मो ग रा 

 

कवी: अमृता हर्डीकर 

छायाचित्र: मिलिंद केळकर 

परदेशातल्या मातीत, मायमातीचे सुवास
उगवण्याचा तुझा अट्टाहास.
म्हणून,
मोगऱ्याचे कटिंग तू मिळवलेस कुठूनतरी.
बोटं तुझी हिरवी
फुटले त्यालाही पोपटी कोंब.
खिडकीच्या काचेआडून
न्याहाळलंत इथलं निरभ्र आकाश.
तुझ्या विरह श्वासांना
त्याची दुबळी साथ.


पण तुला कळलं होतं का?
तुला दिसली होती का?
त्या कुंडीत त्या कटिंगलाही
यायला लागली होती मुळं ..
दीड दोन फुटी वाढला होता तो मोगरवेल.
थोड्या ऋतूंचा अवकाश,
इथल्या गंधात मिसळला असता
मायमातीचा वास.


पण ही शक्यताच होती एक,
शाश्वत असं कुणालाच सांगता येणार नाही गं.
तू घराला कुलूप लावून माघारी परतलीस
अबोला धरून.
स्वतः भवती विळोखे घालून
तृष्णेने व्याकुळ,
तो बाहेर मला भेटला.


तो रुजला,
ह्यात त्याचं काय चुकलं,
हे कळतंच नव्हतं त्याला.

अमृता हर्डीकर 

वाचनाची आणि लिहिण्याची मला मनापासून आवड आहे.  आंतरिक संक्रमण, पालकत्व, व्यक्तिचित्र,    देशांतराचे  अनुभव, अशा काही विषयांवर मला लिहायला आवडतं.  नियमित किंवा शिस्तबद्ध लिहणं मला जमत नाही. माम्बोवर नियमित वेगवेग्ळ्या विषयावर लिहीणाऱ्या लेखकांमुळे, गजर वाजल्यासारखी सतत मनात ही जाणीव जिवंत राहते, प्रेरणा मिळते. यंदाच्या दिवाळीत, सुख समृद्धी बरोबरच आपल्या मानसीक, सामाजिक, आणि वैचारिक कक्षा  समृद्ध करणारं लेखन आपल्या सगळ्यांना वाचायला, उपभोगायला मिळो, ह्याच माझ्या शुभेच्छा आणि सदिच्छा!