अ ण्णा  उ वा च 

 

लेखक श्री. अनंत मनोहर ह्यांच्याशी केलेली साहित्यिक चर्चा

 

प्रश्नकर्ते आणि लेखक: प्रियदर्शन मनोहर 

संकलन: गौतम पंगू 

जुलै २०१९ मध्ये मामबोचे संस्थापक डॉ. प्रियदर्शन मनोहर भारत दौऱ्यावर असताना त्यांनी मामबोवर ‘ भारत डायरी संवाद’ नावाचा अभिनव उपक्रम चालवला.  मामबोच्या सदस्यांनी त्यांना पडलेले लेखन वाचन विषयक प्रश्न प्रियदर्शन मनोहर यांना कळवायचे आणि त्यांनी श्री. अनंत मनोहर (उर्फ अण्णा) यांना ते विचारून अण्णांनी दिलेली प्रश्नांची उत्तरं मामबोवर प्रसिद्ध करायची, हे या उपक्रमाचं स्वरूप.  या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक वाचकांनी ह्या चर्चेचं एकत्रीकरण करावं अशी सूचना केली. म्हणून त्यातल्या काही निवडक प्रश्न आणि उत्तरांचा संच इथे दिवाळी अंकात प्रसिद्ध करत आहोत.

 

या प्रश्नांचा आवाका बराच मोठा होता.  मामबोकरांनी या प्रश्नांतून लेखनामागची मूलभूत प्रेरणा, लेखनाचे विषय, तंत्र,  लेखक-वाचक संवाद अशा अनेक विषयांना स्पर्श केला. यावरून हे पुन्हा एकदा दिसून आलं की मामबो हा नुसताच पोस्टी पाडून लाईक्स मिळवायच्या मागे लागणारा समूह नसून मामबोकर लेखनवाचनाच्या प्रक्रियेविषयी सजगपणे विचार करतात.  या प्रश्नांबद्दलचा अण्णांचा अभिप्रायही या संचामध्ये मुद्दाम प्रसिद्ध केला आहे.

 

मौलिक मार्गदर्शनाबद्दल अण्णांचे आणि हा उपक्रम चालवल्याबद्दल डॉ. प्रियदर्शन मनोहरांचे मन:पूर्वक आभार!

वाचताना सुसूत्रता जाणवावी म्हणून मूळ प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिवाळी अंकात प्रसिद्ध करताना त्यात किरकोळ फेरफार केले आहेत.

 

श्री. अनंत मनोहर यांची संक्षिप्त ओळख: मराठीचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, राणी पार्वती देवी कॉलेज, बेळगाव. मराठी आणि इंग्लिश मध्ये एमए (पुणे विद्यापीठ). सत्तर कादंबऱ्या आणि कथासंग्रह प्रसिद्ध. स्फुट लेखन आणि स्तंभलेखन. महाराष्ट्र राज्य सरकार आणि इतर अनेक साहित्यिक बक्षिसे. 'अनंत मनोहरांच्या कादंबऱ्या' ह्या विषयावर एक पीएचडीचा प्रबंध कर्नाटक युनिव्हर्सिटीने मान्य केलेला आहे.

प्रश्नकर्ते आणि लेखक: डॉ. प्रियदर्शन मनोहर. मटेरियल्स इंजिनियरिंग मध्ये पीएचडी. रॉबर्ट मॉरिस युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आणि संशोधन विभाग प्रमुख. मराठी एकांकिका, कथा, काव्य आणि स्तंभ लेखन प्रसिद्ध. स्वतःची पाच पुस्तके आणि इतर पाच संपादित पुस्तकांतून साहित्य प्रकाशित झालेलं आहे.        

 

---------------------------------------

प्रश्न १:

प्रश्नकर्ते: डॉ. प्रियदर्शन मनोहर 

 

प्रश्न: साहित्याच्या मुख्य प्रकारांचा विचार केला तर मी असं म्हणेन की कथा, कविता, कादंबरी, नाटक आणि गद्य लेखन (ज्यात मी निबंध, लघुनिबंध, ललित, स्फुट इत्यादींचा समावेश करतो) असे पाच प्रकार मनात येतात. ह्यापैकी कथा मला सगळयात जास्त वाचायला आवडते. मग ललित. नाटक मला बंघायला आवडतं तर कविता ऐकायला आवडते. कादंबरी मात्र मनाची तयारी करून, वेळ देउन वाचायला लागते. तुमचा सगळ्यात जास्त आवडीचा साहित्यप्रकार कोणता आणि का?

 

अण्णा: माझ्या मते लेखकाला जे सांगायचं आहे ते सविस्तरपणे सांगण्याचा सर्वश्रेष्ठ आकृतीबंध म्हणजे कादंबरी! म्हणून मला कादंबरी वाचायला सगळ्यात जास्त आवडते. ऐंशी पानांपासून ते बाराशे पानांपर्यंत कितीही लहान अथवा मोठी कादंबरी करतायेते. एखाद्या वाचकाचंच काय पण एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या देशाचं प्राक्तन बदलून टाकण्याची क्षमता कादंबरीत आहे. रूढी, परंपरा, रिवाज, संस्कृती, विचार, कायदेकानू, धर्म आणि सत्ता बदल करून कादंबरीने क्रांती घडवून आणली आहे. लागतील तितकी पात्रं वा प्रसंग कल्पून बांधणी करता येते. कादंबरीच्या लवचिकपणामुळे भाषा, शैली, रचना ह्यात नाविन्य निर्माण करता येतं. त्या मानाने नाटक किंवा कवितेला आकृतीबंधाच्या मर्यादा पडतात. त्यानुळे ते साहित्यप्रकार जास्त आव्हानात्मक होतात. कविता तू म्हणतोस की तुला ऐकायला आवडते. पण त्याला बालकवी किंवा बोरकर असे अपवादही आहेत. त्यांची कविता नुसती वाचली तरी डोळ्यांसमोर जिवंत चित्र उभं राहतं एव्हडं त्या शब्दांचं सामर्थ्य आहे! त्यांना सूर - तालाच्या साथीची गरजच नाही. लघुनिबंध हा एक असाच सामर्थ्यवान प्रकार आहे. काणेकर, फडकेंचे लघुनिबंध हे उत्तम उदाहरण आहे . आयुष्यातल्या छोट्या छोट्या सत्यांवर लघुनिबंध प्रखर प्रकाश टाकू शकतो.


 

प्रश्न २:

प्रश्नकर्ते:  रोहिणी केळकर अभ्यंकर

 

प्रश्न: सर्वसाधारणपणे नव्या लेखकाचा लेखन प्रवास अनुभवलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या प्रसंग चित्रणातून सुरू होतो हे खरं आहे का? पुढे लेखन अंगवळणी पडल्यावर हे वास्तवावर आधारित लेखन कधी संपतं? संपतं का? लेखनात वास्तवाचा कल्पनेशी योग्य मिलाफ कसा साधायचा?

 

अण्णा:  पहिला प्रश्न अगदी बरोबर. सुप्रसिध्द फ्रेंच कादंबरीकार एमिल झोला म्हणाला if you want to tell your readers something incredible, nothing will serve you better than to begin with absolute realism. जयवंत दळवी, भाउ पाध्ये हयांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून आणि त्यांच्या प्रतिभेच्या झोताने अंधारात दडलेलं वास्तव उजळून निघालं. काल्पनिक कथा उबवत बसण्यात तसा अर्थ नसतो. लेखकाने सत्य घटना समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. कान, डोळे उघडे ठेवायला हवे. मन टिपकागदासारखं हवं. खडकावर बी पेरलं तर त्याचा उपयोग होत नाही. त्याला मातीचा आधार लागतो. लेखकाने सजग जीवनानुभव घ्यायला हवा. आपण गर्दी पाहतो, लेखक त्यातल्या व्यक्ती न्याहाळून त्या समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. आजूबाजूची माणसं वाचायला शिकलं पाहिजे. तुकाराम महाराज लोकांचं दु:ख बघून म्हणतात:

येणे दु:खे पाहो जाता

फुटो पाहे माझा प्राण

हा त्यांच्यातला लेखक. ज्ञानेश्वर महाराज त्याला मनीचे आर्त म्हणतात. आयुष्य असं आपल्याला थेट भिडलेलं असतं. लेखकाने कान, डोळे उघडे ठेउन वास्तव कळून घेतलं पाहिजे. मग त्यातून त्याला लेखनाच्या कल्पना सुचतात. मग त्यांना ‘कल्पना’ म्हणायचं का? 

मग लेखक कल्पनेचा आधार कधी घेतो? निर्मितीच्या काठावर असताना सुचलेल्या कथाबीजाचा विस्तार करायला, त्यातली वेगवेगळी परिमाणं समजावून घ्यायला कल्पनेची जोड देता येते. अद्भुतरम्य साहित्य निर्मितीसाठी कल्पनेच्या पंखांची गरज असते. पण सत्य शंभर पटीने दाहक असतं. लेखक जो पर्यंत खऱ्या जीवनाला सामोरा जातो तो पर्यंतच त्याची वाढ होते. तो बनचुका झाला आणि प्रत्यक्षापासून दूर गेला की त्याला मर्यादा पडतात. कल्पनेने घेतलेला अनुभव ठिसूळ असतो. 

आता दुसरा प्रश्न - पुढे लेखन अंगवळणी पडल्यावर हे वास्तवावर आधारित लेखन कधी संपतं? संपतं का? - मला वाटतं साहित्याचं वास्तवाशी असलेलं नातं कधीच संपू नये. आपल्या सभोवतालचं जग पाहून, वाचून, ऐकून, निरीक्षण करून त्यावर चिंतन करून लेखन करावं. घिसाडघाई करून चालत नाही. वरवर विचार करून केलेली निर्मिती आणि खोल विचार करून केलेली निर्मीती ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की literature is a serious business! 

शेवटी तिसरा प्रश्न - लेखनात वास्तवाचा कल्पनेशी योग्य मिलाफ कसा साधायचा? हा प्रश्न निर्मितीप्रक्रीयेशी थेट भिडतो. सत्यकथा नुसती ऐकून सोडून द्यायची नसते. त्यावर विचार आणि चिंतन करायला हवं. भावलेली गोष्ट अंतर्मनात दडवून ठेवावी. तिची वाढ करण्यासाठी. तिच्या कलात्मक पुनर्अविष्कारासाठी त्याची आवश्यक्ता असते. म्हणून लेखकाने स्वत:साठी वेळ काढावा लागतो. सुचलेल्या कथाबीजाची व्याप्ती लक्षात ध्यावी लागते. नाहीतर वाॅशिंग्टनच्या नव्या कुऱ्हाडीच्या गोष्टीसारखं होईल! केवळ शब्द वश आहेत म्हणून ते हत्यार चालवायचं नाही. वास्तव आणि कल्पनेचा समन्वय साधता यायला हवा.

 

प्रश्न ३: 

प्रश्नकर्ते: गौतम पंगू

 

प्रश्न: मराठी लेखनातील इंग्रजीच्या वापराबद्दल विचारायचं होतं. बरेचदा आपल्या सहज बोलण्यात दोन्ही भाषांची सरमिसळ असते. शहरी भागाची किंवा परदेशाची पार्श्वभूमी असलेल्या लेखनात इंग्रजीचा वापर करायचं संतुलन कसं साधायचं? इंग्रजीचा अतिवापर खटकू शकतो, पण मराठी प्रतिशब्द कृत्रिम किंवा बोजड वाटायची शक्यता असते.

अण्णा: ग्लोबलायझेशनचे परिणाम जगातल्या सर्व देश, भाषा, संस्कृतींवर गेल्या दहा वर्षात झपाट्याने झाले आणि ह्यापुढेही होतील. तरीही मातृभाषा जिवंत राहतातच. लहानपणापासून जे शब्दप्रयोग आपण ऐकतो ते थेट आपल्या स्मृतीकोषात जातात. उदाहरणार्थ रूखवत हा शब्द किंवा ऋत्विजांनी (ब्राम्हणांनी) म्हटलेले मंत्र - ह्यांचे अर्थ माहित नसतात पण आपल्या चालिरितीत आणि जीवनात ते मुरलेले आहेत. मातृभाषेच्या वापराचा अतिरेक असू शकतो. पण हा अभिनिवेश भाषेला मारक ठरू शकतो. स्टेशन हा शब्द दोन-तीन वर्षांच्या मुलाला कळतो पण ‘अग्नीरथ विश्राम स्थान’ हे कळणार नाही. सिग्नल पडला हे कळतं पण ‘अग्नीरथ गमनागमनदर्शक लोहपट्टीका’ हे सावरकरी मराठी कळत नाही. जे हिंदी, उर्दू, फारसी, इंग्रजी शब्द आपण घेतले, त्यांना दैनंदिन व्यवहारात स्वीकारले त्यांना पर्याय शोधणं कृत्रीम ठरतं.  भाषा हा जसा संस्कृतीचा ठेवा आहे त्याचप्रमाणे व्यवहार चटकन उरकण्याचं ते साधन आहे.

पण याला  दुसरी बाजूही आहे. आपला प्रभाव पाडण्यासाठी परभाषेचा अतिरिक्त वापर करणं हे ही व्यवहार्य नाही. डाॅ. बाळ फोंडके, जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे हे जेव्हा विज्ञान कथा लिहीतात तेव्हा वैज्ञानिक संज्ञांची वाचकांना ओळख करून देणं आणि त्या संज्ञा लेखनात वापरून त्या वाचकांच्या परिचयाच्या बनवणं हा मातृभाषेशी संपर्क साधण्याचा एक सेतू आहे - तो आवश्यकही आहे. जरूर तिथे भाषा सायन्सचा आधार घेते ह्यात काहीही गैर नाही. मात्र हल्ली बरेचसे वृत्तनिवेदक आणि पत्रकार लिंग, वचन, विभक्ती यांचा काहीही वापर न करता वृत्त देत असतात ते चुकीचं आहे. “जो व्यक्ती तिथे उभा होता” ह्या मराठीला काय अर्थ आहे? मराठी सुधारून घेणं हे वृत्तसंपादकांचं काम आहे जे महत्वाचं आहे कारण असं मराठी लोकांच्या कानावर पडायला नको.

 

प्रश्न ४:

प्रश्नकर्ती: मोहना जोगळेकर 

 

प्रश्न: माझा प्रश्न शुद्धलेखनाबद्दल आहे. आता याबद्दलचे नियम बदललेले आहेत त्याप्रमाणे लेखकांनी लिहायचं की आपापल्या काळात जे नियम होते त्यानुसारच लेखणी चालवत राहायची?

अण्णा: नव्या, सध्या व्यवहारात असलेल्या नियमांप्रमाणे लेखन करावं. उदाहरणार्थ आता अनुच्चारित अनुस्वार देणं बरोबर नाही. पूर्वी ‘काही’ हा शब्द ‘कांहीं’ असा लिहायचे. आता तसं चालणार नाही. जे शब्द विशिष्ट संस्कृतीतून आलेले असतात त्या बाबतीत प्रयोग चालत नाहीत. ‘बडा मझा आया’ इथे ‘मझा’ हा शब्द पुल्लींगी आहे पण मराठीमधे ‘मजा आली’ स्त्रीलिंगी आहे. विशेषत: अनुवादकाने ह्याबाबतीत लक्ष घालायला हवं. प्रत्येक भाषेला एक लेहरा असतो, शुध्दलेखनाचे नियम असतात ते पाळायलाच हवे. पण ही भाषा कोण बोलतंय हे ही लक्षात घ्यायला हवं. ‘मी चाय पिली’ हे कुठल्या समाजातली व्यक्ती बोलते त्याच्याशी ते सुसंगत ठरेल पण सुशिक्षीत माणसाच्या तोंडी ही भाषा शोभणार नाही.  

 

प्रश्न ५: 

प्रश्नकर्ते: उदयन आपटे 

प्रश्न: लिखाणासाठी लागणारी शिस्त कशी आणायची? विचार खूप असतो पण बैठक मारून लिहीण्याचा आणि ते पुनर्लेखन करण्याचा कंटाळा कसा घालवायचा?

अण्णा: बरोबर आहे प्रश्न! वाचनात जशी शिस्त आणायला लागते तशी लेखनातही शिस्त आणायला लागते. काही दिवस लेखनाची बैठक जमणार नाही पण तरीसुध्दा प्रयत्न सोडायचे नाहीत. मोठ्या मोठ्या लेखकांची उदाहरणं घे. पी. जी. वुडहाउस, अगाथा ख्रीस्ती, चार्ल्स डिकन्स...हे लेखक आजच्या भाषेत वर्काहाॅलिक म्हणतात तसे होते. एके काळी ना. सि. फडके आणि वि. स. खांडेकर त्यांच्या त्यांच्या लेखनिकांना रोज चार तास मजकूर सांगत असत. गंगाधर गाडगीळ हे बहुप्रसवा लेखक होते आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे नवे जीवन, नवे अनुभव आणि नवी भाषा ते सातत्याने लिहीत असत. आपले बाबुराव अर्नाळकर घे - त्यांनी जेव्हा त्यांची १०००वी कथा/पुस्तक प्रसिध्द केलं तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी त्यांना विधानसभेत बोलावून त्यांचा सत्कार केला होता. गुन्हेगारी कथा असल्या म्हणून काय झालं त्या मागची लेखनसाधना फार मोठी आहे. कला, खेळ, संशोधन, अगदी रोजीरोटीचा नोकरीधंदा...आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात ही स्वयंशिस्त असावीच लागते. ह्यादृष्टीने पाहिलं तर लेखनाचं काही वेगळं नाही.

आता पुनर्लेखनाबद्दल. प्रसिध्दीची निकड समजते परंतू घिसाडघाईने एखाद्या आकर्षक कल्पनेवरती लिहून मोकळे होणे हे त्या कल्पनेवर अन्याय करण्यासारखे होते. जे जेव्हा जसं सुचेल ते निगुतीनं कुठेतरी टिपून ठेवायला हवं.  एखादे दर्जेदार प्रकाशक जेव्हा सूचना करतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देउन काही भागाचं पुनर्लेखन करावं लागलं तरी ते करायला हवं. कुठे पुनरूक्ती झालेली असते, कुठे कथानकाचा एखादा धागा अपूर्ण राहिलेला असतो, कुठे एखादा भाग अजून विकसित करायला हवा असतो. आपल्या कलाकृतीचा दर्जा जास्तीतजास्त उंचावण्यासाठी लेखकाने हे परिश्रम घेतले पाहिजेत. वाचकांप्रत असलेली ती त्याची बांधिलकी आहे. कल्पना जितकी महत्वाची, आशयसंपन्न, बहुमिती असेल तिथे पुनर्लेखन अत्यावश्यक आहे.

 

प्रश्न ६:

प्रश्नकर्ते: मिलिंद केळकर 

प्रश्न: लेखनाला शिस्त लागते हे खरेच, पण लिहायला बसलं की अनेकदा प्रश्न पडतो, का लिहावं?😊

अण्णा: अत्यंतिक आंतरिक उर्मीने होतं ते खरं लेखन. उदाहरणार्थ, कवी हा मूळचा असावा लागतो. कविता त्याच्या मनामध्ये, बुध्दीमध्ये झिरपत असते आणि ती लिहून झाल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. तो आधी स्वत:साठी लिहीतो. नाटककार भवभूतीला असे टीकाकार भेटले की त्यांची टीका ऐकून तो वैतागला आणि म्हणाला ‘हे मी स्वान्त सुखाय लिहीतो. जानन्तु ते तान प्रति नैष यत्न: - हे मी तुमच्यासाठी लिहीत नाही.’ पुढे तो असं म्हणतो की ह्या पृथ्वीवर कधीतरी, कुठेतरी माझा समानधर्मा भेटेल त्यासाठी हे मी लिहीतो कारण काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे. 

अलेक्झांडर पोप आठव्या-दहाव्या वर्षापासून कविता लिहायला लागला. त्या वेळेला कविता लिहीणं म्हणजे भिकेचं लक्षण असा समज होता. त्यातून पैसा मिळत नव्हता. त्याच्या बापानं त्याला चारदा समजावलं की ह्या नादाला लागू नकोस. तरीही तो त्या नादात गुंतलेला असे. मग एक दिवस बापाने त्याला झोडून काढलं आणि त्याला म्हणाला,” यापुढे कविता करणार नाही अशी तू शपथ घे. त्या शिवाय माझं समाधान होणार नाही.” मग अलेक्झांडरने शपथ घेतली:

Father! Father! Mercy take,

Verses I shall never make!

आणि तेव्हापासून बापानंच त्या पोराचा नाद सोडला! तो कवी!

लेखक स्वत:साठी लिहीतो पण त्यात वाचकांचाही भाग असू शकतो. एकूण लेखनाचे उद्देश वेगवेगळे असू शकतात. माहिती देणे, मनोरंजन करणे, जन प्रबोधन करणे, जाणिवा विस्तारणे. ते लेखकाच्या अंतर्गत भूमिकेवर अवलंबून आहे. लेखकाने स्वत:साठी लिहीलं तरी ते वाचकांपर्यंत पोचावं अशी त्याची इच्छा असतेच. त्यासाठी प्रसार माध्यम लागतं. सध्याच्या जगात माध्यमंही पुष्कळ उपलब्ध झालेली आहेत. टीव्ही सिरीयल्समुळे लेखकांना व्यावसायिक होण्याची संधी मिळत आहे. हे माध्यम व्यावसायिकतेच्या दृष्टीने जबरदस्त आहे. पण ह्या तऱ्हेचं लेखन हे बऱ्याच प्रमाणात दिग्दर्शक / निर्मात्याच्या भूमिकेतून होतं, सर्वस्वी लेखकाच्या भूमिकेतून होत नाही. त्यांना जो प्रसंग हवा आहे तो उभा करणे एव्हढंच तिथे लेखकाचं काम असू शकतं. त्यामुळे अभिजात वाड.मय निर्मितीच्या पाठीशी लेखनाची आंतरिक उर्मी असायला हवी हे निश्चित!

प्रश्न ७: 

प्रश्नकर्ती: वैष्णवी अंदूरकर 

प्रश्न: वास्तव पहावं..जाणावं..समजून घ्यावं, कल्पनेचा विस्तार करत ते अधिक ठसठशीत करून वाचकाला देता यावं. पण वास्तवाला न धरणारा कल्पनाविस्तार..फॅन्टसीज..त्याचं काय? चमत्कृती, भयकथा, सायन्स फिक्शन? त्याबद्धलही सांगावं? लेखक कुठे असतो?बीज कुठे सापडतं?

अण्णा: फॅंटसी आपल्याला आपल्या जीवनात हवी असते. बालसाहित्यात फॅंटसी हा एक महत्वाचा साहित्यप्रकार आहे. भयकथा, सायन्स फिक्शन, चमत्कृतीपूर्ण कथा हे सगळे ‘रहस्यकथा’ ह्याचे पोटप्रकार आहेत. काही वेळेला आपल्या मनाला एक अनामिक हुरहुर लागलेली असते की कुठेतरी, काहीतरी विचित्र घडलेली असावी. अशी भावना आपल्या मनात प्रबळ होते आणि त्याचं शास्त्रीय समर्थन करता येत नाही. जसं वाटत असतं तसं घडतंही बऱ्याच वेळेला. त्यामुळे अशा विचित्र घटना ह्या प्रत्यक्ष जीवनाला जोडल्या जातात.

‘ऍलिस इन वंडरलॅंड’ काय आहे? ती फॅंटसीच आहे. लहान मुलं त्या कल्पनेच्या विश्वात रमून जातात. पुढे मग मोठे झाल्यावर, ज्ञान वाढल्यावर त्यांच्यापासून दूर जातात. ‘ओके. ठीक आहे. असंही घडतं’ असं म्हणून सोडून देतात. अधिक मंथन करत बसत नाहीत. पण कल्पनाशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने फॅंटसीची आवश्यकता आहे. ‘What happens if...’ अशा तऱ्हेच्या कल्पनाविस्ताराची लेखनामध्ये गरज असते. त्या कल्पनेशी तुम्ही चाळा करत बसलात म्हणजे त्या काल्पनिक व्यक्ती देह धारण करतात, त्यांचे स्वभावधर्म घडत जातात आणि ते त्या त्या प्रकारच्या साहित्याला पोषक असतं.

इथे मी हॅरी पाॅटरचं उदाहरण देइन. हॅरी पाॅटर मध्ये ज्या घटना वास्तवात घडणं अशक्य आहे अशा घटना घडतात. पण ते जादूचं विश्व आहे आणि जादू ही जादूच असायला हवी! तिथे सत्याचा, वास्तवतेचा आग्रह धरून चालत नाही. साहित्याच्या वृध्दीच्या दृष्टीनं आणि वाचकांच्या मागणीनुसार हे आवश्यक आहे. त्याच्यात कमी जास्त काही नाही. 

ब्रिटीश डिटेक्टिव्ह शेरलाॅक होम्सच्या कथा घ्या. इथे नव्या नव्या कल्पना वापरून वास्तव आणि कल्पनेची सांगड घातली आहे. डिटेक्टिव्ह कादंबरीमध्ये कोड्याचं उत्तर लेखकाला अगोदर मिळून जातं आणि त्याचा तो चतुराईने उपयोग करतो. 

शेवटी काय आहे, प्रखर वास्तव विश्व आणि जादूभरलं संपूर्ण काल्पनिक जग ह्या दोन टोकांमध्ये असलेलं जीवन आणि त्यातल्या कथा लेखक सांगत असतो.

प्रश्न ८:

प्रश्नकर्ती: प्राजक्ता पाडगांवकर 

प्रश्न: मराठीत अनेक फॉरमॅट आणि संकल्पना आहेत ज्यांचा म्हणावा तितका वापर झालेला नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास, मला वेगाने होणारे हवामानातील बदल (climate change) ह्यावर केवळ माहितीपर नाही तर काल्पनिक, ललित असे काही लेखन वाचायला आवडेल, किंवा मला धार्मिक नाही मात्र नव्या पिढीला सोप्पे पडेल समजण्यास असे अध्यात्मिक आणि त्या अनुषंगाने भावनिक बदल करण्यास उद्युक्त करणारे लेखन वाचायला आवडेल. हे सगळे मला इंग्रजी साहित्यात सहज उपलब्ध आहे, मराठीत त्याचे अनुवाद आहेत मात्र मूळ साहित्यनिर्मिती होताना दिसत नाही, असे का असावे? आपण मराठी लेखक केवळ एखाद्या कालखंडात अडकून पडलो आहोत का? चिकन सूप सारखे लेखन, नोट्स टू मायसेल्फ/इच अदर सारखे स्फुट लेखन अशा बाजातले लेखन मराठीत लोकप्रिय व्हायला हवे असे तुम्हाला वाटते का?

अण्णा: कित्येक विषय इंग्रजी साहित्यामध्ये अतिशय सामर्थ्याने येतात. तितक्या विषयांना आमचे लोक अजून भिडलेले नाहीत. त्याचं कारण असं की निरनिराळ्या व्यवसायांचा अभ्यास असलेले किंवा ते व्यवसाय प्रत्यक्ष केलेले लोक जेव्हा आपले अनुभव घेउन साहित्यामध्ये येतील त्यावेळेला ते साहित्य सर्वांग परिपुष्ट असं होइल. तसं अजून झालेलं नाही. श्री. म. माट्यांच्या काळात तर माटे असं म्हणालेले होते की आमच्या साहित्याला खडूचा वास येतो! कारण त्या वेळेला असलेल्या साहित्यीकांपैकी ऐंशी टक्के लेखक पेशाने शिक्षक होते म्हणून त्यांच्या लेखनाला खडूचा वास येतो. हे माट्यांचं निरीक्षण बरोबर होतं. पण आता परिस्थिती थोडी बदललेली आहे. आता आपण खडूच्या वासाच्या पुष्कळ पलिकडे गेलेलो आहोत. पण तरी असे कित्येक व्यवसाय दिसतात की ज्यातलं कुणी साहित्यात उतरलं नाही. पशू, पक्षी, जंगलं, सागर, पर्यावरण या विषयींचा आमचा अभ्यास अजून खूप कमी पडतो. आम्ही यांबद्दल जे लिहीतो ते प्रत्यक्ष अनुभव न घेता बाळबोध लिहीतो. तळापर्यंत आम्ही जात नाही. ही गोष्ट जरूर बदलायला हवी आणि त्याची सुरूवात झाली आहे.

आता हा प्रश्न घेऊ: मराठी लेखक एकाद्या कालखंडात अडकून पडला आहे का? माझ्या मते नाही. मराठीमध्ये तंत्राचा जुना साचा मोडणारे, नव्या काळाप्रमाणे नवा साचा घडवणारे अनेक लेखक होउन गेले, सध्या आहेत आणि भविष्यात होतच राहतील. विजय तेंडुलकरांचं ‘कोवळी उन्हे’ अशासारखं सदर आपण वाचलं तर त्या माणसानं कितीतरी विषयांचा नितळ स्पर्श अनुभवलाय आणि तो मांडलाय हे कळतं. आपल्याकडे लघुनिबंध हा अक संपन्न प्रकार आहे. ज्याला आपण पर्सनल एस्सेज म्हणतो तशा तऱ्हेचे ललित लेख लिहीले गेलेले आहेत.

 

दुर्गा भागवतांनी निसर्गात घडणाऱ्या बदलांचं बारकाईनं निरीक्षण केलं आणि त्यातून ‘ऋतूचक्र’ निर्माण झालं. इरावती कर्वे जीवनाच्या तळाशी जाउन चिंतन करतात. त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना स्वत:चं जीवन जगताना मिळतात. त्याचं लेखन तंत्र, चौकटी मोडून पलीकडे जाणारं आहे. आणि तरीही ते उत्कृष्ट साहित्य आहे कारण त्याचा आशय अतिशय समृध्द आहे. अनिल अवचटांनी लेखनाद्वारे समाजातील नानाविध प्रश्न मांडले. दि. बा. मोकाशींचं ‘अठरा लक्ष पावलं’ आपल्याला पंढरीच्या वाटेवर घेउन जातं, तिथे प्रत्यक्ष उभं असल्याचा अनुभव देतं. विष्णूभट्ट गोडसेंचा ‘माझा प्रवास’ हे केवळ प्रवासवर्णन नाही तो १८५७च्या बंडाचा ‘आॅंखो देखा हाल’, एक जिताजागता इतिहास आहे. ‘स्वामी’ने ऐतिहासिक कादंबरीला ललित गद्द्यात आणलं, इतिहासाला जिवंत केलं. कणेकरांचं ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’ किंवा दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’, नेमाडेंची ‘कोसला’ - ह्या पुस्तकांनी आपापले वेगळे साचे निर्माण केले आहेत. निराळ्या वाटांनी जाणारं लेखन बऱ्याच लोकांनी केलेलं आहे. 

प्रश्न क्र. ९

प्रश्नकर्ती: शिल्पा केळकर 

 

प्रश्न: लिहितात बरेचजण. अलिकडे तर सगळेच. पण लिहिणाऱ्याचा लेखक कधी होतो? असं लिहून-लिहून सरावानं लेखक बनता येतं का? मान्य आहे की श्रेष्ठ माणसं साधना-तपस्या करतात, धडपडतात तेंव्हाच आभाळाला गवसणी घालू शकतात. पण कितीही धडपड केली तरी खरंच काही उपजत प्रतिभा असल्याशिवाय सामान्य लिहिणारा लेखक बनू शकतो का?(आणि यशस्वी लेखक बनला याचा निकष निव्वळ सर्वमान्य होणे, प्रसिद्धी मिळणेअसे मी गृहीत धरत नाहीये, तर असे लेखन लिहिण्याची क्षमता असलेला लेखक, की जे वाचताना वाचकाचे मन त्यातल्या प्रतिभेच्या उजेडाने उजळून निघते.)

उपप्रश्न:   मुळात लेखक कुणाला म्हणावं? त्याची काही एखादी ठराविक व्याख्या आहे का?

अण्णा: दोन्ही प्रश्न चांगले आहेत. विशेषत: हा उपप्रश्न  लेखकाच्या मनाला भिडेल आणि प्रत्येक लेखक असा विचार करील की मी लेखक आहे असं स्वत:ला म्हणवतो तर खरंच मी लेखक आहे का?

विठ्ठल कामत हे पहिलं उदाहरण. विठ्ठल कामत हे लेखक नव्हेत. त्यांचं शिक्षणही बेताचं आहे. हाॅटेलं उघडण्याच्या नादामध्ये ते सतत फिरत असतात. कामाची जोडणी करत असतात. त्यांचं त्यांच्या व्यवसायावर प्रेम आहे. घरातल्या लोकांनी, सख्ख्या भावंडांनीसुध्दा त्यांना फसवलं. जे स्वत:चं म्हणून त्यांनी उभं केलं होतं ते हाॅटेलही लोकांनी गिळंगृत केलं. हा मनुष्य आपले जिवंत अनुभव सांगण्यासाठी लेखनात उतरला. त्यावेळेला त्यांना ही जाणीवही नव्हती की आपण काही टोकाचं लिहीत आहोत आणि हे लेखन वाचून लोक सजग होतील, स्वत:कडे आणि आपल्या भोवतालच्या लोकांकडे बारकाईने पाहतील, आपण कुणाला बुडवलं का आणि आपल्याला कुणी बुडवलं, त्यात त्याची हुषारी जास्त होती की आपला बावळटपणा जास्त होता असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असतील. जेव्हा विठ्ठल कामतांनी त्यांचे विलक्षण अनुभव साध्यासुध्या भाषेत मांडले त्या वेळेला ते वाचनीय जरूर ठरले. ही लेखक बनण्याची पहिली पायरी आहे की तुम्ही जे सांगता आहात ते नवीन असेल तर आपोआप वाचक त्सात ओढला जातो.

परंतु त्याला ‘लेखक’ कधी म्हटलं जातं? किंवा तो लेखक म्हणून कसा ठरतो? तर ज्यावेळेला तो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये शिरतो आणि त्यातही विशेष असं काही त्याच्या हाती लागतं, तो त्याचं आत्मीयतेने कथन करतो त्यावेळेला लेखक बनण्याची त्याची प्रक्रीया चालू होते. ह्याचं एक मोठं उदाहरण मी सांगतो. 

रणजित देसाईंनी मला त्यांच्या कोवाडच्या घरी बोलावलं होतं तेव्हा आम्ही ह्या संदर्भातच बोलत होतो. ‘स्वामी’च्या निर्मीतीबद्दल ते असं म्हणत होते की,”मी एक इंग्रजी अवतरण वाचलं की पानीपतच्या युध्दात जितकं नुकसान झालं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान माधवराव पेशवे अल्पायुषी ठरले ह्यामुळे पेशवाईचं झालं. हे वाक्य मी वाचलं आणि माधवराव ह्या व्यक्तीरेखेबद्दल माझ्या मनात कुतुहल निर्माण झालं. मग मी ह्या विषयाचा ध्यासच घेतला. चिंतन करताना असं वाटलं की हे पेशवे - राजे असले तरी त्या राज्याचे उपभोगशून्य ‘स्वामी’ आहेत. त्यांनी जे राज्य मिळवायचं, वाढवायचं, सांभाळायचं ते लोकांसाठी. ही मूळ कल्पना मनात आल्यावर मी त्या दृष्टीनं माधवरावांचं आयुष्य तपासून पाहिलं. त्यात मला त्यांच्या आयुष्यातले अनेक चढ-उतार दिसले. त्यांच्या शरिरात प्रवेश केलेल्या दुर्धर रोगाशी झगडत असताना ह्या माणसानं आपल्या स्वराज्याच्या शत्रूंचाही बंदोबस्त केला. पण तरी जिथे त्यांच्या पत्नीचा संदर्भ येतो तिथे मला हळूवारपणा जाणवला. पती-पत्नीचा सहवास, त्यांचं निकट अस्तित्व ह्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेलं नातं मला केवढं गहिरं वाटलं. आणि म्हणून माधव आणि रमा यांच्यामधले संवाद लोकांना चटका देउन गेले.”

‘स्वामी’ कादंबरी ऐतिहासिक कादंबऱ्यांचा मानदंड ठरली. त्याचं मुख्य कारण म्हणजे (वर सांगितल्याप्रमाणे) त्या कादंबरीच्या आशयाने लेखकाच्या मनाची पकड घेतलेली होती. जेव्हा असा पकड घेणारा आशय असलेला प्रसंग, कथा तुम्ही सांगता तेव्हा तुम्ही लेखक आहात की नाही ह्याची चिंता तुम्ही करायची नसते. वाचकाला ते थेट भिडतं आणि लेखकपणाची पुढची पायरी तुम्ही चढलेले असता.

पण दुर्दैवानं हे खरं आहे की कित्येक लेखकू स्वत:ला लेखक मानतात. त्यांना असं वाटतं की जो मजकूर लिहीतो तो लेखक. ते खरं नसतं. लेखक एखादा असतो, लेखकू शंभर असतात. आता प्रश्न काय आहे - लिहून लिहून लेखक होईल का? तर इथे मी मारूतीच्या एका गोष्टीची आठवण करून देईन. स्वत:ची ओळख पटवण्यासाठी सीतेनं आपल्या गळ्यातली माळ मारूतीला दिली. त्यातला एकेक मणी चावून तो थुंकत होता कारण त्याला त्याच्यात ‘राम’ आढळत नव्हता! तो हार जरी सीतेचा होता तरी त्याला त्याच्यात राम जाणवला नाही. तेव्हा आशय तुम्ही स्वत:च्या मनाला सांगून पहा, त्याच्यात तुम्हाला ‘राम’ आढळला, काही चित्तत्व (चैतन्य) आढळलं, काही लोकविलक्षण अनुभव आढळला, काही ‘हे मला सांगितलंच पाहिजे’ अशा तऱ्हेची उर्जा देणारं जर तुम्हाला सापडलं तर ते लिहीत असताना तुम्ही आपोआप लेखक बनत जाता.

लेखक होणं हे शिक्षणावर अवलंबून नाही किंवा संस्कारांच्यावरतीही अवलंबून नाही. ती आंतरिक तळमळ असते ज्यातून लेखक तयार होऊ शकतो. ‘हे मला सांगितलेच पाहिजे, I must!’ असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्या वेळेला तो आशय लिहून मोकळं करण्याच्या लायकीचा असतो. लेखक तिथे दिसतो.

 

प्रश्न क्र. १०

प्रश्नकर्ती: वैभवी घाणेकर 

 

प्रश्न: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि वय या नुसार त्याला आवडणारी पुस्तकं बदलत जातात.पण अशी कोणती पुस्तकं/विषय/लेखक असतात की ते सगळ्यांना सगळ्या काळात आवडतात?असल्यास त्याच कारण काय? (ऐतिहासिक कादंबऱ्या बहुतांश लोकांना कोणत्याही वयात वाचायला आवडत असतील.)

उपप्रश्न:  मग ज्याला आपण ‘क्लासिक्स’ म्हणतो अशा साहित्याचे कोणते असे गुणधर्म असतात की ज्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभतं? उदाहरणार्थ पुलंचं साहित्य गेली पन्नास-साठ वर्षं टिकून आहे. अर्थात त्याला नव्या दृक्-श्राव्य माध्यमांचं पाठबळही मिळालेलं आहे. पण विनोदी साहित्य जास्तकाळ टिकू शकतं का?

अण्णा:  इतिहासावर, भूतकाळावर माणसाचं प्रेम असतं. त्याला आपल्या संस्कृतीचा अभिमानही वाटत असतो. त्यामुळे इतिहासाच्या संदर्भात लिहीलेली पुस्तकं लोकप्रिय ठरतात. फक्त एकच असतं की परिणामकारकतेच्या नावाखाली इतिहासामध्ये काहीही असत्य लिहीण्याचा अधिकार लेखकाला नाही. इतिहासाशी कोणी खेळू नये. इतिहास हा प्रामाणिक, स्वत:च्या बुध्दीला जसा उमगला तसा लिहावा. ह्या साहित्यप्रकाराला नेहमी खूप वाचक मिळतात.

धार्मिक, अध्यात्मिक, संत साहित्य शतकानुशतकं टिकलेलं आहे आणि पुढेही टिकेल. पण ह्या विषयाची आवड लहान मुलांना कशी असणार? त्यामुळे सगळ्यांना सर्वकाळ आवडेल असं काही साहित्य असेल असं मला वाटत नाही. मनाच्या आणि शरिराच्या अवस्थांमध्ये काही विषय हे अधिक आवडतात. प्रेम हा विषय असा आहे की तो कुमार/किशोर वयापासून त्याची चाहूल लागल्यापासून मध्यवयापर्यंत आकर्षक वाटतो. त्याच्यापुढं जीवनासंबंधी सांगणारं विशेष असं जर काही असेल तर ते भावतं. वाचक आपल्या अनुभवांच्या दृष्टीने ते तपासून पाहतो. जीवनाच्या महापुरात उडी घेतलेल्या माणसाला पौगंडावस्थेमध्ये जे साहित्य आवडेल ते आवडणार नाही. तसंच  ‘लागले नेत्र रे पैलतिरी’ अशी जेव्हा माणसाची अवस्था होते तेव्हा तारूण्यातली नवथर प्रीतीची जाणीव किंवा बालसाहित्य हे विषय त्याला कसे आवडतील?

 

चाळीचं जीवन मुंबईतून आता संपत आलं. परंतू माणूस कुठे बदलला? पुलंनी जिथे जिथे जिवंत माणसाचं चित्रण केलेलं आहे तिथे ती व्यक्ती उभी राहिलेली आहे. मग ती चाळीत राहो, अपार्टमेंटमध्ये राहो अथवा स्वत:च्या बंगल्यात राहो. तेव्हा नश्वर अशा जीवनाचं चित्रण करतानासुध्दा आपण शाश्वत म्हणजे नेमकं काय हे ठरवायला लागतं. 

माणसाला विनोद प्रिय असतो. माणसाला दुसऱ्याच्या बाबतीत जर दोष दाखवला तर तो आवडतो. त्याच्या स्वत:च्या बाबतीत जर कुणी लिहीलं तर त्याला मानभंग झाल्यासारखं वाटतं. तेव्हा माणूस लुच्चा आहे, लबाड आहे, व्यवहारी आहे, धोरणी आहे, कुटुंबवत्सल आहे - आणि हे सगळं पुलंनी बरोब्बर हेरलंय. त्यामुळे चाळ जरी नाहिशी झाली तरी चाळकरी अस्तित्वात आहेतच! म्हणूनच त्यांचं साहित्य अजून टिकून आहे.

 

------------

 

अण्णांची प्रतिक्रिया:

रसिक पृच्छक हो! ज्या उत्साहाने आणि कळकळीने तुम्ही मराठी साहित्य विषयक प्रश्न विचारले त्याबद्दल मला तुमचं खास अभिनंदन करावंसं वाटतं! मातृभाषा मराठी असलेल्या महाराष्ट्रात वाचनप्रेम कमी होत चाललं आहे. जे वाचतात ते खोल विचार करत नाहीत. लेखक-वाचक भेटी कमी होत चालल्या आहेत. जेव्हा ह्या भेटी होतात तेव्हा लेखकाला बघणे-ऐकणे हा भाग जास्त आणि विचारणे हा भाग कमी असतो. तुम्ही जसं तळामध्ये जाऊन निर्मितीच्या संदर्भात प्रश्न विचारले तसे प्रश्न इथे सहसा विचारले जात नाहीत. ह्याचा मला अतिशय खेद वाटतो.

तुमचा मातृभाषा हा काही पोटापाण्याचा व्यवसाय नाही. तुम्ही भाषेतले लेखक-प्राध्यापक नाही. तुमच्यातले काही तर परगावात, परदेशात राहतात. म्हणजे ‘मराठी भाषा’ ह्या प्रश्नाशी तुमचा संबंध फार कमी येतो. असं असून तुम्ही रसिकतेनं वाचता, जे वाचता त्यावर विचार करता आणि अशी संधी तुम्हाला मिळाली तर धार्ष्ट्याने तुम्ही लेखकाला प्रश्नही विचारता हे सगळं मला गहिरं वाटलं. 

तुमच्यासारखे वाचक मिळाले तर खरंच लेखकाला पुन्हा एकदा नीट विचार करायला लागेल आणि त्याची कलाकृती बारगळत कुठेतरी जाणार नाही. तेव्हा तुम्ही वाचक तर आहातच पण तुम्ही परीक्षक आहात आणि पहारेकरी आहात असंही माझ्या लक्षात आलं! म्हणून तुमचे खास आभार!