मा झं  कुं डी त लं  रा न फू ल

 

अनिल परांजपे 

तिच्या पापण्यांच्या पाकळ्या अलगद उघडतात
त्यातले ओले तांबुसकरडे परागकण चमकून उठतात
अजून धुक्यातच असतं माझं फूल
धगधगत्या दिवसातही रात्रीतच मश्गूल
जणू स्वप्नात अडकलेल्या जुन्या आठवणी सोडवण्यात

जरी तिची पहाट रोजची कुंडीतच उजाडते
ती मोकळ्या कुरणांच्या ओल्या श्वासातून जागी होते
कुंडीत रहाण्याला तिचा नकार नसतो
प्रश्र्न मुळं रुजवायच्या जागेचा असतो
जिथे आयुष्याला तिची स्वतःची संदर्भचौकट मिळते.

माझ्या गंधफुला, ऐक तुला देतो मी हमी
असा एक दिवस घेऊन खरंच येईन परत मी
जेव्हा तू पुन्हा फुलशील भरभरून
तुझ्याच आवडत्या कुरणात रुजून
तेव्हा आठवशील याही दिवसांतली नमीं!

अनिल परांजपे 

जन्म दिल्लीचा तरी पुण्याच्या सदाशिव पेठेच्या पाण्यावर वाढलो. शैक्षणिक प्रवास पेरूगेट भावेस्कूल, फर्ग्युसन, वाडिया, सारख्या अस्सल मराठी संस्थांपासून टेक्सस् (ऑस्टिन), व्हार्टन अशा अमराठी वातावरणापर्यंत झाला. कार्यक्षेत्र पोर्टलंड च्या इंटेल पासून जे चालू झालंय ते सध्या ते भारतात दोन व्हेंचर कॅपिटल फंडांचा पार्टनर, लायटिंगच्या क्षेत्रातली एक स्वतःची कंपनी आणि काही कंपन्यांच्या संचालक बोर्डांवर सदस्यत्व इथे येऊन स्थिरावले आहे. लहानपणापासून भाषा, लेखन, आणि वाचनाची आवड! कविता, निबंध, प्रवासवर्णनं हे माझे आवडीचे विषय पण कथा (त्यातही जास्त शास्त्रीय कथा) लिहिण्याचा मानस आहे. मुलीच्या जन्मापासून मी तिला माझ्या आयुष्याचं केंद्र मानलं. तिला माझा कंटाळा येईल इतका वेळ दिल्यावर उरलेल्या वेळात लेखन, वाचन जोपासलं याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे.