वर्कर आमच्या घरी येऊन, घर, गॅलऱ्यांची सुरक्षा, जवळपासचा एरिया, मेडिकल, डॉक्टर, आमच्या  घरातले वातावरण बघून गेल्या होत्या. प्रत्यक्ष ज्या दिवशी आम्ही तिला घ्यायला गेलो होतो तेव्हातर एखाद्या सणासारखं वातावरण होतं. मला तर त्या समारंभात राहून राहून रडू येत होतं. प्रचंड वेगवेगळ्या भावनांमधून मी जात होते. पण अखेर एकदाचे घेऊन आलो आम्ही तिला घरी. जवळ जवळ सात वर्षाने घरी लहान मूल येत होतं. एक नवीन अध्याय चालू होत होता आयुष्यातला. आम्हाला सगळ्यांनाच नव्याने रुजायचे होते आणि तिला तर खूपच.

ती घरी यायची तारीख पण छान होती, आषाढी एकादशी. ती घरी यायच्या आधी आम्ही एका संध्याकाळी चिट्ठ्या टाकल्या होत्या. अविक, मी आणि केदार तिघांनी एकेक नाव लिहिले होतं. अविकच्या हातून माझी चिट्ठी सिलेक्ट झाली आणि नाव ठरलं, "आभा".

घरी येतायेताच ती जी काय दमून झोपली होती, ती डायरेक्ट संध्याकाळी उठली आणि अजिबात न रडता, रांगत रांगत बाहेर आली हॉलमध्ये. अविकची एक्ससाईटमेन्ट सर्वात जास्त होती. त्याला तिने डायरेक्ट त्याच्याशी खेळायला हवं होतं. त्यामुळे मग अविकने पटापट तिला हाताला धरून उभं केलं, ती तशी आधार धरून उभी राहत होतीच. पण मग एवढा मोठा दादा आणि सवंगडी मिळाला म्हणून जरा पटापटच प्रगती करत गेली. दिवस इतके भरभर जात होते आणि ती घरात आणि आमच्या मनात मस्त रुजत होती. परत एकदा पालक झाल्यामुळे एक नवीन जबाबदारी आली होती, ‘आता आपल्याला एक नाही दोन मुलं आहेत’ हा विचार कायम यायचा मनात. 

काही काही प्रसंगांमध्ये मात्र माझी कसोटी लागत होती आणि कधीकधी केदारची पण. ती दीड दोन वर्षाची असेल तेव्हा ती दिसेल त्याला घट्ट मिठी मारत असे किंवा एकदम जवळ जात असे. दररोजच्या बातम्या, पेपर वाचून एक आई आणि बाई म्हणून माझी काळजी जास्तच वाढली होती. नको ते विचार घोंगावयाचे मनात. अविक मला सोडून कधीच असा कोणाला चिकटला नव्हता. आणि ही पोरगी म्हणजे कोणत्याही अनोळखी माणसाकडे झेपावयाची. माझी चिडचिड व्हायला लागली आणि मी तिच्यावर ओरडू लागले अधून मधून. पण ही माझी चूक होती हे मला लगेच जाणवलं. मी मग सोशल वर्करला फोन करून विचारलं ह्या समस्येबद्दल. तेव्हा कुठे प्रकाश पडला माझ्या डोक्यात.

 

त्यांच्याच शब्दात "ही मुलं स्पर्शाला आसुसलेली असतात. तुम्ही अविकला पोटात असल्यापासून स्पर्श दिला आहे, बाहेर आल्यावर त्याला कायमच तो स्पर्श भरपूर मिळाला आहे, त्यामुळे तो असं कधीच वागला नसेल. ह्यांच्यासाठी प्रत्येक स्पर्श महत्त्वाचा आहे, इट्स लाईक एन एक्सपीरियन्स टू देम".. पण तरीही माझी काळजी कमी होत नव्हती. शेवटी मी ‘stranger’ ही कन्सेप्ट आभाला वेळोवेळी सांगू लागले. त्याचा हळूहळू परिणाम झाला आणि ती फेज संपली एकदाची. 

मूल दत्तक घेण्यापूर्वी एक वर्कशॉप घेतात इच्छुक पालकांचे. त्यात बऱ्याच गोष्टी कळतात. त्यात एक महत्त्वाचं म्हणजे, त्या मुलाला तुम्ही वेळोवेळी सांगायचे की तू दत्तक आहेस. अर्थातच एवढ्या कोरडेपणाने नाही तर एकूण वयानुसार, समजेल असं. खरंतर माझा ह्या गोष्टीला प्रचंड विरोध होता. एकीकडे आपले मूल आहे ते, तर त्याला कशाला सांगायचं की तुला दत्तक घेतलं आहे! एकूणच जडणघडणीवर आणि त्या मायेच्या बंधावर त्याचा परिणाम नाही का होणार? असा माझा प्रश्न होता त्यांना. पण त्या संस्थेच्या चालिकेने जे सुंदर उत्तर दिलं  त्यामुळे माझं मत बदललं होतं.

 

"हे बघा, प्रत्येक मनुष्याला तो कोणासारखा दिसतो ह्याची उत्सुकता असते. मग समजा असाच प्रश्न तिला पडला तर? तुम्ही नाही म्हणलं तरी थोड्या लोकांना सांगणारच कि ती दत्तक आहे, मग त्यातल्याच एखाद्या व्यक्तीने जर तिला सांगितले तर? तर तिचा विश्वास कमी होऊ शकतो तुमच्यावरचा. एक मोठं सत्य तुम्ही लपवलत म्हणून. आणि म्हणून तुम्हीच तिला विश्वासात घेऊन वेळोवेळी वयाप्रमाणे सांगत राहणे महत्वाचे. तुम्ही दत्तक घेत आहात म्हणजे काही पाप नाही करत आहात, मग ते लपवायचे कशाला? त्यापेक्षा ते सेलिब्रेट करा". 

मग एक दिवस मी पण तो प्रयोग करायचा ठरवलं. संध्याकाळची वेळ होती, आभा आणि अविक दोघेही बसले होते माझ्या आजूबाजूला. केदारही होता जवळच. मी विचारले, "आभा तुला तुझी स्टोरी ऐकायची आहे का?" आभा एकदम एक्ससाईटेड!!! 

मग मी पुढे चालू झाले...

"...तर काय झाले आभा… मी आणि अविक दादा आणि बाबा एकदा गॅलरीत बसलो होतो. आम्हाला सगळ्यांना एक बेबी गर्ल हवी होती. आणि समोरून आकाशातून एक स्टार पडला. आम्ही तिघांनी एकदम विश केलं  कि देवा आम्हाला बेबी गर्ल दे. आणि मग दुसऱ्या दिवशी मला फोन आला संस्थेमधून कि एक बेबी गर्ल आहे तुमच्यासाठी. आणि मग मी बघायला आले तुला तर तू अशी शेंबडी, रडकी होतीस, एका मावशींच्या कडेवर बसून बघत होतीस माझ्याकडे.." 

अशी स्टोरी सांगितली आणि आभाच्या डोळ्यातला आनंद खूप भावला मनाला. अजूनही अधूनमधून तिला ही गोष्ट ऐकायला आवडते. पण कधी कधी ती अट्टाहासाने म्हणते, मी तुझ्या पोटातूनच आले आहे. मग मी पण काही वाद घालत नाही, निष्पाप निरागस जीव आहे हो तो. घेईल समजून उमजून हळूहळू.

अजून आमची कसोटी लागते ती तिच्या हट्टीपणामुळे. अविकच्या बाबतीत, त्याला दोन वेळा सांगितलं, ‘असं,असं करू नकोस’ आणि त्याचं कारण सांगितलं की तो ती गोष्ट करत नसे. त्याला त्यामुळे कधी फटका द्यायची वेळच आली नाही. आता आभाला वाढवताना मात्र ह्या पॅरेंटिंगच्या तत्त्वाला सुरुंग लागत असतो. ह्या बाबत अजूनही माझे काही मित्र मैत्रिणी मला चिडवतात, कारण मी फार फंडे दिले होते पूर्वी, मुलांना न मार देण्यावर. असो!!

 

तर होतं असं, की आभाला सांगितले हे नको करुस आणि कारण दिलं तरी तिची जिज्ञासा भागत नाही. तिला ते करूनच बघायचं असतं. मग केदार ओरडला, मी चिडले तरी तिला काही पडलेली नसते. आणि मग कधी आमची पिन उडाली तर ही बाई पण मागे हटत नाही, "द्या मला फटका..." ह्या आविर्भावात उभी असते. मी तर चेष्टेत म्हणते पण तिला, "अगं समोर बाबा एवढा चिडलेला दिसतोय, तो एक गोष्ट करू नकोस म्हणतोय, तरी तू ढिम्म कशी उभी राहतेस, तीच गोष्ट काय करत राहतेस. मेंदू काय बंद करून ठेवतेस की काय? का नाही ऐकत तू आमचं??" पण तिच्यावर परिणाम शून्य. कोणतीही गोष्ट अनुभवल्याशिवाय ती विश्वास ठेवतच नाही. 

ह्या सगळ्या इव्हेंटफुल वातावरणात वाढत असताना तिची दोन लाडाची स्थाने आहेत, एक म्हणजे आजी आणि दुसरा तिचा दादू (म्हणजे दोघे भांडायचे तेव्हा अगदी कुत्रा मांजरासारखे भांडतात, पण तो छान सांभाळून पण घेतो तिला. ती तशी भोळी पण आहे, त्यामुळे त्याला दादागिरी पण करायला मिळते ना तिच्यावर!) 

तिचे सुप्त कलागुण (उदा. कुठल्याही गाण्यावर स्वतःच बसवलेला सुंदर नाच), तिची जिद्द, कधी कधी हेकेखोरपणा, हट्टीपणा, तडकू डोके, एकदम रानटी प्रेम, कधीकधी दादूबरोबर होणारी भांडणे,  सगळ्यांशी होणारी पटकन मैत्री (आक्ख्या कॉलोनीला आता मी 'आभाची आई' म्हणून माहित आहे), प्रचंड शोधक दृष्टी आणि तल्लख मेमरी (आता बाई म्हणाले की ते आलेच की) ह्या सगळ्यांमुळे आमचे जीवन सप्तरंगी झाले आहे.  

मला आय्यु, केदारला बाबू, अविकला दादू, आजीला आज्जू, मामाला मामू अश्या गोड नावांनी हाक मारणारी आमची आभा रुजत चालली आहे आता आणि आम्हालाही परत एकदा रुजायला मिळते आहे. देवाकडे एकच मागणे आहे हा निरागस जीव कायम सुखी राहू दे आणि जीवनात यशस्वी होऊ दे. 

भावना जोशी 

पोटापाण्यासाठी IT Professional आहे. पण मनापासून म्हणाल तर मला एक शिक्षक व्हायला आवडेल. पाच सहा वर्षांपूर्वी मला अचानक लिहिण्याची उर्मी आली. मराठीतून, छोट्या छोट्या ललित लेखनापासून सुरुवात केली. नेहेमीप्रमाणे लहानपणीच्या आठवणीतल्या गोष्टी, काही पटलेल्या, खटकणाऱ्या गोष्टी, मार्मिक विनोदी लेखन आणि आता दीर्घकथा असा प्रवास चालू आहे. "व्यक्त होणे महत्त्वाचे ह्याची जाणीव झालेली एक व्यक्ती" असं मी म्हणते आणि व्यक्त होते. मामबो सारखा फोरम आणि माझे मित्र मैत्रिणी आणि हितचिंतक माझे लेखन वाचतात, अभिप्राय देतात, त्यातूनच पुढील लेखनाला स्फुर्ती मिळते.