अं दा ज  नि  अ व धा न 

 

अमृता देशपांडे

न अंदाज कुठले, न अवधान काही,
कुठे जायचे यायचे भान नाही!
जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा,
न कुठले नकाशे ना अनुमान काही!

वरील ओळींप्रमाणे अगदी तंतोतंत असाच प्रवास माझा. न ठरवता, अवचित घडलेला. कोल्हापूरहून निघाले. एका छोट्याशा 'स्कूटी'वर बसून. जवळ ना कुठला 'जीपीएस', ना कुठले प्रवासाचे आराखडे, थेट अमेरिकेत येऊन पोहोचले.  वाटेत अनेक थांबे आले, अनपेक्षित वळणं आली. कधी वाटलं आपला रस्ता चुकला असावा, माघारी परत फिरावं. पण ह्या प्रवासात 'यूटर्न' ची पाटीच नव्हती मुळी. बरं इथे पोहोचल्यानंतर मार्ग शोधण्यासाठी  'जीपीएस' मिळाला पण 'डेस्टिनेशन' मात्र काही अजून सापडलं नाही. किंवा कदाचित ते शोधायचंच नाहीए. लग्नापूर्वी नवरा शिक्षणासाठी अमेरिकेत आला, लग्नानंतर मीही त्याच्या मागून  इथे येऊन शिक्षण केलं. एखाद्या 'हाय- वे' वरून प्रवास करताना आवडत्या अशा धाब्यावर नियमित थांबावं तसं लग्न, शिक्षण, नोकरी, मूल, घर ह्या सर्व ठरलेल्या ठिकाणांवर स्थिरावलो. मग तरीही हा प्रवास अपुरा का वाटतो?

फर्स्ट इयरला असताना वडील कॅन्सरने गेले. लहान भाऊ इंजिनीअरिंगला शिकत होता. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आईला व भावाला सोडून परदेशातच काय तर साधं पुण्या-मुंबईला जायचीसुद्धा इच्छा आणि धाडस, दोन्ही नव्हतं. 'डाएटेटीक्सचं' शिक्षण घेऊन देखील कोल्हापुरातल्या कुठल्याशा कंपनीत कौन्सेलरची नोकरी करत मजेत दिवस जात होते. करिअर- नोकरी सगळं करावं  असं  मनात होतं  पण वडिलांच्या सोडून जाण्याने इतर कुटुंबापासून दूर जाण्याची कल्पनाच करवत नव्हती.

परदेशात जाण्याचं कधीच वेड नव्हतं. बाहेर जाऊन  राहावं, तिथे शिकावं, नोकरी करावी, पैसे कमावावे, स्वतंत्र जीवनशैली अनुभवावी असंही कधी नाही वाटलं. फारसं आकर्षण नसल्याने जेव्हा सर्व प्रथम अमेरिकेत आले तेव्हाही फार काही नवल वाटलं नाही. शिक्षणाची मात्र ओढ होती. चैतन्यच्या प्रोत्साहनाने पुढे शिक्षण घेण्याचे ठरले. तेव्हा अमेरिकेतल्या न्यू जर्सीत राहत होतो. नवरा मुंबईत वाढलेला, कॉन्वेंन्ट मध्ये शिकलेला. रडत न बसता कुठलंही काम मेहनतीने करायचं असं त्याचं धोरण. त्याने माझ्या आधी पाच वर्षे इथे येऊन शिक्षण व नोकरी केली होती. त्यामुळे तो इथे बराच रुळला होता. मीच हळवी, मुळूमुळू रडत बसणारी. मनातून कायम साशंक, सगळं सुरळीत चालू आहे ना? ह्याची सतत पडताळणी करून बघणारी.

साल २०११. अमेरीकेतील वास्तव्याची सुरुवात 

 

छोटाशा पण छानश्या भाड्याच्या घरात राहायचो. बरेच भारतीय राहायचे आजूबाजूला, नवऱ्याचा बराच मोठा  मित्रपरिवार होता. पहिली एक दोन वर्ष छान गेली. अमेरिकेत शिक्षणासाठी आल्याचा एक फायदा म्हणजे आपलीशी अशी माणसं शोधत वणवण फिरावं लागत नाही. मला इथल्या कॉलेजात शिक्षण घेताना 'विजा' व तत्सम अशा असंख्य अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मधल्या वेळेत गाडी शिकणे, नवऱ्याच्या जोडीने घरची बाहेरची कामं करणे, स्वयंपाक, मित्रमंडळ सांभाळणे ह्या सर्व जबाबदाऱ्या कसोशीने पार पाडण्याचा प्रयत्न चालू असे.

 

ही सगळी धडपड कशासाठी करायची? का राहायचं इथे? ह्या अनोळखी देशात? काय गरज आहे? नोकरीनिमित्ताने इथले भारतीय मित्र देखील अनेकदा स्थलांतर करतात, त्यामुळे जवळचे वाटणारे मित्रही कायमचे  नसतात. आपली रक्ताची माणसं सोडून ह्या परक्या देशात कुणासाठी बरं राहायचं? सुरवातीला ह्या व इतर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण उत्तर नाही सापडलं. हळूहळू ते शोधायचाही नाद सोडला. पुढे जाऊन आपोआप उत्तरं सापडत गेली. घरच्यांच्या आठवणींनी मात्र सारखं रडू यायचं. देश सोडल्याची अपराधी भावना कधीच आली नाही; पण ह्या निर्णयाचा ठामपणे स्वीकारही करवत नव्हता. सहजीवनासाठी इथे आले, मग एक एक गोष्ट आव्हान म्हणून स्वीकारू लागले.

अमेरिकेत माझ्या 'डाएटेटिक्स' ह्या शाखेत शिक्षण घेणारे माझ्या  माहितीत खूप कमी भारतीय विद्यार्थी होते, त्यांमुळे  सुरवातीचे दिवस कठीण गेले. पहिल्या सेमिस्टरला 'रजिस्टर्ड डाएटिशीयन' च्या समुपदेशकाला भेटायला गेले. ती नाही भेटली म्हणून शाखाप्रमुखांना भेटले, थोडी माहिती विचारली. ती कोरिअन होती- ती मला म्हणाली, "ह्या कोर्सला ऍडमिशन घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी कायम ऍडमिशन घेण्यापूर्वी दोनदा तरी विचार करण्यास सांगते. कारण कोर्सनंतर येणारी 'इनटर्नशीप' खूप कठिण व स्पर्धात्मक असते. मला वाईट वाटतं, जेव्हा परदेशी विद्यार्थी खूप सारा पैसा, वेळ आणि कष्ट लावूनही त्यांना  ह्या इनटर्नशीपला ऍडमिशन मिळत नाही. साधारण ४०% विद्यार्थीच ह्या प्रक्रियेत पुढे जातात." तिचा हा सल्ला ऐकताच मी घाबरले. मनाशी म्हटलं नाही जमणार मला. कोल्हापुरातल्या अतिसामान्य मध्यमवर्गीय घरातून चालू झालेला हा प्रवास, मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली, अगदीच सामान्य मी. इथे अमेरिकेतल्या स्पर्धेत काय टिकाव  लागणार माझा. आपण ह्यात पाय घालायलाच नको असं वाटलं क्षणभर.

'पण नाही, जिथवर जगण्याची किंचितशी सुद्धा शक्यता आहे तिथवर माणसाने हातपाय मारत किनारा शोधण्याचा प्रयत्न करावा.'

भारतातल्या शिक्षणात खूप चांगले गुण होते. चैतन्यने खूपच प्रोत्साहन व पाठिंबा दिला. सर्व बाजूंनी खंबीर साथ द्यायची तयारी दर्शवली. मी लगेचच ऍडमिशन घेतली. आजवरच्या आयुष्यात स्वत:च्या हातात नसलेली  अनेक आव्हानं पेलली होती; त्यात अजून एक भर. सुरू केलं शिक्षण.

भलं मोठं कॉलेज, माझ्या कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला आणि एस. एन. डी. टी.  ला एकत्र केलं तरीही त्याच्या दुप्पट जागा असेल. मोठमोठ्या इमारती, निरनिराळे विभाग, जिम, हॉटेल्स, कॅन्टिन...

शिक्षक व विद्यार्थी 'इंटरनेट'द्वारेच असाईनमेंट्स, गृहपाठ, सूचना इत्यादीसाठी संपर्क साधत. ह्या व इतर अनेक गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. प्रत्येक गोष्ट भीतभीत, नवर्‍याला अनुभव असल्याने त्याला विचारून करत होते. मी पहिल्या दिवशी वर्गात गेले तर एक साठीचे गृहस्थ प्राध्यापकाच्या जागी बसले होते. त्यांना बघून मजा वाटली. हसतमुख, उंच धिप्पाड, पांढरी शुभ्र दाढी. पाहताच क्षणी एक गोड आजोबा वाटावे तसे होते ते. वर्गात प्रथम एक- दोन विद्यार्थीच होते. हळूहळू ती संख्या वाढत साधारण पंचवीस विद्यार्थी जमले.

 

माझ्यासारखीच विविध प्रांतातली मुलं शिकण्यासाठी आली होती. वर्गही किती मोठा, मोठाले डिजीटल बोर्ड्स, कम्प्यूटर्स. माझ्या आजूबाजूला गोऱ्या, उंच अमेरिकन मुली येऊन बसल्या. न हसता, न बोलता, जणू मेणाच्या पुतळ्या. थोड्यावेळाने ओळख करून द्यायची वेळ आली, मनावर एक प्रकारचं दडपण आलं, छातीत धडधडू लागलं. बोलताना आपलं काही चुकलं तर? माझी वेळ येईपर्यंत पुन्हापुन्हा मनात काय बोलणार ह्याची घोकंपट्टी युरू होती. सौम्य आवाजात घाबरत घाबरत स्वत:ची ओळख करून दिली. सगळं एका दमात बोलून टाकलं एकदाचं. सर्वांनी खुल्या मनानं माझं स्वागत केलं. मग कपाळावरचा घाम पुसला. ह्या क्षणी हायसं वाटलं.  भारतातल्या आणि इथल्या वृत्तीतला एक मूलभूत फरक जाणवला.  स्वत:ची ओळख भारतात एखाद्या परकीयाने केली असती व बोलताना काही चुकलं असतं तर कदाचित, बाकी विद्यार्थ्यांनी टिंगल केली असती. खरं सांगायचं तर मीही केली असती. ह्याच वृत्ती मुळे बऱ्याचदा आपल्या  मनात असे छोटे मोठे  न्यूनगंड निर्माण होतात. 'लोक आपल्याला हसले तर?' ह्या एका विचाराने आपण भारतीय आधीच फार घाबरतो. भारताच्या तुलनेत अमेरिकेतली ही गोष्ट मात्र फारच वाखाणण्याजोगी आहे. जाहीरपणे कोणाची कधी निंदा केली जात नाही.

त्यानंतर मी स्टेजवर, लोकांसमोर बोलायला कधीच घाबरले नाही. वर्गात, प्रोफेसर्स असोत डॉक्टर्स असोत वा पेशंट्स, सर्वांसमोर समोर आत्मविश्वासाने अनेक प्रेझेंटेशन्स दिली. एक अनमोल गोष्ट शिकले व निभावली, ती म्हणजे, चूक झाली तर माफी मागता येते पण कृती करण्याचं धाडसं करावंच लागतं.

दरम्यान 'ऑॅन कॅम्पस जॉब' करण्याचं परमिट मिळालं. लायब्ररीत एक संधी होती, पण वेळ होती रात्री ११ ते सकाळी ७. हे काम शक्यतो मुलंच करायची. बाळबोध संस्कारात वाढलेली लग्न झालेली भारतीय बाई क्वचित करेल. ही नोकरी करण्यास चैतन्यने विरोध केला. पण मीही हट्टीच. मला संसाराचा सगळा भार त्याला एकट्याला द्यायचा नव्हता. त्याच्या विरोधाला न जुमानता मी ती नोकरी घेतली. एक आफ्रिकन अमेरिकन माणूस तिथे सुपरवायझर म्हणून असायचा. दिवसा तो एका जेलमध्ये जेलर म्हणून कामाला होता आणि रात्रीचा कॉलेजच्या लायब्ररीत काम करायचा. रात्रभर सिनेमे बघत बसायचा. मध्ये मध्ये वेड्या सारखा 'हाहा हाहा' करून मोठ्यांदा हसायचा. मी आपली अभ्यास करत बसायचे. मला मध्ये अर्धा तास ब्रेक मिळायचा. मी पटकन बेसमेंट मध्ये जाऊन अंगावर जॅकेट घेऊन जरा विश्रांती घ्यायचे. जानेवारीची थंडी; जर्सीतला स्नो. लायब्ररीत अभ्यासाला आलेली मुलं असायची. तरीही प्रचंड भीती वाटायची.

 

भारतात असताना कधीच रात्री जागायची किंवा अवेळी घराबाहेर पडायची सवय नव्हती. बारावीत बोर्डाचा अभ्यासदेखील पहाटे चारला उठून करायचे. त्यामुळे अर्ध्या तासाच्यावर बेसमेंटमध्ये ब्रेकसाठी बसायची देखील भिती वाटायची.  ह्या भितीचं प्रदर्शन कधीच नवऱ्याजवळ नाही केलं. कायम उत्तम चाललंय, हेच उत्तर! दिवसभर कॉलेज असायचं. संध्याकाळी थकून जायचे. झोपायचे. उठायचे परत कामावर. चैतन्य चांगलं कमवायचा. तरीही मी हट्टी; वडिलांवर गेलेले. चैतन्यला नाही सहन व्हायचं. एक दिवस त्याने सरळ तो जॉब सोडायचाच असं बजावलं.

कोर्सनंतर त्या स्पर्धात्मक इंटर्नशिपसाठी, दीडशे विद्यार्थ्यांपैकी बारा जण निवडले गेले. त्यात माझी निवड झाली. नऊ महिन्यांची इंटर्नशि
प खरंच खूप खडतर होती. त्यानंतर चार महिने अभ्यास केला व परीक्षा देऊन नोंदणीकृत आहारतज्ज्ञ (रजिस्टर्ड डाएटिशीयन) झाले.  

ह्या सर्व प्रवासादरम्यान आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव नवे काही शिकवून जात होता. हरऐक दिवस मनोबळ वाढवत होता. अमेरिकेत शिक्षण व संसार करताना विचारसरणीत अनेक बदल घडले. शिक्षणानंतर मुलगी झाली मग नोकरी चालू झाली.

पदवीदान समारंभ.

 

अमेरिकेत येण्यामागे व इथे राहण्यामागे प्रत्येक भारतीयाचा हेतू निरनिराळा असतो. त्यामुळे साधारणत: माझ्या बाबतीत बोलायचं तर इथे येण्याच्या संधीचा उपयोग मी वैयक्तीक वैचारिक सुधारणा करण्यासाठी केला. सुरवातीपासूनच अमेरिकन संस्कृतीमधल्या काही गोष्टी आवडल्या होत्या. इथली शिस्तबद्धता, स्वच्छता, स्वावलंबन. भारतातही वेळ पळण्याबाबतीत मी अतिशय काटेकोर होते, त्यात भर पडली. बाकी आपले भारतीय संस्कार, माणसे जपणे, मोठ्यांचा आदर करणे ह्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाची बाब जाणवली, ती म्हणजे अमेरिकेत येऊन मी 'ग्रॅटिट्यूड' शिकले. मी स्वत: दुसऱ्यांचा आदर करू लागले. अहंकार नाहीसा झाला. कुणाचं मन दुखावलं जाऊ नये, आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये ह्याचा जागरूकपणे  विचार करू लागले. स्वत:च्या पलीकडे जाऊन इतरांचा विचार करण्याची क्षमता वाढली.

अर्थात सगळं परफेक्ट तर कुठेही नसतंच. नवऱ्याचा व माझ्या अंगात पक्कं सारस्वती रक्त. त्यामुळे सख्खे नातलग सोडले तर एकाच गोष्टीची उणीव भासते ती म्हणजे; मळलेल्या भय्याच्या हातची पाणीपुरी, अस्सल तंदुरी कबाब, गावोगावी मिळणारा बटाटा वडा- मिसळ आणि खाऱ्या पाण्यातले ताजे व सुके मासे. बरं ह्या सर्वाचा अर्थ असा नव्हे की इथले अनेकांकडून ऐकलेले, पाश्चिमात्य पदार्थ  बेचव असतात. एक दोन अमेरिकन नागरिक मित्रांना तांबडा रस्सा खायला घातला तसंच त्यांचं कमी मसाले वापरून तरीही रुचकर असणारं जेवण झटकन आपलंसं केलं.

सुरवातीच्या काळात आणि आत्ताही थोडी त्रास होतो तो इथली सामाजिक संस्कृती आत्मसात करताना. इथले खेळ, राजकारण, इतिहास, साहित्य या विषयांत फारसा रस अजून तरी निर्माण नाही झाला. त्याबाबतीत भारतीय गोष्टीच जास्त जवळच्या वाटतात.

आम्ही चौघे: आभा, मी, चैतन्य आणि विभव 

 

काही इथलं स्वीकारत, काही तिथलं मनात खोलवर रुजलेलं जपत हा प्रवास असाच चालू आहे. येणार्‍या प्रत्येक थांब्यावर काहीतरी मिळवून देणार्‍या, बदल घडवणार्‍या तर काही वेळा आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न करणार्‍या  प्रवासाकडे मागे वळून पाहिलं की सुरुवातीच्या ओळींमध्ये किंचित बदल करावासा वाटतो,

अंदाज येत गेले, सोबत अवधानही,
कुठे जायचे, याचे आकलनही!
संधी आणि अथक प्रयत्नांची कास
सुगंधी करते आमच्या आयुष्याची वाट!

अमृता देशपांडे

मूळची कोल्हापूरची, अमेरिकेत २०११ सालापासून वास्तव्य आहे. सध्या पिट्सबर्ग येथे नोंदणीकृत आहारतज्ज्ञ (रजिस्टर्ड डाएटिशीयन) म्हणून काम करते. जरी अमेरिकेत वास्तव्य असले तरी मन कोल्हापूरच्या गल्ल्यामंध्ये फिरत राहतं. दोन मुले आणि नवरा अश्या संसारातून अधून मधून जसा वेळ मिळेल तसे मामाबोवर लिखाण करत राहते.