न म्म   को ई म्ब तू र

 

अमृता हमीने

'नम्म कोईम्बतूर'म्हणजे 'आमचं कोईम्बतूर'. श्रीमंत माणसांचं साधं शहर. हे शहर मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जातं ते येथील कॉटनच्या व्यापारामुळे. यजमानांच्या नौकरी निमित्त इथे आठ वर्षे राहण्याचा योग आला आणि कधी या परकं वाटणाऱ्या शहरावर जीव जडला ते कळलेच नाही.

 

२०१२ मध्ये जेव्हा तिथे पहिले पाऊल ठेवले तेव्हा डोळ्याला नुसत्या धारा लागलेल्या होत्या. त्यापूर्वी आपल्या लोकांपासून इतक्या दूर मला कधीच राहावे लागले नाही त्यामुळे असेल कदाचित. एकदम वेगळा प्रदेश, भाषा वेगळी, लोकं वेगळी, वातावरणात एकदम तफावत, त्यामुळे सुरवातीला जुळवून घ्यायला खूप कठीण गेलं. त्यावेळेस परदेशात राहणाऱ्या सगळ्या भारतीयांचे मला खूप कौतुक वाटायचे. इथे देशाच्या दुसऱ्या भागातच इतके परके वाटते, कसे काय बुवा लोक परदेशात राहतात असे राहून राहून वाटायचे.

 

दोन वर्षात महाराष्ट्रात परत जायचे त्यामुळे भाषा बिषा शिकायच्या फंदात पडायचे नाही हे मी ठरवून टाकले होते. कोईम्बतूरला जाण्यापूर्वी आम्ही दहा वर्षे नागपुरात होतो. नागपूरला बारा महिने लख्ख प्रकाश आणि कोईम्बतुरला केव्हाही आभाळ दाटलेले असायचे. ते दाटलेले आभाळ पाहिले की मला वाटायचे मला अंधारी येतेय आणि मी घाबरीघुबरी व्हायचे. हा त्रास मला सुरवातीला सात आठ महिने झाला. हळू हळू मनाला समजावले आता सवय व्हायलाच पाहिजे. मग पुन्हा आपल्या परदेशी बांधवांची हिम्मत आठवायची आणि पुढे चालायचे असे चालू होते. मला जाणवलं, इथली बोली भाषा आली पाहिजे तरच परकेपणा कमी होईल. त्यासाठी अगदी जुजबी संभाषण शिकवणारी काही पुस्तकं आणली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

 

खरी भाषा शिकवली ती कामवाल्या बायकांनीच. तिथे सुरवातीला जी कामवाली अम्मा होती ती एकदम पासष्ट वर्षाची आजीबाई होती. मध्यम बांधा,रंग सावळा, पांढऱ्या केसांचा अंबाडा आणि अगदी आई, आजी नेसतात तशा सुंदर कॉटनच्या साड्या नेसून ती अम्मा कामाला यायची, प्रेमळही आई आजी सारखीच होती. घरात आल्याबरोबर 'कण्णा ' म्हणून आवाज द्यायची. कण्ण  म्हणजे 'डोळा'.  बाळकृष्णाचे डोळे विलोभनीय होते त्यामुळे 'कण्णा ' हे कृष्णाचे नाव आहे. तर पुढे ते आपण 'बाळा' म्हणतो तसे रूढ झाले आहे. ही अम्मा आल्यापासून जाईपर्यंत अखंड बडबड करायची. मला काहीही समजत नाही माहीत असूनही अम्माची टकळी सुरूच असायची. आमचे अहो मला म्हणायचे "अगं तिला सांगत का नाहीस की बाई तू जे बोलते ते मला काहीही कळत नाही". मी म्हणायचे, 'अरे हे तरी कुठे बोलता येतं मला'. म्हणजे इतकी फजिती होती. पण अम्मानी हार मानली नाही ती बोलत राहिली. अम्मा गेल्यावर मी तामिळ टू हिंदी पुस्तक उघडून बसायची. काही यातले शब्द ती बोलली असेल तर काहीतरी संदर्भ लागेल या आशेने मी पुस्तक चाळायची पण उपयोग शून्य. भाषा शिकताना शब्द समजायला म्हणण्यापेक्षा संवाद घडायला बॉडी लँग्वेज किती महत्वाची असते हे तेव्हा कळले. कितीतरी शब्द हावभावावरून समजायचे. हळूहळू काही काही शब्द यायचे. सगळ्यात आधी शिकले 'तमिल तेरीयाद' - म्हणजे तामिळ येत नाही. म्हणजे समोरचा जरा समजून बोलायचा.

 

भाषेची एक गंमत सांगते. मी कोईम्बतुरला असताना आमचे आई बाबा आले होते तेव्हाची गंमत. आमचे बाबा अति उत्साही. सुरवातीला काही वर्षे भारतीय वायुदलात सेवेत होते त्यामुळे अनोळखी प्रदेश आपलासा करून घेणे, लोकांशी ओळख वाढवणे ह्यात त्यांचा हातखंडा. त्यामुळे तेही तामिळ भाषा शिकायचा प्रयत्न करायचे. तेव्हा सुरवातीला त्यांना एकच शब्द कळला. 'येन्न'. येन्न म्हणजे 'काय', पण हे बोलणार कोणाशी तर आमचे बाबा कामवाली आली की तिला विचारायचे 'येन्न आनंदी', म्हणजे आपण कसे काय आहात विचारतो तसे. एकदा चिरंजीवांनी ऐकले आणि बाबांना चिडवले "काय बाबा तुम्ही आनंदीला येन्न (ये नं) म्हणता या वयात"? आम्ही सगळे खूप हसलो, दुसऱ्या दिवशी आनंदी आली कामाला तेव्हा बिचारे बाबा कावरेबावरे होऊन ओठ घट्ट मिटून बसले आणि पुन्हा मी,सासूबाई,आमचे साहेब खूप हसलो. अशी भाषेची मजा. अजून बरेच मजेशीर प्रसंग आहेत पण त्यावर वेगळाच लेख लिहावा लागेल.

१. प्रसिध्द शेफ श्री विष्णू मनोहर यांचा महाराष्ट्र मंडळ कोईम्बतूर येथे झालेला कुकरी शो

२. तमिळ भाषा शिकवणारी कामवाली मावशी अम्मा

३. मारुत्वमलै वरील मुरुगन मंदिर

 

भाजीवाल्यांकडून भाज्यांची नावं, धोब्याकडून ओन्न, रंड (एक, दोन) हे आकडे असे करता करता तोडकं मोडकं बोलता यायला लागलं. मग जरा मजा यायला लागली. अंगणात जशी तुळस रुजते तशी मी हळूहळू नवीन प्रदेशात रुजू लागले. कोईम्बतूरचे वातावरण बाराही महिने जवळपास सारखेच असते. हा रेन-शॅडो एरिया आहे त्यामुळे मान्सून फारसा येत नाही आणि परतीचा पाऊस ऑक्टोबर अखेरपासून येतो पण बेभरवशाचा त्यामुळे थंडी फारशी नसते. ऊन जास्ती तापलं की लगेच पावसाचा शिरवा येतो. त्यामुळे हवामान उष्ण आणि दमट असते. तिथली सकाळ लहरी असते. कधी मस्त उल्हासात सोनेरी किरणांत न्हाते तर कधी आळसात ढगांच्या दुलईत पहुडलेली असते. संध्याकाळ मात्र रोज रम्यच असते. वातावरणात आल्हाददायक गारवा आलेला असतो आणि गार गार वारा  भिरभिरत असतो. वातावरण कसे एकदम रोमँटिक होऊन जाते संध्याकाळी. तिथे माझ्या घराला पश्चिमेला मोठी खिडकी होती. तिथून सूर्यास्त फार छान दिसायचा. त्या संध्येच्या मनमोहक छटा कॅमेऱ्यात टिपायचा मला छंदच लागला होता.

 

दक्षिण भारतातील लोक जरा जास्ती देवभोळे वाटतात. कोईम्बतुरला पण तेच पाहायला मिळाले. कोणत्याही सणाला तिथे विशेष लगबग असायची. तिकडे शेणाची पावडर मिळायची त्याला 'सानी' म्हणायचे. ती पावडर पाण्यात कालवून सणाच्या दिवशी अगदी सिमेंटचे अंगणसुद्धा त्याने सारवायची पद्धत पहिली. नंतर त्यावर तांदुळाच्या पिठाची पांढरी शुभ्र रांगोळी काढायची. दाराला केळीचे खांब आणि पानांचे तोरण असायचे. अगदी पहाटे कॉफीच्या मंद दरवळी सोबत कुठेतरी विष्णू सहस्त्रनाम,ललिता सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र ऐकू यायचे. वातावरण एकदम धार्मिक होऊन जायचे. फुलांची तर रेलचेल असायची. त्यात 'मल्ली पु' म्हणजे मोगऱ्याचे फुल - ते वातावरण खास प्रसन्न करायचे.

 

'कोविल' म्हणजे 'मंदिर'. तिथे लोकांना देवळात जाण्याचा फार नाद. फिरायला कुठे निघाले विचारलं तर हमखास एकच उत्तर 'कोईलक पोरांग' म्हणजे देवळात चाललो असेच असायचे. दक्षिणेतली देवळं, तिथले सोन्याच्या पॉलिशचे मोठे मोठे रथ, फुलांची आरास, मंत्रोच्चार त्या सोबत वाजणारे मंगलवाद्ये आणि लोकांचा भक्तिभाव हे सगळे पाहून देवाचं ऐश्वर्य काय असू शकतं याची कल्पना तिथेच येते.

१. तांदुळाच्या पिठाची रांगोळी(कोलम)

२. मल्ली पू - मोगऱ्याच्या फुलात सजलेला गोपालकृष्ण

३. शुभ कार्यात केलेला केळीच्या पानांचा मंडप आणि तोरण

 

कोईम्बतूरनी मला दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे माझी डॉक्टर म्हणून दिलेली ओळख. नवरा कामाला आणि मुलगा शाळेत निघून गेला की घर खायला उठायचे. स्वयंपाक घरात मी कधीच रमत नाही. मग मनाची अस्वस्थता कमी करण्यासाठी काहीतरी काम शोधायचा विचार केला. वैद्यरत्नम कंपनीचे क्लिनिक घराजवळच होते. तिथे सहज विचारून पाहिले आणि काम झाले. क्लिनिकला जाणे सुरू केले. भाषा बोललेली  समजायला लागली होती पण बोलता फारसे येत नव्हते. आता वैद्यकीय भाषेतले शब्द जाणून घेणे गरजेचे होते. आधी रुग्णाला पूर्ण कथा सांगायला लावायचे. रिसेप्शनिस्टला बाजूला उभे ठेवायचे आणि थोडाफार इंग्रजीचा आधार घ्यायचा असे करत सगळे समजून घ्यायचे. अशी कामाची सुरवात झाली. सुरवातीला रुग्णांना शंका यायची. ते विचारायचे "डॉक्टर अम्मा,पुरिंजिद?" - म्हणजे डॉक्टरीण बाईंना समजलं का? मला त्यांना विश्वास द्यावा लागायचा "आमांग नल्ल पुरींजिद" - म्हणजे "हो हो अगदी छान समजलं".  हे मोठंच आव्हान होतं. पण छान वाटायचं. नंतर मला माझ्या एका मैत्रिणीने पतंजली बद्दल सांगितले मी तिथे चौकशी केली मग तिथे नोकरी लागली. तिथे हिंदी भाषिक लोक बरेच यायचे. मला हिंदी बोलता येतं समजल्यावर आणखीच गर्दी वाढली. पतंजलीचे मार्केटिंग भरपूर असते त्यामुळे मला तो आधार होताच पण माझ्या नावावर रुग्ण यायला लागले होते तेव्हा मात्र खूप छान वाटायचे. सात-आठ वर्षात बराच पेशंट बेस तयार झाला. खूप अनुभव आला आणि आत्मविश्वास वाढला त्यामुळे मी अजूनही त्या केंद्राला ऑनलाइन सेवा देते.

 

कोईम्बतुरला चाळीस वर्षांपासून रहात असणाऱ्या काही कुटुंबांनी महाराष्ट्र मंडळ सुरू केले होते. पण ते लोक काही कारणाने पांगले. उरलेले तेव्हढे चार पाच कुटुंबच गणपती उत्सव साजरा करायचे. आम्हीही त्यात सामील झालो. माझे यजमान माणसे जोडण्यात आघाडीवर असल्याने त्यांनी फेसबुक पेज तयार करून अधिकाधिक लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. करता करता महाराष्ट्र मंडळ सदस्य वाढले. तिथे सातारा भागातले जवळपास तीन एक हजार लोक सोन्याच्या उद्योगात आहेत. त्यांनी पण मराठा मंडळ स्थापन केलेले आहे. तिथे गौरी गणपती उत्सव फार मोठया प्रमाणावर साजरा होतो.

 

कोईम्बतुरला सार्वजनिक गणपती सुद्धा थोड्या प्रमाणात असतात. घरोघरी मात्र दीड दिवसांचा गणपती बसतो. तिथे दसऱ्याला सरस्वती पूजन करतात. त्यामुळे दसऱ्याला शाळेला सुट्टी नसते. दसऱ्याला नवीन ऍडमिशन होतात किंवा लहान मुलांना पहिल्यांदा पाटी, लेखणी घेऊन मंदिरात नेऊन ह्या दिवशी अक्षर गिरवायला लावतात. दक्षिण भारतीय लोक बऱ्याच जुन्या प्रथा अजूनही नेटाने चालवतात म्हणून थोडे कर्मठ वाटतात. उत्तर भारतीय म्हणजे महाराष्ट्रासहित वरचे लोक बिघडलेले असतात असा त्यांचा समज आहे म्हणून त्यांचा हिंदी भाषेलाही फार विरोध आहे. इंग्रजी बोलतात पण हिंदी अजिबात नाही.

 

एक मजा सांगते. माझी कामवाली बाई सारखे 'टिकेसन टिकेसन' म्हणायची काही केल्या अर्थ लागत नव्हता. असा कोणता शब्द पुस्तकातही दिसला नाही.  शेवटी मी ह्यांना सांगितले ह्या शब्दाचा शोध लावायला. काही ऑफिसमध्ये संदर्भ मिळतो का बघा म्हंटल आणि एक दिवस शोध लागला. तर काय असेल बरं हा शब्द? ह्यांच्या ऑफिसमध्ये कामवाल्या बाईने 'टिकेसन' हा उच्चार केला तेव्हा ह्यांनी अर्थ विचारला तेव्हा कळले टिकेसन म्हणजे डीकॉक्शन. माझ्या बाईला कॉफी पाहिजे असायची म्हणून 'डीकॉक्शन असेल तर अम्मा कॉफी दे' असे म्हणायची आणि हे रोजच. मला आश्चर्य वाटले, हिंदीचा इतका द्वेष आणि काय हा इंग्रजीचा पगडा.

 

कोईम्बतुरला बाहेर नॉर्थ इंडियन जेवण फार चांगले मिळत नव्हते. पण इडली, डोसा, पनियारम, लेमन सेवई,अडई, ईडीआपम, अवियल (ताकातली भाजी), पोरीयल (सुक्या भाज्या,ओला नारळ घातलेल्या), कोळम्ब (चिंच घातलेल्या रस्सा भाज्या) हे पदार्थ फार चविष्ट मिळायचे आणि ते आवडायला लागले होते. तामिळमध्ये जेवणाला 'सापाड' म्हणतात. रविवारी बरेचदा आम्ही फेमस अन्नपूर्णा हॉटेलमध्ये हे खास सापाड खायला जात असू.

 

कोईम्बतुरला अजून एक आकर्षण म्हणजे तिथून उटी अगदी नव्वद किलोमीटर अंतरावर त्यामुळे कधीही फिरायला जावसं वाटलं तर वन डे पिकनिक करता यायची. प्रत्येक ऋतूत उटीचे सौंदर्य वेगळेच पण पावसाळ्यात तर स्वर्गच वाटायचे. महाराष्ट्रात येताना मला तिथली सुंदर हिरवळ आता पुन्हा सहज डोळ्यांना दिसणार नाही याचे फार वाईट वाटले होते. पण पुण्याचा आजुबाजूलाही सह्याद्री असल्याने तितकी निराशा झाली नाही. फक्त तिकडे बाराही महिने सृष्टी हिरवीगार असते इथे ते मोहक दृश्य फक्त पावसाळ्यात पाहायला मिळते.

 

एखाद्या रोपट्याला कुठेही रुजायला जशी योग्य खतपाणी, हवा, सूर्यप्रकाश, याची आवश्यकता असते अगदी तशीच माणसाला सुद्धा नवीन ठिकाणी रुळायला तिथली हवा, पाणी आणि अन्न ह्या तीन गोष्टींशी जुळलं पाहिजे. कोईम्बतुरला वसलेल्या बऱ्याच राजस्थानी लोकांना तिथे श्वसनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागते. कोईम्बतुरचे दमट हवामान काहींना बाधते. सुदैवाने आम्हाला तिथे कुठलाही त्रास झाला नाही.

 

कोईम्बतुरला असताना मनात एक अनामिक हुरहूर असायची. परक्या प्रांतात,आप्तेष्टांपासून दूर असल्याची सल कुठेतरी खोलवर असायचीच. पण तरीही तितकीच खोलवर मी तिथे रुजत गेले ह्याची जाणीव मला पुण्याला आल्यावर झाली. इथे चहा, कॉफी, खाद्य संस्कृती, धार्मिक रूढी, हवामान सगळ्यांमध्ये मी नकळत कोईम्बतूर शोधू लागले आणि पहिल्या पावसाळ्यात बाहेर फिरायला गेले असताना, झुळझुळणाऱ्या गारव्यात, खळखळणाऱ्या झऱ्यात, डोंगरांनी वेढलेल्या तलावात, नटलेल्या हिरव्यागार विस्तीर्ण सह्याद्रीच्या डोंगर रांगात मला माझे कोईम्बतूर भेटले तेव्हा लक्षात आले जीव जडला होता कोईम्बतुरवर. आता पुण्यातही रुजलीये मी पण कोईम्बतुरच्या मातीचा सुगंध मात्र सतत आजूबाजूला दरवळत असतो.

अमृता हमीने

आयुर्वेदाचार्य तसेच योग व निसर्गोपचार चिकित्सक. पंधरा वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस दहा वर्षापासुन पतंजली चिकित्सा केंद्रात सेवा देत आहे. माहेर पुसद (यवतमाळ जिल्हा) आणि सासर यवतमाळ. सध्या पुणे येथे वास्तव्य असून प्रायव्हेट आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू आहे. कविता करण्याची व लिहिण्याची आवड तशी नवीन आहे. मामबो ह्या साहित्य प्रेमींच्या ग्रुपमध्ये आल्यापासून मला खूप फायदा झाला.दिवसेंदिवस माझ्या लिखाणात झालेली सुधारणा मला नक्कीच जाणवतेय. मामबोमधील अनेक अनुभवी व्यक्तींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.मी मामबोची सदस्य आहे हे माझे भाग्य आहे. इथे आल्यापासून एक नवीन छंद मिळाला आणि त्यातून जीवनाला एक नवीन दिशा मिळाली.