ओ ल्ड  इ ज  नॉ ट  आ ल्वे ज  गो ल्ड 

 

अरुण देशपांडे 

 

“रुजणे” या शब्दातच अनेक नव्या संकल्पनांची, नव्या विचारांची नवी सुरुवात, नव्याची सुरुवात, नव्याने सुरवात असे अर्थ सूचित होतात. आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक कारणाने रोजच्या सरावलेल्या कालक्रमात बदल करीत असतो.  कधी हे असे बदल होणे त्या त्या वेळेचे, काळाची मोठीच गरज असते. अशा बदलांना आपण अनुकूल मानसिकतेने स्वीकारले नाही तर याचा  खूप मोठा फटका बसू शकतो. अर्थात हे सगळे ती ती  व्यक्ती परिस्थितीला कशी  सामोरी जाते यावरही बरेचसे अवलंबून असते.

 

आपल्या भवताली खूप जण असे आहेत की ते मोठ्या निर्लेप मनाने, थंड विचाराने त्यांच्याच जगात वावरत असतात. त्यांच्या दृष्टीने “आला दिवस - गेला दिवस” हेच त्यांचे जीवनगाणे असते. एका ठराविक चौकटीत राहून नोकरीत असेपर्यंत आपले ऑफिस आणि घर यातच रमणाऱ्या नोकरदार माणसांना ‘निवृत्ती नंतर आता माझे कसे होणार?’ या भीतीने  पछाडून टाकले की ते सैरभैर होऊन जातात.

 

अशा माणसांना या भीतीतून बाहेर काढण्याचे काम त्यांच्या स्वतः शिवाय इतर कुणी करू शकणार नाही. हे तो जितके लवकर स्वीकारून नवी सुरुवात करू लागेल त्या दिवसापासून  त्याच्या "नव्यानी रुजण्याची” चाहूल त्याला नक्कीच लागेल. मित्रांनो, हे प्रास्तविक माझ्याच स्वानुभवावरून मी लिहितो आहे. माझ्या समवयस्क मित्रांची अवस्था मी पाहिली आणि स्वतःला धीर देत देत जो काही न्यूनगंड माझ्याही मनात होता त्याला हळूहळू कमी करण्याचे शिकलो आहे. नव्याने रुजताना अनुभवलेली माझी छोटीशी कहाणीच मी आता तुमच्याशी शेअर करतो आहे.

 

२००६ साली मी स्वेच्छा -निवृत्ती घेतली. बँकेच्या नोकरीत पाच वर्षांची नोकरी शिल्लक राहिलेली असतांना मी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आकडेवारीच्या दुनियेतील हिशोबी माणसांनी माझ्या निर्णयावर नाराजी प्रकट केली. कारण त्यावेळी बँकेत क्लर्क लोकांसाठी  कोणतीही आर्थिक स्कीम नसतांना  स्वेच्छा निवृत्ती घेणारा मी एक दुर्मिळ-वेडा ठरवलो जात होतो. पण माझ्या निर्णयात मी काही बदल केला नाही आणि जून २००६ मध्ये मी पुण्यास आलो.

 

मराठवाड्यातील, त्यातही 'परभणी' येथील एकूणच जीवनमान तसे अगदी मोगलाई पद्धतीचे. सगळं काही आरामसे, फुरसतसे या पद्धतीने करण्याची सवय लागलेली होती. घड्याळाचं काम फक्त किती वाजले हे पाहण्यासाठी असते त्यामुळे करायची ती कामं वेळेवर, वेळे प्रमाणे करायची अशी शिस्त- बिस्त लावणे वगैरेच्या फंदात फारसे कुणी पडत नसे. सांगितलेले एखादे  काम लगेच आज होईल? या प्रश्नाचे उत्तर "उद्या या” असे आश्वासक मिळत असे त्यामुळे आमच्यावर कुणी  नाराज झाले असे घडत नसे. असो.अशा वातावरणातून मी आलो ते या पुणे शहरात. दुपारी १ ते ४ या वेळेचा लौकिक मी ऐकला होता तो अनुभवण्याची वेळ माझ्यावर आली आणि वेळेप्रमाणे वेळेवर दिनक्रम आखण्याची सवय लावून घेण्याची सवय. हा पहिला धडा. पुण्यात नव्याने रुजताना मी गिरवण्यास सुरुवात केली.

 

निवृत्ती नंतर काय? हा प्रश्न माझ्या साठी मोठा बागुलबुवा नव्हता. उलट हातावरील सततच्या कामामुळे मला वेळ आणि दिवस कमी पडत असत. याचे कारण मी सातत्याने लेखन करणारा एक लेखक-कवी-बाल -साहित्यकार आहे. नोकरीत असेपर्यंतच म्हणजे २००६ पर्यंत माझी २५ पुस्तके प्रकाशित झाली होती. आता निवृत्ती नंतर तर मी पूर्ण वेळ लेखन करण्यास मोकळा होतो. सुरुवाती पासून सर्व प्रकारच्या नियतकालिका साठी मी लेखन करीत होतो. इथे आल्यावर संपादकांना प्रत्यक्ष भेटून साहित्य देतांना वेगळाच आनंद मिळवत होतो. ‘हाताने लेखन करण्यात, ते फेअर करण्यात, पोस्टाने पाठवण्यात वेळ घालवणे किती जुनी पद्धत झालीय, तुम्ही हे नका करू’असे मला माझ्या तरुण आणि टेक्नो-सेव्ही मित्रांनी वेळोवेळी बजावून सांगितले, समजावून सांगितले. त्यासाठी तुम्ही कॉम्पुटर शिका, मराठी टायपिंग शिका तरच तुम्ही तुमचे स्वतःचे लेखन मराठीमध्ये शेअर करू शकाल. मग  इंटरनेट वापर सुरु करा. त्याशिवाय या नव्या आणि बदलत्या साहित्य जगात तुम्ही स्वत:चे अस्तित्व जाणवून द्याल, एक साहित्यिक म्हणून तुमची ओळख निर्माण होणे कठीण आहे. पण खरी गोष्ट अशी होती की "आहे त्या सवयी बदलून, नव्या गोष्टी शिकणे, त्या स्वीकारणे त्या प्रमाणे वागणे”, या बदलास मन काही केल्या तयार होईना. जाऊ द्या काय करायचे हे सगळं शिकून, जे आहे ते ठीक आहे. लिहू हाताने आणि पाठवू नेहमी प्रमाणे असे करण्यात दोन तीन वर्ष तशीच गेली. मी आपल्या ‘ओल्ड इज गोल्ड’च्या प्रेमात होतो.

 

पण नंतर असे होऊ लागले की टपालाने साहित्य ऐवजी मेल करा अशा सूचना येत गेल्या. मग मात्र जाणवले की नव्या गोष्टी शिकून घेण्यातच भले आहे. मन निगरगट्ट, वळता वळेना. नव्याने रुजताना मला या गोष्टीचाच फार त्रास झाला. जोपर्यंत आपण आपल्या मनाला बदलणार नाही तो पर्यंत नव्या जगाचे दरवाजे आपल्या साठी उघडले जात नाहीत. अनेक संधी निसटून गेल्यावर मात्र मन खडबडून जागे झाले. घरात पीसी होता. इंटरनेट होते पण मी त्याच टेबलावर समोर कागद घेऊन हाताने लिहित बसायचो. अशा वेळी माझ्या मदतीला माझी नवी पिढी आली. काॅलेजात जाणारी भाची, पुतण्या यांनी मला मेल अकाउंट उघडून दिले. मेल करणे, पाठवणे जमू लागले.

 

मग फेसबुक अकाउंट उघडून दिले. आभासी जगात माझा प्रवेश झाला खरा पण मी माझे लेखन मराठी मध्ये शेअर करू शकत नव्हतो. अशावेळी गझलकार आणि कवी मित्र अनंत जोशी यांनी मला कॉम्पुटर आणि मराठी कसे वापरायचे हे शिकवले. असे सहा महिने मी मन लावून शिकलो. जोशीबुवांनी अजून दोन महिने शिकण्यास अनुमती  दिली. मार्च २०११ मध्ये मी माझ्या कविता संग्रहाचे टायपिंग स्वत: केले.

 

तेव्हा पासून इंटरनेटवर माझे साहित्य मराठीमध्ये शेअर करू लागलो. विविध वेबसाईटवर मी निमंत्रित साहित्यिक म्हणून जोडला गेलोय. नव्या पिढीच्या नवोदित  आणि उमेदीने लेखन करणाऱ्या मित्र-मैत्रिणींना मी आवडीने लेखन मार्गदर्शन करतो. बराचसा सफाईदारपणा आल्यामुळे आता मी इंटरनेटवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषातून करतो आहे. हे कशामुळे झाले तर नव्या बदलास मन अनुकूल झाले. हा बदल मला नव्याने रुजताना खूप महत्वाचा ठरलाय. आता या जगात माझी एक ठळक अशी ओळख निर्माण झाली. याचे श्रेय मला नव्याने रुजताना मदत  करणाऱ्या लहान-थोर अशा माझ्या आपल्या माणसांना देतांना खूप आनंद होतो आहे. नव्याचा स्वीकार करणे, आहे त्या परिस्थिती प्रमाणे बदल स्वीकारून पुढे जाण्यातच आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करणे आहे.

 

मी तर बदल करून घेतलाय. ही नवी रुजवात म्हणजे मी माझ्यात निर्माण केलेली नवी उर्जा आहे!

अरुण देशपांडे 

मुक्काम पुणे, लेखक, कवी, बालसाहित्यिक, समीक्षक म्हणून साहित्यिक जगतात ओळख. मागील ३५ वर्षांपासून लेखन चालू आहे. आतापर्यंत कथा संग्रह, कविता संग्रह, समीक्षा लेख, ललित लेखन, बाल-कथा, बाल-कादंबरी, बाल-कविता,ललित लेखन केले आहे. एकूण ५२ पुस्तके प्रकाशित. इंटरनेटवर २०११ पासून लेखन सुरु, सध्या नामवंत वेब पोर्टलवर निमंत्रित साहित्यिक म्हणून कार्यरत. "बाल-साहित्य - मराठवाड्याचे नवे-स्वरूप-नव्या वाटा" या ग्रंथ लेखनास बालसाहित्याचा "दि.के.बेडेकर - बाल साहित्य समीक्षा पुरस्कार प्राप्त. 'स्टोरी मिरर' या वेब पोर्टल चा Author of the year-2018  पुरस्कार प्राप्त.